Punekar - Mumbaikar - Nagpurkar - ektra bhetale tar?
पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर एकत्र आले तर काय होईल ह्यावर कल्पनाविलास. पुलंची क्षमा मागून आणि त्यांच्याच प्रेरणेने !
स्थळ:
पुण्यातील एक बस स्टॉप. जवळ एक माणूस (हा पुणेकर) पेपर विकतो आहे.
त्याच्याकडे सकाळ, महाराष्ट्र टाइम्स हि वर्तमानतपत्रे आहेत असे दिसते.
सोबत एक खास पुणेरी पाटी आहे.
"वर्तमानपत्रे, शहाळे आणि दणकट पायजमे मिळतील. पत्ता सांगायचे २ रुपये."
एक
माणूस भरभर चालत येतो. त्याच्या चालीवरून तो मुंबईकर असावा असे कळते.
बस नुकतीच गेली असावी अशा पद्धतीने रस्त्याकडे बघतो. बसचा थांगपत्ता नाही.
म्हणून तो त्या पेपर विक्रेत्याकडे जातो.
मुंबईकर : काय बस गेली का हो इथून इतक्यात?
पुणेकर: (त्रासिक स्वरात) मला काय माहिती?
मुंबईकर: म्हणजे - what do you mean? तुम्ही इथे उभे आहात ना? इथून बस गेली का ते विचारतोय. that's all.
पुणेकर : ते माझे काम नाही. तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे का ते बोला..
मुंबईकर: काय माणूस आहे? सरळ बोलताच येत नाही पुणेकरांना .. साधा प्रश्न विचारला तरी तिरकस उत्तर..
पुणेकर : ओ साहेब .
तुम्ही इथले दिसत नाही..
. पुणेकरांना काय बोलला हो? असला अपमान इथे खपवून घेतला जाणार नाही .. आम्हाला पुण्याचा जाज्वल्य अभिमान आहे म्हटलं !
मुंबईकर: (तोंड वेंगाडत) हो का? असू दे हं असू दे. मला काय सांगताय? मी मुंबईकर!
by the way मटा आहे का? at least तो तरी द्या.
पुणेकर: (पेपर विकला गेल्याने जरा खुशीत येऊन) -- हं हे घ्या -- सहा रुपये..
मुंबईकर: सहा? मुंबईत तर ५ ला मिळतो. this is ridiculous.
पुणेकर:
(पेपर परत हातात घेतो.) काका सोपी गोष्ट आहे. तुम्हाला मुंबईउन यायला
पैसे लागले ना? आणि आता तुम्ही मुंबईत आहात का? नाय ना? मग इथं पुण्याचा
दर पडणार.. द्या ६ रुपये. विंग्रजी झाडू नका उगाच त्यानं पैसे नाही कमी
व्हायचे
मुंबईकर नाखुशीने ६ रुपये देतो --
एक छोटा साधारण ६-७ वर्षाचा मुलगा विंगेतून पळत येतो. काका एक सकाळ द्या.
पुणेकर: हं हे घे बाळ .. ४ रुपये.
मुलगा: काय चार रुपये!
(प्रेक्षकांकडे बघून) --- भलतीच महागाई आहे.. माझ्या लहानपणी नव्हती एवढी.!! (
मुलगा विंगेत परत पळत जातो.
मुंबईकर: तुम्ही वाचता का मटा ? I mean महाराष्ट्र टाइम्स?
पुणेकर: नाही आम्ही फक्त सकाळ वाचतो.. तुमच्या सारखे काही लोकं मागतात म्हणून विकायला एवढंच
मुंबईकर: बरोबर आहे..
पुणेकर : काय हो, काय बरोबर आहे म्हणाला?
मुंबईकर: स्वस्त आहे ना सकाळ? जातीवंत पत्रकारिता काय कळणार म्हणा?
पुणेकर: ओह भाऊ आम्हाला शिकवू नका पत्रकारिता .. इथे सदाशिव पेठेत शेंबडा पोरगा सुद्धा जास्त माहिती
जमवून असतो. आणि स्वस्त आहे असले तरी आमचे पुणेच मस्त आहे.
मुंबईकर: ह ते आहे मुंबईसारखी महागाई कुठे सापडणार नाही..
मुंबईकर पेपर वाचायला लागतो. एक्दम हसतो.
पुणेकर: काय हो? दात काढायला काय झालं आता? (पुणेकर सरळ प्रश्न विचारणार नाही कधी)
मुंबईकर: काही नाही हि बातमी वाचली .. मागच्या आठवड्यात तुमचा एक पुणेकर मुंबई च्या थिएटर मध्ये हुज्जत घालत होता म्हणे
पुणेकर: कशावरून?
मुंबईकर: पैसे परत द्या म्हणे.. हॉरर सिनेमा होता म्हणून मी डोळे मिटून बसलो आणि सिनेमा बघितलाच नाही.
पुणेकर : बर मग?
मुंबईकर: तो थिएटर मॅनेजर पण मुळचा पुण्याचा असणार -- डोळे बंद होते पुरावा दाखव म्हणाला !
आणखी एक माणूस विंगेतून येतो.. (हा नागपूरकर)
इकडे तिकडे काहीतरी शोधक नजरेने बघतो..
नागपूरकर: अबे एकपण ठेला नाही का बे इथे?
पुणेकर: ओ -- शिव्या कुणाला देताय?
नागपूरकर: शिव्या कधी देऊन राहिलो बे .. मी तर ठेला विचारून राहिलो ना ..
पुणेकर: शिव शिव .. पुन्हा असभ्य भाषा.. कुठून कुठून लोक पुण्यात येतात ते ओंकारेश्वर जाणे.. वाचवं रे बाबा
नागपूरकर: पण ठेला आहे का सांगा ना बे ..
मुंबईकर: you see mister तुम्हाला काय हवे आहे ते कळत नाही नीट सांगता का?
नागपूरकर: अबे ठेला पानाचा ठेला बोलून राहिलो ना मी मगाचपासून -- हे पुणेकर तिसराच अर्थ काढून राहिले ना ..
मुंबईकर: ठेला? तुम्हाला पानाचा ठेचा म्हणायचे आहे का?
नागपूरकर:
काय चेष्टा करून राहिले भाऊ तुम्ही .. ठेचा तर आम्ही जेवताना खातो ना ..
ठेला म्हणजे पान भेटते ना जेवण झाल्यावर ते म्हणून राहिलो मी.
पुणेकर:
एक तर असभ्य आणि अगम्य भाषा वापरता. ठेला काय? शुद्ध मराठी बोला कि..
त्याला पानाची टपरी म्हणतात.. ती बघा समोर कोपऱ्यातून डावीकडे वळा - नंग्या
मारुती विचारा त्याच्या समोर मुंजोबाचं बोळ आहे -- द्या २ रुपये.
नागपूरकर: कसले २ रुपये?
पुणेकर: पाटीकडे बोट दाखवतो -- पत्ता सांगायचे २ रुपये पडतील.
नागपूरकर
हे लै भारी होऊन राहिले .. आणि काय हो तुमच्या पुण्यात नावं काय नंग्या
मारुती काय? मुंजोबाचं बोळ काय?नागपूर ला येऊन बघा ना राव. कशी भारदस्त
नावे आहेत. सीताबर्डी, नंदनवन, रामेश्वरी कशी दर्जेदार नाव..
पुणेकर: (निरुत्साहाने) २ रुपये?
नागपूरकर: लिहून ठेवा ना - भागून थोडेच चाललो मी
पुणेकर: भागून? आम्ही फक्त गणितात भागाकार करतो.
मुंबईकर: पुण्यात फार गरम व्हायला लागलं नै?
नागपूरकर:
ह्याला उकाडा म्हणून राहिले का भाऊ तुम्ही? आमच्या नागपूरला येऊन बघा.
अहाहा काय तो उकाडा! अहाहा काय छान संत्री. ! मस्त वऱ्हाडी ठेचा बरोबर
जेवण करून दुपारच्या टायमाला संत्री खाऊन मस्त पडायचे -- अहो स्वर्गसुख इथे
कळणार का बे पुण्यात? मला तर वाटते इथल्या प्रत्येकाने नागपूरला येऊन एकदा
उन्हाळा अनुभवाला पाहिजे -- ते सुख बाकी कुठे नाही!
मुंबईकर कसनुसा हसतो. सारखा बस येतेय का ते वाकून वाकून बघतो.. पण बस न दिसल्याने बैचेन आणि घडाळ्याकडे बघतो..
पुणेकर:
ओ ते नागपूरचं कौतुक बास झालं. इथे पुण्यात पण ४२ चा पारा असतो म्हणलं
हल्ली. उगाच नाही ती म्हण आहे: "पुणे तिथे काय उणे"!
मुंबईकर: हो ते कळतंच आहे इथले खड्डे पाहून..
पुणेकर: तरी बरं तुमच्या मुंबईसारखं दार पावसाळ्यात तुंबत नाही !
नागपूरकर : कुछ भी ! पावसाळा पाहिजे तर नागपूरचा -- काय एकेक सर असते .. अहाहा .. तुम्ही याल तर खुश होऊन झालं ना बे.
पुणेकर:
हो तर ... जसा काही स्वर्गातून थेट पाऊस पडतो तुमच्या नागपुरात ! काय पण
एकेक कौतुक. आता सांगाल नागपुरात छान गुलाबी थंडी पडते. आधीच सांगतो गुलाबी
थंडी फक्त पुण्यात पडते. नागपुरात पण तशी थंडी असते असे सांगून सार्वजनिक
अपमान करून घेऊ नका..
नागपूरकर : थंडीच जाऊ द्या हो .
नागपूरला हल्दीराम चे स्नॅक्स खायला या ना भाऊ .. एक्दम झकास ताजे मिळतील
.. तुमचा दिल एक्दम खुश होऊन राहील ना..
पुणेकर नागपूरकरांच्या मागे जाऊन डोक्याकडे बघतो..
नागपूरकर: काय हो? काय झालं?
पुणेकर:
नाही डोक्याला कुठे मार लागलाय का ते बघत होतो .. काय पण कौतुक सांगताय
--- आणि ते पण कुणाला? आणि खुद्द पुण्यात येऊन? ती रांग बघताय काय?
नागपूरकर: काय काही मुफ्त वाटप सुरु आहे का?
पुणेकर:
बाकरवाडीसाठी रांग आहे ती.. ताजी बाकरवडी खाऊन जे लहानाचे मोठे झाले
त्यांना त्यांच्याच शहरात तुम्ही हल्दीरामच्या गोष्टी सांगता म्हणजे
तुमच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते.. कुठून कुठून लोक येतात
पुण्यनगरीत देव जाणे..
मुंबईकर: अजून बस आली नाही. लेट झाली कि काय
पुणेकर: सारखे वाकून वाकून काय बघता हो? तुमच्याकडे तर वाकून बघितल्यावर लोकल ट्रेन लवकर येतात का? इथे सगळे PST प्रमाणे चालते.
मुंबईकर: PST? म्हणजे काय?
पुणेकर: अज्ञान -- घोर अज्ञान.. PST म्हणजे पुणे स्टॅंडर्ड टाइम ! ते उगाच वेळापत्रक वगैरे आम्ही सहज गंमत म्हणून छापतो..
मुंबईकर आणि नागपूरकर विस्मयाने एकमेकांकडे बघता..
मुंबईकर: हे म्हणजे जरा अतीच झालं - आमच्यासारख्यानी करायचं काय मग?
पुणेकर: अति काय हो? अति काय आहे त्यात? प्रत्येक शहराची वेळ असते. एक चेहरा मोहरा असतो ना तशी हि आमची खास पुणेरी
पुणेकर मधूनच निघायला लागतो..
मुंबईकर : का हो? निघालात इतक्यात? काही गिऱ्हाईक येताना दिसतायेत.
पुणेकर:
घड्याळ बघा ... १ वाजला. १ ते ४ PST प्रमाणे काहीही होत नाही.. आणि त्या
वेळात कितीही तात्विक असले तरी आम्ही वाद घालत नाही..
पुणेकर निघून जातो आणि नागपूरकर आणि मुंबईकर कपाळावर हात मारून घेतात!
0 Comments:
Post a Comment
<< Home