Saturday, August 25, 2018

कल्पकता आणि मी

कल्पकता आणि मी

मी लहानपणापासून फार कल्पक आहे अशी माझी समजूत आहे.  शाळेतल्या प्रगतीपुस्तकावर त्या वेळच्या बाईंनी "मुलगा शांत समजूतदार आहे, नवीन कल्पनांचे नावीन्य आहे" असा शेरा मारल्याचे मला अजूनही स्मरते. अर्थात माझ्या कल्पकतेचे घरच्यांना आणि विशेष म्हणजे माझ्या बहिणीला फार वावडे होते. एकेकाळी शास्त्रीय प्रयोग म्हणून बहिणीची पांढरी साधी हळदीमध्ये भिजवून साबणाच्या पाण्यात धुऊन लाल करून दिल्यापासून तर माझ्या कल्पनांचा विस्तार कसा खुंटेल हे पाहणे जणू तिचे प्राथमिक कर्तव्य झाले होते !
असो..  पिकते तिथे विकत नाही ह्या न्यायाने अस्मादिकांनी डोके चालवून काहीतरी छान कल्पना काढावी आणि सांगायला सुरुवात करताच "तू गप्प बस रे" असे म्हणून तिचा पूर्ण जन्म होऊ देऊ नये किंवा कधीकाळी ती सगळी मुखातून बाहेर पडलीच तर त्याची यथेच्छ टिंगल टवाळी करावी असे कैक प्रसंग माझ्या बालपणी मी पचवले आहेत. पण कल्पकता हा माझा स्थायी भाव असल्याने वाढत्या वयाबरोबर ती वाढतच गेल्याचे मला प्रकर्षाने जाणवले आहे.  

पण हल्ली हल्ली विशेषतः लमालसाठी लिखाण करायला घेतल्यापासून माझी कल्पकता कमी झाली आहे असे मला वाटायला लागले. म्हणजे हेच बघा ना की कुठलाही विषय दिला की साधारण १/१.५ महिना मला काहीच सुचत नाही.  सुचायला लागलं कि मन कुठंतरी भरकटते आहे असं वाटतं. पूर्वी हा हा म्हणता आठवड्यात ४ कविता आणि २ दीर्घ लेख किंवा गेला बाजार २/४ लघु कथा लिहिणारा मी एकदम असा कल्पनाखोर (दिवाळखोरच्या धर्तीवर) होईल असे मला मला कधी वाटले नाही.  बरोबर जमलेली मंडळी त्यांचे छान छान लेख वाचून दाखवतात, व टाळ्या शिट्ट्या मिळवतात आणि मला मात्र मक्ख चेहऱ्याच्या प्रतिक्रिया पाहाव्या लागतात  किती ओशाळल्यागत होतं म्हणून सांगू .. छे हे काही खरं नाही!. कल्पना सुचत नाही म्हणजे काय .. काहीतरी केलंच पाहिजे ह्या विचाराने मी पछाडला गेलो. अशा अवस्थेत काही दिवस घालवल्यावर मी यावर काय उपायजोजना करता येतील ह्याचा विचार सुरु केला.

सर्व प्रथम जवळच्या ग्रंथालयात जाऊन 'कल्पकता आणि सर्जनशीलता यांचे व्यवच्छेदक विश्लेषण' नावाचा ६०० पाणी ग्रंथ आणला. ह्या विषयात तज्ज्ञ असलेल्या एका प्रसिद्ध लेखकानेच तो लिहिला होता. आता तो ग्रंथ वाचला कि झाले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल याची मला खात्री होती.  पण झालं उलटंच -- त्या दिवशी आमच्या हिनं मस्त पुरी व कांदा बटाटा रस्स्याचा बेत केला होता.  बाकी आमची ही काय फक्कड रस्सा करते.. तिच्या हाताची पुरी आणि रस्सा माझा 'वीक पॉईंट'  त्यामुळे जेवण जरा अंमळ जास्तच झालं -- अर्थात त्या ग्रंथाचा उपयोग हा जड झालेल्या डोक्याला आधार म्हणून झाला हे दुपारच्या चहाला हिन उठवलं तेंव्हाच कळलं!
हे असं पुस्तक वाचून वगैरे काही कल्पकता वाढणार नाही हे थोड्याच वेळात लवकरच माझ्या ध्यानात आलं   मग एकदम सुचलं.. आता जरा पम्प्याला विचारलं पाहिजे.
पम्प्या म्हणजे पंकज परांजपें -- माझा बालमित्र -- आद्याक्षर जुळवून  त्याचा "पम्प्या" झाला   शाळेत असल्यापासूनच त्याचं डोकं वेगळं चालायचं. त्याची गती शिक्षकांना समजली नाही ते त्यांचं दुर्दैव!  पम्प्याला ज्या कल्पना सुचत त्याचा वापर केला तर राष्ट्राची एकदम वेगवान प्रगती होईल यात शंका नाही असे त्याचे मत आहे.  कधी कधी त्याच्या कल्पना अंमलात आणताना अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागत.. मागे त्याने घरी पाळलेल्या गोल्डफिशला प्राणायाम शिकवायचा प्रयत्न केला होता तो फसला .. पण कल्पक माणसाच्याकडून चुका होणारच नाही का?
तर मी पम्प्याला घेऊन शेजारच्या इराण्याच्या हॉटेल मध्ये गेलो.. त्याच्या आवडीची  टोस्ट अन चहा मागवला.  चहा आणि टोस्ट पोटात गेल्यावर पम्प्याची गाडी सुरु झाली..
"बोल बाबू नक्की काय प्रॉब्लेम आहे?"
"काही नाही रे -- मला ना नवीन कल्पनाच सुचत नाहीत बघ. काय करावं कळत नाही." मी थेट विषयालाच हात घातला.
"बरं धिस इस अ केस ऑफ क्रीएटिव्ह ब्लॉक" -- पम्प्या जोमात आला कि त्याची गाडी इंग्लिशवर घसरते..
"ह बोल काय करू शकतो?"
"अरे सोपं आहे.. तुझा आहार बदल.. इट ऑल कम्स डाउन टू फूड यू नो "
"म्हणजे? आता काय करू"
"अरे हेच बघ ना -- कॉलेजला असताना तुला खूप कविता शेर सुचायचे कि नाही? आठवं आठवं -- नाहीतर प्रियाला विचार !"  मिस्कील हसत टोस्टचा तुकडा खात पम्प्या म्हणाला.
हे मात्र खरं होत कॉलेज मध्ये प्रियाला पटवताना अनेक कविता सुचायच्या .
"हो ते खरं .. पण त्याचा काय संबंध?"
"आहे, संबंध आहे! तेंव्हा तू काय खात होतास? रिमेम्बर -- फक्त मॅगी, रोमेन नूडल्स आणि वडापाव. आय टेल यू बाबू ह्या वडापामुळेच अनेकजण चांगले लेखक झालेत.. "
पम्प्याच्या बोलण्यात तथ्य दिसलं म्हणून मग मी नेहमीच जेवण सोडून सकाळ संध्याकाळ मॅगी आणि वडापावचा रतीब लावला.  कल्पनाशक्ती मध्ये जरी काही बदल दिसला नसला तरी शारीरिक आकारात मात्र बदल लगेच जाणवायला लागला.. शिवाय रोजच जेवण उरायला लागलं त्यामुळे प्रियाला पण मी बाहेर मित्राबरोबर सामिष खात असावा असा नाहक संशय येऊ लागला.
हे काही फार काळ टिकणारं नव्हतं म्हणून मी परत पम्प्याला सांगितलं.

"बाबू - तू योगा करतोस का?"
"अरे तू सांगितलेले वडापाव आणि मॅगी खाऊनच असा आकार झालाय १५ दिवसात . आता काय आणखी मस्करी करतोस?"
"अरे नाय रे..  मी कालच एक लेख वाचला आणि मला कळलं कि तुला काही सुचत का नाही ते"..
"सांग तर खरं.."
"हे बघ .. मला सांग तुझं काम कसं -- बैठं! - सारख आपलं ते कॉम्पुटर पुढं बसायचं आणि तो कीबोर्ड बडवायचा"
"त्याचा काय संबंध?" मी त्रासिकपणे विचारले.
"आहे .. संबंध आहे. त्यामुळे सगळं रक्तप्रवाह पायाकडे वाहतो आहे .. मेंदूला पुरेसं रक्त मिळत नाही त्यामुळे त्याची वाढ खुंटली आहे!"
मेंदूची पण वाढ या वयात होत असते यावर माझा विश्वास बसला नाही पण पम्प्याचे वाचन अफाट असल्याने असल्या शंका विचारणे म्हणजे त्याचा अपमान झाला असता.
"तू एक काम कर.. शीर्षासन करायला लाग.. रोज १५ मिनिटं आणि बघ कशा सटासट कल्पना सुचतात तुला.." समोरचे भजे खात पम्प्या म्हणाला..
पम्प्या वाक्य प्रमाणम मानून मी एक योगा करायचे साहित्य घेऊन आलो. 
तेवढं एक काम पंकजभाऊजींनी चांगलं केलं असा माझ्या पोटाकडे बघून हीन केलेला तिरकस शेरा मला ऐकू आला पण त्याकडे दुर्लक्ष करून आता कल्पनाशक्ती वाढणार या उमेदीने मी सुरुवात केली. 
शीर्षासन करण ही सोपी बाब नाही हे न कळण्याइतका माझा मेंदू खुंटला नव्हता .. त्यामुळे मी भिंतीच्या आधाराने सुरुवात केली. दोन उश्या व त्यावर डोके ठेवून उलटा झालो खरा पण तेवढ्यात पाय लागून वरचे शेल्फ खाली आले -- त्यातली शोपीस, फोटो फ्रेम, पुस्तके, घड्याळ हि एकेक वस्तू मित्राच्या मदतीला धावावी अशाप्रकारे खाली आली .. काचेच्या शोपीस डोक्यात दाणकन आपटला.. आणि वाढत्या वयानुसार वाढलेल्या शरीराचा भार पुरेसा रक्तप्रवाह न झालेली मान सोसू न शकल्याने लचकली.

तेंव्हापासून मी कल्पनाशक्तीचा विकास कसा होईल या विवंचनेत आहे. तुम्हाला काही कल्पना असेल तर सांगाल का?  






0 Comments:

Post a Comment

<< Home