Wednesday, June 16, 2021

आभासी खाणं!

 

आभासी खाणं!

ते काही नाही आता फार झालं! मी आता मार्ककडं निषेध मोर्चाचं नेणार आहे आणि मला खात्री आहे कि मी एकटा नसेन - माझ्यासारखे अनेक ह्याने पोरखळलेले असणार! अगदी तुमच्यातले काही सुद्धा!

काय नाही कळलं? अहो, हो मी झुकरबर्ग पुत्र मार्क बद्दलच बोलतोय! तो आणि त्यानं आम्हाला लावलेलं फेसबुकचं व्यसन. चार नवीन मित्र जोडावेत, जुने मित्र शोधावेत, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून फेसबुकशी जोडला गेलो तर ते आता चांगलंच अंगाशी आणि तोंडाशी आलंय आणि अक्षरशः तोंडघशी पडायची वेळ आलीय. 
कसं ते  सांगतो. एक तर ह्या कोरोनामुळे गेलं वर्ष दिडवर्ष कुठेही बाहेर जाता येत नाहीये. त्यामुळे साहजिकच फेसबुकवर माझी उठबस (खरं तर इथे "बस"णेच जास्त!) वाढली. सुरुवातीला नवीन मित्र आणि काही जुन्या मैत्रिणीशी  (हाय.. एक छोटी कळ आल्यासारखं वाटलं छातीतून!) संपर्क झाला. मार्कने जणू तर आमच्यावर नजरच ठेवली होती..  रोज मला अगदी  नवीन नवीन मित्र/मैत्रिणी सुचवू लागला. आता नाव ओळखीची वाटली आणि या वयात कोण कसा दिसत असेल ह्या उत्सुकतेपायी मी धडाधड सगळ्यांना माझ्या मित्र-वर्तुळात (friend circle हो!) सामावून घेतलं. आता मार्कचं अल्गोरिथम फार काही परिपूर्ण नसल्यानं त्यात काही आमच्या सौंच्या मैत्रिणीपण जोडल्या गेल्या. आता तुम्हीच सांगा 'मानसी नाईक, भावना प्रधान, केतकी कुलकर्णी'' या नावानं आलेल्या फ्रेंड रीक्वेस्ट कोण बरं अव्हेरू शकेल?

सुरुवातीचे दिवस खूप छान होते. सगळं काम घरून सुरु होतं.  बाहेर जाण जरी बंद झालं तरी फेसबुकमुळे सगळे जणू रोज आवर्जून घरी  येत होते. मग जुनी शाळा, तेंव्हाचे शिक्षक, कोण कुठे आहे, काय करतो, कुणाचे कुणाशी लग्न वगैरे गप्पा झाल्या. लहानपणी खाल्लेल्या चिंचा बोरं आवळ्यापासून वाटून खाल्लेल्या डब्याच्या आठवणी दाटून आल्या. पूर्वी क्वचितच गेलेल्या हॉटेलिंगचे दिवस आठवले. कुठल्या हॉटेल मध्ये काय चांगलं मिळायचं याच स्मरणरंजन झालं.  कुठली हॉटेल बंद पडली यावर हताश सुस्कारे सोडून झाले! आणि या मध्ये कुणीतरी पदार्थ करून त्याचे फोटो टाकायची टूम काढली आणि हा उपक्रम सुरु झाला.

झालं - मग काही विचारू नका! एकीने काहीतरी करावं, दुसऱ्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडावा, कमेंट्स कराव्यात आणि त्यावर कुरघोडी करण्याच्या सुप्त उद्देशाने तिसरीने आणखी एक फोटो टाकावा ही प्रथा सुरु झाली! आता खोटं कशाला बोला, नाही म्हणायला मलाही सुरुवातीला हा प्रकार आवडला.. कुणीतरी पोहे करावेत, त्यावर छान कोथिंबीर, खोबरे घालून सजवावेत आणि तो फोटो शेअर करावा.. मग त्याच्याशी स्पर्धा म्हणून कुणीतरी शिरा, उप्पीट, मिसळ अशा पदार्थांची रांग लावावी. त्यांना शह देण्यासाठी कुणी एकीने चकल्या, चिरोटे कड मोर्चा वळवावा तर त्याला काटशह देण्यासाठी कुणीतरी थेट पुरणपोळीची वर्णी लावावी! अहाहा.. एकेक फोटो बघून, त्यावरची वर्णन वाचून, कमेंट्स पाहून जीव सुखावला नाही तरच नवल!  आता नाही म्हणायला 'थोडं अहो रूपं अहो ध्वनी' झालं - पण ते होणं स्वाभाविकच होत. अहो मार्कबाबांचा सगळा धंदाच यावर आधारित आहे म्हणा! हे छान फोटो बघून मलाही चार घास जास्त जात होते.  (घरूनच काम सुरु होत त्यामुळं ऑफिसाचे कपडे घालण्याची सक्ती नव्हती त्यामुळे त्या चार घासाची करामत काही कळलं नाही) घरचा अंमळ बेचव उपमा खात असताना कुणी अस्मिता कुलकर्णीच्या हातचा उपमा आपण खात आहोत अशी कल्पना करावी - आणि त्याला काय वेगळीच चव येते हे तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय नाही कळणार! अर्थात सोयीने पदार्थ आणि करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलण्याची मुभा आहे.  

अर्थात ह्या सगळ्या प्रकारात वेळी अवेळी भूक लागणं, भूक लागलेली नसतानाही लाळ टपकण, असे प्रकार घडतात. पण ते सारे क्षम्य आहेत.    

सगळं छान सुरु होत पण आंतरराष्ट्रीय महिला दिन आला आणि परत कुणाच्या तरी सुपीक (!) डोक्यातून कल्पना आली की त्यादिवशी पुरुषांनी काहीतरी करून खायला घालायचं आणि त्याचे फोटो टाकायचे.  मग काही उत्साही पुरुषांनी खरोखरीच हा प्रकार सुरु केला. यातले काहीजण पुढे हॉटेल मॅनेजमेंट करणार होते, मोठे शेफ बनणार होते, पण त्यांच्या दुर्दैवाने (आणि आपल्या सुदैवाने) बी कॉम करून कुठल्यातरी बँकेत चिकटले होते. त्यांच्या सुप्त इच्छा उफाळून आल्या असणार आणि लगेच त्यांनी हौस भागवली असणार. बर तर बरं फक्त पदार्थाचा फोटो टाकावा तर ते नाही, ह्या मंडळींनी स्वतः  ऍप्रन घालून, किचन मध्ये काम करतानाची सेल्फी टाकायचे नवीन फॅड सुरु केलं! सगळे तुंदीलतनु लेकाचे - स्वतःची ढेरी देखील त्या ऍप्रन मध्ये बसत नव्हती, पण हौस बघा लेको!  मी २/४ दिवस चालढकल केली पण ह्या नवीन मित्र मैत्रिणींनी काही पिच्छा सोडला नाही. मग हिनेच केलेल्या ऑम्लेट सँडविच चा फोटो टाकला आणि खाली "हॅप्पी वूमेन्स डे!" असं लिहून टाकलं! सुरुवातीला दोन चार मित्रांनी कौतुक केलं, पण त्या कौतुकात "फोटो किती छान आलाय, अंड्याचा पिवळा रंग कसा सुंदर दिसतोय" अशा प्रकारची टिप्पणीच जास्त होती.  (असो,एकेकाचं नशीब!) पण तेवढ्यात कुणी क्षमा नामक युवतीने आमच्या सौना टॅग केलं.  झालं  या कृतीला आमच्या घरी मात्र क्षमा नव्हती! त्यावरून घरी जो हलकल्लोळ झाला तो काय विचारता! मी एका कृतीत किती चुका केल्या त्याच पुन्हा पुन्हा उच्चारण झालं.  दुसऱ्या व्यक्तीनं (म्हणजे हिने) केलेल्या पदार्थाचा नकळत फोटो काढून तो परस्पर असा स्वतःची कलाकृती म्हणून जाहीर करणं, त्याच श्रेय ढापणं आणि वर  त्याची सोशल मीडिया वर खोटी जाहिरात करणं! किती अनन्य अपराध! याच परिमार्जन करण्यासाठी  काय करावं लागलं ते माझं मला माहित. एकतर माझ्या सर्व नवीन मित्र मैत्रिणीची यादी तपासण्यात आली त्यातील सौंच्या मैत्रिणींना फ्रेंड लिस्ट मधून वगळावं लागलं.. (बिचाऱ्या मानसी, भावना, केतकी किती गैरसमज झाला असेल त्यांचा!) शिवाय केलेल्या अपराधाची सजा म्हणून गेले कित्येक दिवस मला स्वयंपाक करावा लागला. त्याचे फोटो काढण्यास अजिबात परवानगी नव्हती. जे तयार होईल, जसे तयार होईल तसे खाणे भाग पडले.

अजूनही मला फ्रेंड रिक्वेस्ट येतात पण आता जरा मी सावधानतेने पावले उचलतो आहे.  पाक कला स्पर्धा, पाककृती अशा पोस्ट अजून येत आहेत, त्यात आता व्हाट्सअँप ची भर पडली आहे. आणि हे सगळे बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठीच मी मार्कच्या घरी मोर्चा नेणार आहे. या विषयावर संसदेत चर्चा घडावी, कायद्याने यावर बंदी यावी आणि माझ्यासारख्या अनेक जणांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मी कटिबद्ध आहे.  मोर्चाची तयारी? हो करणार आहेच - फक्त आज थालीपीठ करण्याची हिच्याकडून ऑर्डर आहे ती पूर्ण झाली की तीही करेन!