Thursday, October 18, 2018

चोरीची शिक्षा आणि शिक्षणमी सहावीत असतानाची गोष्ट.  तसा मी अभ्यासात हुशार गणला जायचो पण शाळेत कधी पहिला आलो नव्हतो.  आमच्या वर्गातील एका मुलीनं --  पल्लवीन  -- तिचे स्थान अबाधित ठेवलं होतं! बर अभ्यासेतर क्षेत्रातही तिचा तोच पायंडा होता. वर्गात सगळ्यांना तिचा हेवा वाटायचा.
सहामाहीत तिचा पहिला नंबर आला पण तिच्यात व माझ्यात १४ गुणाचे अंतर होते.  वार्षिक परीक्षेत ती ते अंतर ५० पेक्षा वाढवेल याची तिच्यापेक्षा मलाच खात्री होती.
परीक्षेत माझा नंबर तिच्या मागे आला होता. गणिताचा पेपर होता. माझे गणित चांगले असले तरी वेग नव्हता.  सराव करायचा कंटाळा करायचो.  वर्गमूळ व घनमूळ काढायचे प्रश्न जाम छळायचे! मी माझ्या वेगाने पेपर सोडवत होतो. पल्लवी एकामागून एक पुरवणी मागत होती. पेपर सुटायला २०-२५ मिनिटे बाकी असतानाच तिने पेपर दिला व ती बाहेर पडली. असं कुणी केलं ना की मला जाम टेन्शन यायचं.  मी जरा वेगाने लिहायला सुरुवात केली तेवढ्यात माझी पेन्सिल खाली पडली. ती घ्यायला मी बाकाखाली वाकलो. तेवढ्यात पायापाशी मला कागद दिसला. मी तो पाहिला आणि क्षणभर दचकलोच. पल्लवीने तिच्या सुवाच्य अक्षरात लिहीलेली पुरवणी होती.  मला नीट न येणारा घनमूळाचा प्रश्न व्यवस्थित सोडवला होता.  त्याच्या पुढे भूमितीय प्रमेय सोडवले होते.
काय करावे मला सुचेना. सांगाव का सरांना? की काॅपी करावी? की तसाच सोडून द्यावा? शेवटी मोहाने विजय मिळवला व मी ते उत्तर तसेच कांपी केलं. पल्लवीची पुरवणी तिथेच बाकावर सोडली व पेपर देऊन टाकला.  शेवटचा पेपर असल्याने सुट्टया लागल्या.
दीडमहिन्यानंतर निकालासाठी शाळेत गेलों.  मी पूर्ण शाळेत पहिला आलो होतो!  माझा विश्वास बसेना.  गणितात मला १०० पैकी ९६ गुण मिळाले होते.  पल्लवी दुसरी आली होती.  तिला माझ्यापेक्षा ४ गुण कमी होते व गणितात फक्त ती १४ गुणांनी मागे होती.  मला आठवलं की पुरवणीतले प्रश्न १४ गुणांचे होते!  म्हणजे मी तिचे गुण चोरून पहिला आलो होतो!  कधीच पहिला नंबर न सोडणारी पल्लवी दुसरीआली याचं सर्वांना विशेष वाटत होतं.  तेव्हा वर्गात मुलं विरुद्ध मुली अशी स्पर्धा असायची.  नेहमी मुलींचा नंबर पहिला असतो याचा मुलींना फार अभिमान होता.  आज अनेक मुली हिरमुसल्या होत्या. काही माझ्याकडे रागाने पाहात होत्या.  पल्लवी थोडीशी रडवेली वाटत होती पण तेवढ्यात ती माझ्याजवळ आली व मला ‘अभिनंदन!’ म्हणाली.  मी थॅंक्यू म्हणत कसनुसं हसलो. तिच्या मनाच्या मोठेपणामुळं मलाच ओशाळल्यागत झालं..

घरी आलो तेंव्हा घरात निकाल सांगितला. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. माझ्या आजीला फार कौतुक वाटलं. तिन लगेच जाऊन पेढे आणले व देवापुढं ठेवले. तेंव्हा आम्ही वाड्यात राहायचो त्यामुळे कानोकानी हि वार्ता घरोघरी झाली आणि पेढ्यांचा डबा हळूहळू रिकामा होऊ लागला.  मला आनंद  झाला पण मनात एक अनामिक टोचणी लागली होती.  काय करावं कळत नव्हतं आणि अभिनंदनाचा रतीब सुरु असल्याने बाकी काही विचार करायला वेळ नव्हता.  माझ्या काकांनी मला बक्षीस म्हणून महात्मा गांधींवरच एक पुस्तक दिले.  त्यात गांधीजींच्या लहानपणाच्या गोष्टी होत्या.

दुसऱ्या दिवशी मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यात गांधीजी लहान असताना मित्रांबरोबर कुठेतरी आणि मित्राने टिंगल केली म्हणून त्यांनी मांस खाल्ले आणि पैशासाठी भावाच्या सोन्याच्या कड्याचा एक तुकडा तोडून विकला अशी एक गोष्ट होती.  त्यानंतर ते घरी आले व याविषयी त्यांच्या आजोबांशी खोटं बोलले. पण नंतर पापभीरू मोहनदासला राहवलं नाही आणि ते आजोबांच्या खोलीत जाऊन रडले व त्यांची माफी मागितली.  तो प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला.

पुढे एक दिवसानंतर माझ्या आजीची एक मैत्रीण (आम्ही त्यांना बापट आजी म्हणायचो)  आमच्या घरी आली होती. माझे कौतुक म्हणून त्यांनी एक स्वतः विणलेली पिशवी आणली होती.  आजीने सांगितल्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला व बापटआजी माझं कौतुक करायला लागल्या .. पण मला ती गांधीजींची गोष्ट आठवायला लागली आणि मला रडू यायला लागलं. आजीला नक्की काय झालं कळेना.  रात्री परत मुसमुसत मी आजीला सगळी परीक्षेत मला पुरवणी कशी सापडली व मी 'कॉपी' कशी केली याची गोष्ट सांगितली.

आजीनं माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाली "हे बघ चोरून मिळालेलं काहीच पचत नाही आणि रुचत नाही. यश कसं निर्भेळ हवं! त्याचा अभिमान वाटायला हवा. नाहीतर हे आपलं मन असं आपल्याला कुरतडत बसतं आणि ते पचत  नाही.  तू पल्लवीची उत्तर चोरलीस पण तिच ज्ञान चोरू शकतोस का? नाही ना? आता यापुढे शपथ घे कि कुठलीच गोष्ट फुकट मिळते आहे, चोरून वापरणार नाही."  मी तशी शपथ घेतली.

मग आजीने विचारले "तुला एवढ्या लोकांनी भेटवस्तू दिल्या त्यातली तुला सगळ्यात आवडलेली कुठली?"
नाजूक कलाकुसर केलेली बापट आजीनी दिलेली पिशवी मला फार आवडली होती.  मी लगेच आजीला तस सांगितलं.  तेंव्हा आजी म्हणाली कि ती पिशवी तू पल्लवीला भेट दे. कारण त्यावर खरा हक्क तिचा आहे.

मी थोड्याश्या नाखुशीनेच ती छान पिशवी पल्लवीला दिली. तिला विशेष वाटलं..  पण त्या कृतीतून झालेला संस्कार मोठा होता व तो मला आयुष्यभर पुरला.  त्यानंतर परत कुठलीच चोरी करायचा मोह झाला नाही.  जी गोष्ट आपली नाही तरी ती सहजगत्या, कष्ट न करता मिळत असेल तर त्यावर आपला अधिकार नाही ही आजीची शिकवण अजून पुरते आहे.

पुढे मोठा झाल्यावर पीएचडी करताना plagiarism बद्दल वाचलं आणि लहानपणी झालेला हा संस्कार किती महत्वाचा होता त्याची प्रकर्षाने जाणीव झाली.

[सत्य असत्याची सांगड घालून केलेला हा कपोलकल्पित लेख आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.]

Saturday, August 25, 2018

कल्पकता आणि मी

कल्पकता आणि मी

मी लहानपणापासून फार कल्पक आहे अशी माझी समजूत आहे.  शाळेतल्या प्रगतीपुस्तकावर त्या वेळच्या बाईंनी "मुलगा शांत समजूतदार आहे, नवीन कल्पनांचे नावीन्य आहे" असा शेरा मारल्याचे मला अजूनही स्मरते. अर्थात माझ्या कल्पकतेचे घरच्यांना आणि विशेष म्हणजे माझ्या बहिणीला फार वावडे होते. एकेकाळी शास्त्रीय प्रयोग म्हणून बहिणीची पांढरी साधी हळदीमध्ये भिजवून साबणाच्या पाण्यात धुऊन लाल करून दिल्यापासून तर माझ्या कल्पनांचा विस्तार कसा खुंटेल हे पाहणे जणू तिचे प्राथमिक कर्तव्य झाले होते !
असो..  पिकते तिथे विकत नाही ह्या न्यायाने अस्मादिकांनी डोके चालवून काहीतरी छान कल्पना काढावी आणि सांगायला सुरुवात करताच "तू गप्प बस रे" असे म्हणून तिचा पूर्ण जन्म होऊ देऊ नये किंवा कधीकाळी ती सगळी मुखातून बाहेर पडलीच तर त्याची यथेच्छ टिंगल टवाळी करावी असे कैक प्रसंग माझ्या बालपणी मी पचवले आहेत. पण कल्पकता हा माझा स्थायी भाव असल्याने वाढत्या वयाबरोबर ती वाढतच गेल्याचे मला प्रकर्षाने जाणवले आहे.  

पण हल्ली हल्ली विशेषतः लमालसाठी लिखाण करायला घेतल्यापासून माझी कल्पकता कमी झाली आहे असे मला वाटायला लागले. म्हणजे हेच बघा ना की कुठलाही विषय दिला की साधारण १/१.५ महिना मला काहीच सुचत नाही.  सुचायला लागलं कि मन कुठंतरी भरकटते आहे असं वाटतं. पूर्वी हा हा म्हणता आठवड्यात ४ कविता आणि २ दीर्घ लेख किंवा गेला बाजार २/४ लघु कथा लिहिणारा मी एकदम असा कल्पनाखोर (दिवाळखोरच्या धर्तीवर) होईल असे मला मला कधी वाटले नाही.  बरोबर जमलेली मंडळी त्यांचे छान छान लेख वाचून दाखवतात, व टाळ्या शिट्ट्या मिळवतात आणि मला मात्र मक्ख चेहऱ्याच्या प्रतिक्रिया पाहाव्या लागतात  किती ओशाळल्यागत होतं म्हणून सांगू .. छे हे काही खरं नाही!. कल्पना सुचत नाही म्हणजे काय .. काहीतरी केलंच पाहिजे ह्या विचाराने मी पछाडला गेलो. अशा अवस्थेत काही दिवस घालवल्यावर मी यावर काय उपायजोजना करता येतील ह्याचा विचार सुरु केला.

सर्व प्रथम जवळच्या ग्रंथालयात जाऊन 'कल्पकता आणि सर्जनशीलता यांचे व्यवच्छेदक विश्लेषण' नावाचा ६०० पाणी ग्रंथ आणला. ह्या विषयात तज्ज्ञ असलेल्या एका प्रसिद्ध लेखकानेच तो लिहिला होता. आता तो ग्रंथ वाचला कि झाले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल याची मला खात्री होती.  पण झालं उलटंच -- त्या दिवशी आमच्या हिनं मस्त पुरी व कांदा बटाटा रस्स्याचा बेत केला होता.  बाकी आमची ही काय फक्कड रस्सा करते.. तिच्या हाताची पुरी आणि रस्सा माझा 'वीक पॉईंट'  त्यामुळे जेवण जरा अंमळ जास्तच झालं -- अर्थात त्या ग्रंथाचा उपयोग हा जड झालेल्या डोक्याला आधार म्हणून झाला हे दुपारच्या चहाला हिन उठवलं तेंव्हाच कळलं!
हे असं पुस्तक वाचून वगैरे काही कल्पकता वाढणार नाही हे थोड्याच वेळात लवकरच माझ्या ध्यानात आलं   मग एकदम सुचलं.. आता जरा पम्प्याला विचारलं पाहिजे.
पम्प्या म्हणजे पंकज परांजपें -- माझा बालमित्र -- आद्याक्षर जुळवून  त्याचा "पम्प्या" झाला   शाळेत असल्यापासूनच त्याचं डोकं वेगळं चालायचं. त्याची गती शिक्षकांना समजली नाही ते त्यांचं दुर्दैव!  पम्प्याला ज्या कल्पना सुचत त्याचा वापर केला तर राष्ट्राची एकदम वेगवान प्रगती होईल यात शंका नाही असे त्याचे मत आहे.  कधी कधी त्याच्या कल्पना अंमलात आणताना अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागत.. मागे त्याने घरी पाळलेल्या गोल्डफिशला प्राणायाम शिकवायचा प्रयत्न केला होता तो फसला .. पण कल्पक माणसाच्याकडून चुका होणारच नाही का?
तर मी पम्प्याला घेऊन शेजारच्या इराण्याच्या हॉटेल मध्ये गेलो.. त्याच्या आवडीची  टोस्ट अन चहा मागवला.  चहा आणि टोस्ट पोटात गेल्यावर पम्प्याची गाडी सुरु झाली..
"बोल बाबू नक्की काय प्रॉब्लेम आहे?"
"काही नाही रे -- मला ना नवीन कल्पनाच सुचत नाहीत बघ. काय करावं कळत नाही." मी थेट विषयालाच हात घातला.
"बरं धिस इस अ केस ऑफ क्रीएटिव्ह ब्लॉक" -- पम्प्या जोमात आला कि त्याची गाडी इंग्लिशवर घसरते..
"ह बोल काय करू शकतो?"
"अरे सोपं आहे.. तुझा आहार बदल.. इट ऑल कम्स डाउन टू फूड यू नो "
"म्हणजे? आता काय करू"
"अरे हेच बघ ना -- कॉलेजला असताना तुला खूप कविता शेर सुचायचे कि नाही? आठवं आठवं -- नाहीतर प्रियाला विचार !"  मिस्कील हसत टोस्टचा तुकडा खात पम्प्या म्हणाला.
हे मात्र खरं होत कॉलेज मध्ये प्रियाला पटवताना अनेक कविता सुचायच्या .
"हो ते खरं .. पण त्याचा काय संबंध?"
"आहे, संबंध आहे! तेंव्हा तू काय खात होतास? रिमेम्बर -- फक्त मॅगी, रोमेन नूडल्स आणि वडापाव. आय टेल यू बाबू ह्या वडापामुळेच अनेकजण चांगले लेखक झालेत.. "
पम्प्याच्या बोलण्यात तथ्य दिसलं म्हणून मग मी नेहमीच जेवण सोडून सकाळ संध्याकाळ मॅगी आणि वडापावचा रतीब लावला.  कल्पनाशक्ती मध्ये जरी काही बदल दिसला नसला तरी शारीरिक आकारात मात्र बदल लगेच जाणवायला लागला.. शिवाय रोजच जेवण उरायला लागलं त्यामुळे प्रियाला पण मी बाहेर मित्राबरोबर सामिष खात असावा असा नाहक संशय येऊ लागला.
हे काही फार काळ टिकणारं नव्हतं म्हणून मी परत पम्प्याला सांगितलं.

"बाबू - तू योगा करतोस का?"
"अरे तू सांगितलेले वडापाव आणि मॅगी खाऊनच असा आकार झालाय १५ दिवसात . आता काय आणखी मस्करी करतोस?"
"अरे नाय रे..  मी कालच एक लेख वाचला आणि मला कळलं कि तुला काही सुचत का नाही ते"..
"सांग तर खरं.."
"हे बघ .. मला सांग तुझं काम कसं -- बैठं! - सारख आपलं ते कॉम्पुटर पुढं बसायचं आणि तो कीबोर्ड बडवायचा"
"त्याचा काय संबंध?" मी त्रासिकपणे विचारले.
"आहे .. संबंध आहे. त्यामुळे सगळं रक्तप्रवाह पायाकडे वाहतो आहे .. मेंदूला पुरेसं रक्त मिळत नाही त्यामुळे त्याची वाढ खुंटली आहे!"
मेंदूची पण वाढ या वयात होत असते यावर माझा विश्वास बसला नाही पण पम्प्याचे वाचन अफाट असल्याने असल्या शंका विचारणे म्हणजे त्याचा अपमान झाला असता.
"तू एक काम कर.. शीर्षासन करायला लाग.. रोज १५ मिनिटं आणि बघ कशा सटासट कल्पना सुचतात तुला.." समोरचे भजे खात पम्प्या म्हणाला..
पम्प्या वाक्य प्रमाणम मानून मी एक योगा करायचे साहित्य घेऊन आलो. 
तेवढं एक काम पंकजभाऊजींनी चांगलं केलं असा माझ्या पोटाकडे बघून हीन केलेला तिरकस शेरा मला ऐकू आला पण त्याकडे दुर्लक्ष करून आता कल्पनाशक्ती वाढणार या उमेदीने मी सुरुवात केली. 
शीर्षासन करण ही सोपी बाब नाही हे न कळण्याइतका माझा मेंदू खुंटला नव्हता .. त्यामुळे मी भिंतीच्या आधाराने सुरुवात केली. दोन उश्या व त्यावर डोके ठेवून उलटा झालो खरा पण तेवढ्यात पाय लागून वरचे शेल्फ खाली आले -- त्यातली शोपीस, फोटो फ्रेम, पुस्तके, घड्याळ हि एकेक वस्तू मित्राच्या मदतीला धावावी अशाप्रकारे खाली आली .. काचेच्या शोपीस डोक्यात दाणकन आपटला.. आणि वाढत्या वयानुसार वाढलेल्या शरीराचा भार पुरेसा रक्तप्रवाह न झालेली मान सोसू न शकल्याने लचकली.

तेंव्हापासून मी कल्पनाशक्तीचा विकास कसा होईल या विवंचनेत आहे. तुम्हाला काही कल्पना असेल तर सांगाल का?  


Monday, June 11, 2018

स्पर्श

स्पर्श
-----------
लमालचा विषय स्पर्श आहे असं ऐकल्यावर माझं मन एकदम फिरायला गेलं आणि ज्याला ज्याला स्पर्श करून आलं त्याच हे संकलन. .. .. तसं पाहिलं तर हे सगळं भरकटलेलं लिखाण आहे पण तरी त्यातून काही नवीन माहिती मिळेल असं वाटतं. 

त्वचा हा पंचेंद्रियांमधला सगळ्यात मोठा अवयव/ इंद्रिय.  कापऱ्या थंडीचा किंवा उन्हाचा स्पर्शच आपल्याला त्याची जाणीव करून देतो. आपल्याला स्पर्श जाणवतो त्यामागची प्रक्रिया मात्र मोठी आहे. आपण किती गोष्टी गृहीत धरून असतो ना .. त्यातलीच एक स्पर्श संवेदना.. किती गोष्टी कळतात फक्त स्पर्शातून? वस्तूचे तापमान, पोत (गुळगुळीत किंवा खरबरीत पणा) एवढंच नाही तर स्पर्शामागची भावना देखील!   हे सगळे वर्गीकरण करण्याची प्रक्रिया मेंदू क्षणार्धात करतो! मला वाटतं स्पर्श साठवून ठेवण्याची काहीतरी वेगळी केंद्रे असतात.  नवीन स्पर्श झाल्याने जुन्या आठवणी पुसल्या जात नाहीत. कधीकधी तर त्या उफाळून जाग्या होतात. (हे दोन्ही चांगल्या व वाईट बाबतीत होते.) बघा कदाचित तुम्हाला अजूनही लहानपणचे काही स्पर्श आठवत असतील..आईनं/आजीनं  केलेलं अवघ्राण असेल किंवा पहिल्यांदा गरम चटका बसला ते असेल.. अर्थात सगळे स्पर्श लक्षात राहतीलच असे नाही.  स्पर्शसंवेदना शरीरात विषमपणे पसरलेली असते. म्हणजे हात, जीभ, ओठ येथील स्पर्श पाय किंवा पाठीवरील स्पर्शापेक्षा हजारो पटीने अधिक तीव्रतेने जाणवतो. 
***
काही वर्षांपूर्वी काही मनोवैज्ञानिकांनी एक प्रयोग केला.  ३ ते ५ वयोगटातील काही मुले व त्यांच्या आया एकत्र केल्या. काही वेळाने मुलांना एका खोलीत ठेवले व आयांना दुसऱ्या खोलीत.  प्रत्येक मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि सर्व आया ज्या खोलीत होत्या त्या खोलीत सोडले. फक्त स्पर्शाने मुलाला आई ओळखता येते का हे पाहायचे होते.   जवळ जवळ सगळ्यांना आपापली आई फक्त स्पर्शाने ओळखता आली (ह्यात कदाचित थोडा भाग वासाचा पण असावा.) म्हणजे एवढ्या लहान वयात मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसताना देखील स्पर्शज्ञान अचूक असतं .. एवढंच कशाला अगदी तान्ह्या बाळाला देखील त्याच्या आईचा स्पर्श व इतरांचा स्पर्श अचूक ओळखता येतो हे कळून येते. ही स्पर्शाप्रगल्भता वयानुसार वाढत जाते का? की काही काळानंतर आपण आपली संवेदनशीलता हरवून बसतो व त्यामुळे ती कमी कमी होते? आपल्याला जवळची माणसे स्पर्शाने कोण आहे हे ओळखता येईल का? (इथे जवळची हा शब्द मानसिक अंतराशी संबंधित आहे हे जाणकारांनी ओळखलेच असेल.)
 
***
तुम्ही पीटर कॉलिन्सचे नाव कदाचित ऐकलेही नसेल.    त्याच्यावर पोलीस सहकाऱ्याचा खून केल्याचा गुन्हा आहे. तो गेले ३० वर्ष कॅनडाच्या तुरुंगात आहे.  शिवाय हा एकांतवास आहे म्हणजे त्याचा कुठल्याही माणसाशी थेट संपर्क अतिशय कमी प्रमाणात येतो.  विचार करा -- गेले कित्येक वर्षे एकांतवासात, ६ फूट बाय ९ फूट मध्ये काढलेला हा माणूस .. त्त्याच्या तुरुंगात एक माशी शिरली व ती त्याच्या पाठीवर, तोंडावर बसत होती.  त्यावरून त्यानं "व्हॉयसेस फ्रॉम सॉलिटरी" हा लघुचित्रपट केला आहे.  माणसाला स्पर्शाची भूक किती असते ह्याच ते हलवून सोडणारं, हृदयस्पर्शी आणि अंतर्मुख करणारं भाष्य आहे.  (ह्या लघुचित्रपटाचा दुवा येथे आहे.)  हि माणसाची भूक स्पर्शाची आहे. लैंगिकतेचा पूर्णतः अभाव असणारी. आईच्या डोक्यावर फिरणाऱ्या हाताची असेल, वडीलधाऱ्या व्यक्तीची पाठीवरील थाप असेल, मित्राने मारलेली टप्पल असेल किंवा कुणी प्रिय व्यक्तीने दिलेले आलिंगन असेल. ह्या सगळ्यातून ती भागत असते. त्यामुळे सर्वसामान्यपणे आपल्या ती लक्षात येत नाही. नाहीतर स्पर्शाशिवाय मानसिक संतुलन ढळण्याचे पण प्रकार घडतात. PTSD ने त्रस्त असलेली माणसे मानवी स्पर्शाची भुकेलेली राहतात असे मी मागे वाचले होते.

ह्याच्या उलटही प्रकार आहेत. वैद्यक शास्त्रात ज्याला डायस्थेशिया म्हणतात त्या नुरोलॉजिकल ऑर्डर मध्ये स्पर्शसंवेदना इतकी तीव्र असते कि त्या रुग्णांना कपड्याचा व कुठल्याही स्पर्शाचा त्रास होतो.  कधीकधी हि गुणसूत्रानुसार घडलेली विचित्र किमया असते. त्याला epidermolysis bullosa किंवा  बटरफ्लाय  डिसीज म्हणतात. त्वचेला हात लावला कि तेथे त्वचा फाटते!    अर्थात हे प्रमाण १० लाखात ३०-५० एवढं कमी आहे. जन्मजात हा आजार असलेल्या बाळांना हात लावता येत नाही, कुशीत घेता येत नाही.. त्यांच्या आयांची किती प्रचंड घुसमट होत असेल कल्पना देखील करवत नाही!
***
अंध लोकांचे स्पर्श ज्ञान अधिक तीव्र असते. कदाचित एक इंद्रिय (डोळा) निकामी झाल्याने दुसरे अधिक कुशाग्र करायची हि निसर्गाची क्लृप्ती असावी.  अर्थात जन्मतः अंध आणि अपघाताने अंध ह्यात फरक पडतो.  अपघाती अंधेपण आले असेल तर स्पर्शशक्ती त्वरित विकसित होत नाही.  अंध लोकांना कळाव्यात म्हणून भारतात (आणि अनेक) देशांत नोटांचे आकार वेगवेगळे असतात. पण अमेरिकेत सर्व नोटांचे आकार सारखे असून देखील अंध व्यक्ती चलन कसे ओळखतात हे मला कोडंच आहे.  दृश्य प्रतिसाद (visual feedback) नसल्याने स्पर्श संवेदना हेच त्यांचे संवादाचे माध्यम होते. स्पर्शातून येणारी कंपने त्यांचा मेंदू अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकतो व त्याचे आकलन करू शकतो.  (अंध व्यक्तीवरून आठवलं की सर्वमान्य झालेली ब्रेल लिपी विकसित करणारा लुई ब्रेल हा जन्मतः अंध नव्हता. तो ५ वर्षाचा असताना एका अपघाताने त्याचा एक डोळा निकामी झाला आणि जंतुसंसर्गाने दुसराही त्याला गमवावा लागला. अनेकांना तो जन्मतः अंध होता असे वाटते म्हणून सहज नमूद करावेसे वाटले) )

अंध व्यक्तीसारखी स्पर्शांध व्यक्ती पण असतात! त्यांना कोणताही अमानवी स्पर्श समजत नाही. अशी व्यक्ती ब्रेल लिपी देखील वाचू शकत नाही. हे होण्यामागची कारणे अजून शास्त्रज्ञांना ज्ञात झाली नाहीत.

स्पर्श विषयाला अनुसरून (कुठल्या कुठे) भरकटलेले हे लिखाण आता आवरायला हवे. वेळ झाला तर मी वर दुवा दिला आहे ती चित्रफीत जरूर पहा.  तुमच्याकडे "स्मार्ट" फोन असेल आणि त्यावर हे वाचत असाल तर केवळ त्या दुव्याला स्पर्श केलात की झाले!

स्पर्शाख्यान पूर्ण!

सागर साबडे
संदर्भ:
(२) https://wikivisually.com/wiki/Devanagari_Braille
(३) https://archive.org/stream/SixDots-LouisBraille-Marathi/SixDots-Marathi_djvu.txt
(४) https://broadly.vice.com/en_us/article/d3gzba/the-life-of-the-skin-hungry-can-you-go-crazy-from-a-lack-of-touch

Monday, December 11, 2017

नियती (Ek laghukatha)

                                                                                  नियती                                                                                           
 
                                                                                      * १ *
लक्ष्मीनं गडबडीत दार उघडलं.  आत तिचा नवरा बल्लाळ आढ्याकडे डोळे लावून पडला खाटेवर होता.  लकवा पडल्यापासून गेले ३-४ वर्षे त्याचे हेच हाल होते.  सुरवातीला जवळपासचे नातेवाईक व शेजारी गप्पा मारायला काही हवं नको पाहायला यायचे. पण त्याचे शब्द कळायचे नाहीत मग हळूहळू लोकांचं येणं बंद होत गेलं. आता तर वाड्यातून बाहेर पडताना सुद्धा शेजारी विचारत नाहीत.  म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे!  नवऱ्याची आमदनी बंद झाली व घरातल्या वस्तू मोडून खायची वेळ आली तेंव्हा लक्ष्मीला कामासाठी बाहेर पडणे भाग पडले.  ओळखीने ४-५ लोकांच्या घरचे धुणी भांडे व साफसफाई चे काम मिळाले व हात तोंडाची गाठ पडायला लागली.  बरोबर आणलेला भात तिनं रश्श्यात कालवला व नवऱ्याला उठवून भरवायला लागली. कसेबसे २-४ घास खाल्ले आणि अन्न त्याच्या तोंडातून बाहेर पडायला लागलं .. खाटेवर पडून पडून बल्लाळ वैतागला होता.  कुठून आपल्या नशिबात ही परावीलंबत्व आलं! यापेक्षा मरण परवडलं असच त्याला वाटायचं.   लक्ष्मी पण या प्रकाराला वैतागली होती. रोज ४ घरची कामं करायची, लोकांची बोलणी खायची आणि जे शिळंपाकं मिळेल ते खायचं याचा तिला उबग आला होता.  देवाला आणि दैवाला तरी किती दिवस दोष देणार? उगवलेला दिवस कसातरी रेटायचा एवढच तिला माहिती होतं.  त्या पलीकडं तिच्याकडं काहीच उपाय नव्हता. 
                                                                                               * २ *
आय सी यू च्या बाहेरच्या कक्षात मीरा शून्य नजरेने बसली होती.  कायरा ला ऍडमिट केल्यापासून आता २ आठवडे झाले होते.  कसल्यातरी फूड पॉइझनिंगच निमित्त झालं आणि गोळ्यांची रिऍक्शन आली हसत खेळत असणारी गोड कायरा हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. तिच्या चिवचिवाटाने घर कसं भरून जायचं! आता घर खायला उठतं.  डॉक्टर प्रधानांनी सांगितलं कि आता 'किडनी ट्रान्सप्लांट' शिवाय काही पर्याय नाहीत.  मीरा आणि मधुने सगळ्यांना सांगितलं होतं -- फेसबुक, व्हाट्सअँप वर सगळ्यांना जमेल तेवढे संदेश पाठवले होते पण अजून काही यश नव्हतं.  "या गोष्टी प्लॅन करता येत नाहीत" असे प्रधान डॉक्टर म्हणाले आणि पटत जरी असलं तरी कळत पण वळत नाही अशी तिची अवस्था आली होती.  मीरा व मधू दोघे मोठ्या पदावर काम करत होते. एकुलत्या एक कायरासाठी कितीही पैसे खर्च करायची त्यांची तयारी होती.  पण सगळे प्रश्न पैशाने सुटतात थोडेच?  उपाय माहिती आहे, पण तरीही अजून साध्य नाही! परिस्थितीनं लादलेली अगतिकता  व त्यानं आलेला हताशपणा तिच्या नजरेत साफ दिसत होता.  मधूने हलकेच तिच्या डोक्यावर थोपटलं -- त्याच्या खांद्यावर तिनं डोकं ठेवलं आणि डोळ्यातल्या आसवांना मुक्त्तपणे वाट करून दिली.

                                                                                               * ३ *
साबुदाण्याएवढ्या दाण्यांन एवढ होतं ह्यावर लक्ष्मीचा विश्वास बसेना.  पण धोतरीच्या फुलाचं बी खाऊनच म्हातारा मेला असं किसन सांगत होता.  तिनं हातातल्या त्या फुलाकडं व चिमुकल्या बीकडं परत साशंकतेने पाहिलं.  किसनाचा म्हातारा किती शांत व समाधानी दिसत होता मेल्यावर ते तिला आठवलं.  पूर्वी सैन्य हरल्यावर शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून त्यांच्या स्त्रिया धोतरा खाउनच मरणाला जवळ करायच्या असं ऐकलेलं पण तिला आठवलं.  खरं होतं कि नाही ते आता जीवनाची लढाई हरलेली लक्ष्मी पाहणार होती.  तांदुळाच्या पेजेमध्ये तिन सगळं फुल कुस्करून व बिया वाटून टाकल्या.   नवऱ्याला खाटेवर बसतं करून त्याला पेज पाजली. गेल्यादिवशी पोटात अन्न न गेल्याने कदाचित पण त्याने ती अधाश्याप्रमाणे ओरपली.  लक्ष्मीला हुंदका आला.  उरलेली पेज तिन पिऊन टाकली.  तिला थोड्याच वेळात चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं.  म्हणून दार उघडलं आणि दारातच ती कोसळली.  इतरांसाठीचा अपाय हा तिच्यासाठी उपाय ठरला होता.
                                                                                       * ४ *
"मॅडम, लक्ष्मी गिरमिसे तुमच्याकडे कामाला होत्या का?"   पोलीस इन्स्पेक्टर मीराला विचारत होते.
"येस, म्हणजे आहे." मीरानं सांगितलं. 
"त्यांचा व त्यांच्या नवऱ्याचा काल विषबाधेने मृत्यू झाला.  तुमच्याकडून त्यांनी पदार्थ नेले असतील तर त्यांची आम्हाला तपासणी करावी लागेल."
"व्हॉट? काळ सकाळीच तर ती आली होती." मीराचा विश्वासच बसेना. काल लक्ष्मीला उरलं सुरल काय दिलं ते ती आठवायला लागली.
"हो आम्हाला दुपारी फोन आला त्यानुसार आम्ही चौकशी करत आहोत.  लक्ष्मीची परिस्थिती तिला साधारण माहिती होती. २ आठवड्यापूर्वी पगार वाढवा म्हणून ती सांगत होती पण मीराची मनस्तिथी ठीक नसल्याने तिने तिला उडवूंन लावलं होतं.  
काही न बोलता मीरा इन्स्पेक्टरला नमुने घेण्यासाठी स्वयंपाकघराकडं घेऊन गेली.


                                                                              * ५ * 

तिसऱ्या रिंगला मीराने फोन उचलला. 
"मीरा, कुठे आहेस तू?" मधू एकदम उत्तेजित आवाजात बोलत होता.
"अरे ती आपल्याकडची लक्ष्मी ..."
"ते जाऊ दे -- लिस्टन गुड न्यूज फॉर यू.  डॉक्टर प्रधान ना कायरासाठी मॅचिंग डोनर मिळाला. मी हॉस्पिटलला जातोय. तू पण लगेच निघ. आपल्याला काही फॉर्मलिटीज पूर्ण करायच्या आहेत. आपल्याला कायरासाठी उपाय सापडला -- शी इज गोइंग टू बी आलराइट!  चाल बाय -- निघ लगेच तू".
पुढंच न ऐकताच मधून फोन ठेवून दिला. 
   
                                                                            * ६ *

डॉ प्रधानांनी सगळी प्रोसिजर समजावून सांगितली.
"एनी मोर क्वशन्स?" सोनेरी काड्यांच्या फ्रेम मधून बघत त्यांनी विचारलं. 
मधूने सही करण्यासाठी पेन काढलं.  तेवढ्यात मीरा म्हणाली "मे आय नो द डोनर डॉक्टर?"
"सॉरी - ते नाही मला सांगता येणार.  फक्त मी एवढच सांगू शकेन कि एका कुटुंबाचा काळ विषबाधेने मृत्यू झाला अँड वूमन्स किडनी इस परफेक्ट मॅच फॉर कायरा"!
मीरानं मधुकडं पाहिलं. कायरा पूर्ववत होणार ह्या आनंदापलीकडे त्याच्या डोळ्यात कुठल्याच भावना नव्हत्या... 
उपाय मिळाला पण तो असा मिळेल हा दैवदुर्विलास मीराला अंतर्मुख करून गेला.

                                     *** समाप्त ****

Tuesday, October 31, 2017

Athavanitalya gosti..

आठवणी कशा एकदम भर्रकन येतील सांगता येत नाही..  निलयला बटर खूप आवडतं -- परवा नान गरम करून पानात वाढल्यावर त्याने पूर्ण बटर ची 'स्टिक' त्यावर फिरवली व गरमागरम नान वर छोटा थर तयार झाला -- मग त्याने तो आधी बोटाने थोडा खाल्ला.. ते पाहून मला आजी ताक करत असताना लोण्याचा गोळा कशी हळूच माझ्या तोंडात घालायची ते आठवलं.. आणि कधी भाकरी केली असेल तर त्यावर मस्त लोण्याचा गोळा व लसणाची चटणी लावून द्यायची ते आठवलं ... अहाहा काय स्वर्गसुख होतं ते खाणं म्हणजे! आजीचं प्रेम त्यात ओथंबून भरलेलं असायचं नि त्यामुळेच त्याची गोडी अवीट वाटायची.
दुसरी अशीच आठवण अली.. निलयला लसूण सोलायला सांगितलं आणि मृणाल म्हणाली २/३ दे - तर त्यानं विचारलं कि २/३ म्हणजे २ + ३ का २ का ३ का २x३?  मला गम्मत वाटली.. असं दादा अनेकदा म्हणत असत.  ४-५ द्या म्हणलं कि ४ + ५ कि ४X५ असा त्यांचा तर्क सुरु असे.  हा विचार करायची पद्धत हि जीन्स मध्ये येते का? असा मला प्रश्न पडला..

Friday, October 20, 2017

Appreciation of imprection

This thought came to my mind during my reflective silence.

No moment will be perfect. But when you begin to appreciate the imperfection of a moment, you have begun to understand how to live life.

This is true no matter what you are doing.  No matter what you get, you will find something amiss -- and it is up to you whether you focus on what you have, repent/regret for what you are missing or strike a balance and appreciate it.

Wednesday, September 20, 2017

Dying Everyday

One of the thoughts from JK that has resonated with me is "to die every day".  Taken out of context it sounds a bit bizarre and absurd.  But what he really means is to die to your memories, emotions, and huge psychological conditioning everyday.

Can we simply live from moment to moment? Can we learn to not carry burden of the past or aspirations for the future? Can we simply live "here and now"?

It's easy to blame, hard to understand

How often we blame weather forecaster for not being accurate?  It's easy for a common man to blame as he doesn't understand intricacies of the forecasting.

But it is very complex science and chaotic as shown by Edward Lorenz


https://www.bbvaopenmind.com/en/when-lorenz-discovered-the-butterfly-effect/?utm_source=facebook&utm_medium=social&utm_campaign=rrssOpenMind&utm_content=mariposa