Monday, June 11, 2018

स्पर्श

स्पर्श
-----------
लमालचा विषय स्पर्श आहे असं ऐकल्यावर माझं मन एकदम फिरायला गेलं आणि ज्याला ज्याला स्पर्श करून आलं त्याच हे संकलन. .. .. तसं पाहिलं तर हे सगळं भरकटलेलं लिखाण आहे पण तरी त्यातून काही नवीन माहिती मिळेल असं वाटतं. 

त्वचा हा पंचेंद्रियांमधला सगळ्यात मोठा अवयव/ इंद्रिय.  कापऱ्या थंडीचा किंवा उन्हाचा स्पर्शच आपल्याला त्याची जाणीव करून देतो. आपल्याला स्पर्श जाणवतो त्यामागची प्रक्रिया मात्र मोठी आहे. आपण किती गोष्टी गृहीत धरून असतो ना .. त्यातलीच एक स्पर्श संवेदना.. किती गोष्टी कळतात फक्त स्पर्शातून? वस्तूचे तापमान, पोत (गुळगुळीत किंवा खरबरीत पणा) एवढंच नाही तर स्पर्शामागची भावना देखील!   हे सगळे वर्गीकरण करण्याची प्रक्रिया मेंदू क्षणार्धात करतो! मला वाटतं स्पर्श साठवून ठेवण्याची काहीतरी वेगळी केंद्रे असतात.  नवीन स्पर्श झाल्याने जुन्या आठवणी पुसल्या जात नाहीत. कधीकधी तर त्या उफाळून जाग्या होतात. (हे दोन्ही चांगल्या व वाईट बाबतीत होते.) बघा कदाचित तुम्हाला अजूनही लहानपणचे काही स्पर्श आठवत असतील..आईनं/आजीनं  केलेलं अवघ्राण असेल किंवा पहिल्यांदा गरम चटका बसला ते असेल.. अर्थात सगळे स्पर्श लक्षात राहतीलच असे नाही.  स्पर्शसंवेदना शरीरात विषमपणे पसरलेली असते. म्हणजे हात, जीभ, ओठ येथील स्पर्श पाय किंवा पाठीवरील स्पर्शापेक्षा हजारो पटीने अधिक तीव्रतेने जाणवतो. 
***
काही वर्षांपूर्वी काही मनोवैज्ञानिकांनी एक प्रयोग केला.  ३ ते ५ वयोगटातील काही मुले व त्यांच्या आया एकत्र केल्या. काही वेळाने मुलांना एका खोलीत ठेवले व आयांना दुसऱ्या खोलीत.  प्रत्येक मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि सर्व आया ज्या खोलीत होत्या त्या खोलीत सोडले. फक्त स्पर्शाने मुलाला आई ओळखता येते का हे पाहायचे होते.   जवळ जवळ सगळ्यांना आपापली आई फक्त स्पर्शाने ओळखता आली (ह्यात कदाचित थोडा भाग वासाचा पण असावा.) म्हणजे एवढ्या लहान वयात मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसताना देखील स्पर्शज्ञान अचूक असतं .. एवढंच कशाला अगदी तान्ह्या बाळाला देखील त्याच्या आईचा स्पर्श व इतरांचा स्पर्श अचूक ओळखता येतो हे कळून येते. ही स्पर्शाप्रगल्भता वयानुसार वाढत जाते का? की काही काळानंतर आपण आपली संवेदनशीलता हरवून बसतो व त्यामुळे ती कमी कमी होते? आपल्याला जवळची माणसे स्पर्शाने कोण आहे हे ओळखता येईल का? (इथे जवळची हा शब्द मानसिक अंतराशी संबंधित आहे हे जाणकारांनी ओळखलेच असेल.)
 
***
तुम्ही पीटर कॉलिन्सचे नाव कदाचित ऐकलेही नसेल.    त्याच्यावर पोलीस सहकाऱ्याचा खून केल्याचा गुन्हा आहे. तो गेले ३० वर्ष कॅनडाच्या तुरुंगात आहे.  शिवाय हा एकांतवास आहे म्हणजे त्याचा कुठल्याही माणसाशी थेट संपर्क अतिशय कमी प्रमाणात येतो.  विचार करा -- गेले कित्येक वर्षे एकांतवासात, ६ फूट बाय ९ फूट मध्ये काढलेला हा माणूस .. त्त्याच्या तुरुंगात एक माशी शिरली व ती त्याच्या पाठीवर, तोंडावर बसत होती.  त्यावरून त्यानं "व्हॉयसेस फ्रॉम सॉलिटरी" हा लघुचित्रपट केला आहे.  माणसाला स्पर्शाची भूक किती असते ह्याच ते हलवून सोडणारं, हृदयस्पर्शी आणि अंतर्मुख करणारं भाष्य आहे.  (ह्या लघुचित्रपटाचा दुवा येथे आहे.)  हि माणसाची भूक स्पर्शाची आहे. लैंगिकतेचा पूर्णतः अभाव असणारी. आईच्या डोक्यावर फिरणाऱ्या हाताची असेल, वडीलधाऱ्या व्यक्तीची पाठीवरील थाप असेल, मित्राने मारलेली टप्पल असेल किंवा कुणी प्रिय व्यक्तीने दिलेले आलिंगन असेल. ह्या सगळ्यातून ती भागत असते. त्यामुळे सर्वसामान्यपणे आपल्या ती लक्षात येत नाही. नाहीतर स्पर्शाशिवाय मानसिक संतुलन ढळण्याचे पण प्रकार घडतात. PTSD ने त्रस्त असलेली माणसे मानवी स्पर्शाची भुकेलेली राहतात असे मी मागे वाचले होते.

ह्याच्या उलटही प्रकार आहेत. वैद्यक शास्त्रात ज्याला डायस्थेशिया म्हणतात त्या नुरोलॉजिकल ऑर्डर मध्ये स्पर्शसंवेदना इतकी तीव्र असते कि त्या रुग्णांना कपड्याचा व कुठल्याही स्पर्शाचा त्रास होतो.  कधीकधी हि गुणसूत्रानुसार घडलेली विचित्र किमया असते. त्याला epidermolysis bullosa किंवा  बटरफ्लाय  डिसीज म्हणतात. त्वचेला हात लावला कि तेथे त्वचा फाटते!    अर्थात हे प्रमाण १० लाखात ३०-५० एवढं कमी आहे. जन्मजात हा आजार असलेल्या बाळांना हात लावता येत नाही, कुशीत घेता येत नाही.. त्यांच्या आयांची किती प्रचंड घुसमट होत असेल कल्पना देखील करवत नाही!
***
अंध लोकांचे स्पर्श ज्ञान अधिक तीव्र असते. कदाचित एक इंद्रिय (डोळा) निकामी झाल्याने दुसरे अधिक कुशाग्र करायची हि निसर्गाची क्लृप्ती असावी.  अर्थात जन्मतः अंध आणि अपघाताने अंध ह्यात फरक पडतो.  अपघाती अंधेपण आले असेल तर स्पर्शशक्ती त्वरित विकसित होत नाही.  अंध लोकांना कळाव्यात म्हणून भारतात (आणि अनेक) देशांत नोटांचे आकार वेगवेगळे असतात. पण अमेरिकेत सर्व नोटांचे आकार सारखे असून देखील अंध व्यक्ती चलन कसे ओळखतात हे मला कोडंच आहे.  दृश्य प्रतिसाद (visual feedback) नसल्याने स्पर्श संवेदना हेच त्यांचे संवादाचे माध्यम होते. स्पर्शातून येणारी कंपने त्यांचा मेंदू अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकतो व त्याचे आकलन करू शकतो.  (अंध व्यक्तीवरून आठवलं की सर्वमान्य झालेली ब्रेल लिपी विकसित करणारा लुई ब्रेल हा जन्मतः अंध नव्हता. तो ५ वर्षाचा असताना एका अपघाताने त्याचा एक डोळा निकामी झाला आणि जंतुसंसर्गाने दुसराही त्याला गमवावा लागला. अनेकांना तो जन्मतः अंध होता असे वाटते म्हणून सहज नमूद करावेसे वाटले) )

अंध व्यक्तीसारखी स्पर्शांध व्यक्ती पण असतात! त्यांना कोणताही अमानवी स्पर्श समजत नाही. अशी व्यक्ती ब्रेल लिपी देखील वाचू शकत नाही. हे होण्यामागची कारणे अजून शास्त्रज्ञांना ज्ञात झाली नाहीत.

स्पर्श विषयाला अनुसरून (कुठल्या कुठे) भरकटलेले हे लिखाण आता आवरायला हवे. वेळ झाला तर मी वर दुवा दिला आहे ती चित्रफीत जरूर पहा.  तुमच्याकडे "स्मार्ट" फोन असेल आणि त्यावर हे वाचत असाल तर केवळ त्या दुव्याला स्पर्श केलात की झाले!

स्पर्शाख्यान पूर्ण!

सागर साबडे
संदर्भ:
(२) https://wikivisually.com/wiki/Devanagari_Braille
(३) https://archive.org/stream/SixDots-LouisBraille-Marathi/SixDots-Marathi_djvu.txt
(४) https://broadly.vice.com/en_us/article/d3gzba/the-life-of-the-skin-hungry-can-you-go-crazy-from-a-lack-of-touch

0 Comments:

Post a Comment

<< Home