Monday, July 15, 2019

चष्मा काढा आणि मग बघा ...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सहज सुचलेलं...



गुरुपौर्णिमा म्हणलं की आपल्याला सगळे शाळेतले, कॉलेजमधले शिक्षक आठवतात.  आई हि मुलाची पहिली गुरु असते असं आपण म्हणतो. प्रार्थनेत सुद्धा 'मातृदेवो भव' पहिल्यांदा येत.  ते खरं आहेच पण आणखी एक गुरु आपल्याला आयुष्यभर मिळतो तो आपण विसरतो. तो म्हणजे आपली बायको (किंवा नवरा).
आता नवरा बायकोच नातं म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच आणि भांड लागलं कि आवाज येणार हा निसर्गनियमचं, नाही का? पण मग ह्या होणाऱ्या नैमित्तिक (?) वादातून/मतभेदातून असेल, किंवा प्रासंगिक होणाऱ्या चिडचिडीतून असेल. प्रत्येक प्रसंगातून बायको (किंवा नवरा) आपल्याला काहीतरी शिकवत असते/असतो.  तो एक प्रकारचा "फीडबॅक" असतो. फक्त होतं काय कि आपण त्यावेळी तो फीडबॅक घेण्याच्या मनस्थितीत नसतो, किंवा तो फीडबॅक हा "बायको" कडून आलाय (किंवा नवऱ्याकडून आलाय) म्हणून सोयीस्कररीत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपण त्याच्याकडे उदात्ततेने, कुठलाही किल्मिष मनी न बाळगता बघतच नाही. अर्थात तसं बघणं म्हणावं तेवढं सोपं नाही, कारण 'अतिपरिचयात अवज्ञेची बाधा अनेकदा या नात्याला सहजगत्या झालेली असते. वयानुसार प्रत्येकाचा समजूतदारपणा, वैचारिक परिपक्वता वाढतेच अस नाही. काही प्रमाणात स्वभावातील लवचिकता जाऊन तो निबर बनलेला असतो. त्यामुळे आपला जीवन सवंगडी हा "सवंगडी" (मित्र) आहे हेच आपण विसरतो आणि तो "संगीन" (तलवार) असल्यासारखं त्याच्याकडे बघतो!  बघा पटतंय का?  तर हा नित्य आपल्याबरोबर असणारा गुरु आपण गृहीत न धरता त्याच्याकडून (तिच्याकडून) शिकणं शक्य आहे. फक्त त्यासाठी एखाद्या बायकोने (किंवा नवऱ्याने) तिच्या नवऱ्याला (किंवा बायकोला) काही सल्ला दिला तर तो आपल्या दोघांच्या हिताचा आहे हे कळण्यासाठी नवऱ्याने (किंवा बायकोने) हा सल्ला आपल्या बायकोने (किंवा नवऱ्याने) दिला आहे हा चष्मा काढून त्याकडे बघावे लागते. तरच तो सल्ला मोकळ्या मनाने घेता येतो. 

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करा जरा विचार आणि हो, मनापासून पटलं, तर कृती देखील.  फक्त हा नात्याचा चष्मा काढून पाहायला शिका!

(c) सागर साबडे

0 Comments:

Post a Comment

<< Home