Tuesday, February 19, 2019

Mukti - inspired by J Krishnamurti's writing

मुक्तीचा ध्यास   

- सागर साबडे

आपण एक छोटा प्रयोग करूया.. खालील वाक्ये वाचा.  प्रत्येक वाक्यानंतर तुमच्या विचारांचे निरीक्षण करा. 

१. कोर्टानं आज निकाल दिला. जेम्सला जन्मठेप झाली.
२. जेम्सला २ लहान मुलं आहेत -- एक पाच वर्षाचा आणि एक २ वर्षांचा. 
३. जॅम्सची बायको ६ महिन्यापूर्वीच एका अपघातात गेली.
४. त्या अपघाताला जेम्स जबाबदार होता असं कोर्टात सिद्ध करण्यात आलं.
५. जेम्स गाडी घरी दुरुस्त करायला घेतली आणि एका चाकाचे बोल्ट्स पूर्ण घट्ट केले नाहीत.
६.  गाडी पूर्ण दुरुस्त झाली नाही असं जॅम्सन एका चिट्ठीवर लिहून ती गाडीला लावली होती.

आता आपण तुमच्या विचाराकडे पाहू.  तुम्ही निरीक्षण केलं का? तुमच्या विचाराच्या लहरी कशा बदलत होत्या? पहिल्या ३ वाक्यांनी कदाचित तुम्हाला जेम्स बद्दल सहानुभूती वाटली असेल. नंतरच्या २ वाक्याने कदाचित ती कमी झाली असेल.  शेवटच्या वाक्याने कदाचित ती परत वाढली असेल.. हे असं का होतं? अर्थात आपल्या मनाचं झालेलं संस्करण (conditioning).
हजारो वर्षांपासून ज्यांना आपण परंपरा म्हणून अंगीकारत आलो आहोत, भाबडया आंधळेपणाने जोपसतो आहोत आणि त्यांनी समाजमनावर एकप्रकारचे गारुड तयार केले आहे.  इतके की ते जोखड आहे ह्याची आपल्याला कणसुद्धा जाणीव नाही आणि ती जाणीव कुणी करून दिली तर त्याला गद्दार ठरवून समाजातून उठवायला आपण तयार आहोत.  वर संस्कृतीरक्षण कसे केले याच्या टिमक्या वाजवायला मोकळे!

तर हे जे आपलं झालेलं conditioning आहे त्यापासून मुक्ती शक्य आहे का? ह्यावर आपण विचार करत आहोत. जर हे कंडिशनिंग चे लिंपण काढायचा तुम्ही  जाणूनबुजून प्रयत्न केला तर ते अधिकच खोल होईल. पण ती अभिलाषा नष्ट करण्याऐवजी जर तिचा उगम शोधायचा प्रयत्न आपण केला तर तर त्या ज्ञानाच्या शोधात आपल्याला इच्छेचा उगम कदाचित सापडेल. आणि ह्या ज्ञानातच कंडिशनिंग पासूनची मुक्ती सामावली आहे. तर हि मुक्ती म्हणजे थेट परिणाम नाही. मी जर एखादी गोष्ट सोडायचा जाणूनबुजून प्रयत्न केला किंवा बंड केले तर त्यातून दुसरे conditioning मी तयार करत असतो. म्हणजे मी एकातून मुक्ती मिळवतो आणि दुसऱ्यात अडकतो.  मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येतंय का?  मी मनात निर्माण होणाऱ्या इच्छेपासून मुक्ती मिळवायचा धडपडून प्रयत्न केला (आणि ह्या इच्छेमध्ये मुक्त होण्याची इच्छापण आली) तर मी ह्या गुंत्यातच अडकून बसेन. कारण हे circular reasoning सारखं होईल. तर हि इच्छेच्या उगमाची स्थिती जाणून घेण्यासाठी मी जागरूकपणे प्रयत्न केले तर मला ह्या conditioning पासून मुक्ती मिळेल आणि हा सर्वस्वी byproduct आहे. तर हि मुक्ती मिळणं महत्वाचं नसून ज्यामुळे कंडिशनिंग होते आहे ते आपल्याला समजणे महत्वाचे आहे.
हे बघण्यासाठी आपल्याला विचारांचा आधार घेऊन चालणार नाही. तुम्ही म्हणाल विचार नसतील तर सगळंच खुंटलं. हे काही विचारानं सुटणार कोडं नाहीये. आपले विचार म्हणजे तरी काय असतं हो? आपल्या स्मृतींचं (memory) एक जाणीवपूर्वक केलेलं संकलन आणि चाकोरीबद्ध आचरण. तुम्ही विचारांशिवाय एखादी गोष्ट कधी पाहिली आहे का? कधी विचारांशिवाय एखादी गोष्ट ऐकली आहे का? (एक क्षण विचार करा:  हे वाचताना तुम्ही तुमचे विचार बघा -- तुम्ही लगेच तुमच्या conditioning प्रमाणे - मग त्यात तुमचे शिक्षण आले, संस्कार आले सगळं आलं -- हे मी सांगतोय त्याच्याशी सहमत तरी होताय नाहीतर हे चूक आहे असं एक defensive कवच करायला जाताय. ) तर कुठलीही प्रतिक्रिया न दर्शविता, नव्हे कुठलीही प्रतिक्रिया मनात न आणता तुम्ही एखादी गोष्ट बघायचा ऐकायचा प्रयत्न केलाय का? तुम्ही म्हणाल सगळ्याच मनाचं conditioning झालेलं आहे. पण हे असे म्हणणे म्हणजे तुम्ही स्वतःला विचारांनी बंदिस्त केले आहे. कारण असे मन असू शकेल ह्या शक्यतेचाच तुम्ही अव्हेर करता आहात.

तर आपल्या मनाला आपल्या conditioning ची जाणीव होणं शक्य आहे का? मला वाटतं ते तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा तुम्ही स्मृतीच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे जात.  जे जे आपल्याला ज्ञात आहे ते सर्व त्यागून मग काहीतरी ऐकता, पाहता. तुम्ही हिंदू आहात, समाजवादी किंवा साम्राज्यवादी आहात, काळे किंवा गोरे आहात, गरीब किंवा श्रीमंत आहात हे तुम्ही "चूक किंवा बरोबर" अश्या तराजूनं ना तोलता, कुठल्या सापेक्षतेच्या चष्म्यातून न बघता समजून घेऊ शकता का? हे इतके अवघड आहे ना की आपण म्हणतो अशक्यकोटीतीलच गोष्ट आहे. पण मला वाटते जेंव्हा तुम्हाला स्वतःची पूर्णत्वाने जाणीव होते जेंव्हा तुम्ही स्वतःचे कंडिशनिंग याहून सुद्धा कुठलीही प्रतिक्रिया न देता स्वतःचे प्रतिबिंब लक्खपणे बघू शकता तेंव्हाच तुम्हाला स्वतःपासून मुक्ती मिळणे शक्य आहे.
हि मुक्ती तुमच्या "अहं" पासून आहे. तुम्हीच तुमच्याभॊवती उभारलेल्या भिंतीपासून आहे. तुम्हीच तुमच्या मनात जोपासलेल्या भीतीपासून आहे. तुम्हीच जपलेल्या दुःखापासून आहे आणि तुम्हीच मानलेल्या सुखापासून सुद्धा आहे. पण हि मुक्ती म्हणजे सुख दुखापलीकडे जाणारा एक चिरंतन आनंद आहे.

===
वर लिहिलेला एक प्रकारचा स्वैर अनुवाद आहे.  मी कृष्णमूर्तींचे तत्वज्ञान वाचतो आणि त्यातून सुचलेले काही विचार मांडले आहेत.

The desire to free oneself from conditioning only furthers conditioning. But if, instead of trying to suppress desire, one understands the whole process of desire, in that very understanding there comes freedom from conditioning. Freedom from conditioning is not a direct result. Do you understand? If I set about deliberately to free myself from my conditioning, that desire creates its own conditioning. I may destroy one form of conditioning, but I am caught in another. Whereas, if there is an understanding of desire itself, which includes the desire to be free, then that very understanding destroys all conditioning. Freedom from conditioning is a by product; it is not important. The important thing is to understand what it is that creates conditioning.
To free the mind from all conditioning, you must see the totality of it without thought. This is not a conundrum; experiment with it and you will see. Do you ever see anything without thought? Have you ever listened, looked, without bringing in this whole process of reaction? You will say that it is impossible to see without thought; you will say no mind can be unconditioned. When you say that, you have already blocked yourself by thought, for the fact is you do not know.
So can I look, can the mind be aware of its conditioning? I think it can. Please experiment. Can you be aware that you are a Hindu, a Socialist, a Communist, this or that, just be aware without saying that it is right or wrong? Because it is such a difficult task just to see, we say it is impossible. I say it is only when you are aware of this totality of your being without any reaction that the conditioning goes, totally, deeply—which is really the freedom from the self.

0 Comments:

Post a Comment

<< Home