Monday, February 18, 2019

Karan - ek gosta

लमाल साठी लिखाण

धनुनं पुन्हा एकदा बसच्या रस्त्याकडं पाहिलं.  अजून बसचा पत्ता नव्हता.  हातातल्या जुनाट घडाळ्यात पुन्हा एकदा वेळ पाहिली.  गेल्या २ मिनिटात वेळ बघायची हि तिची तिसरी वेळ होती.  घड्याळाचा काटा ढिम्म बसल्यागत वाटत होता.  उन्हानं अंगाची लाहीलाही होत होती.  मळक्या कपड्यातला एकजण तिच्या शेजारी येऊन थांबला.. तिनं चोरट्या नजरेनं पाहिलं.. कधीकाळी पिवळसर असावा असा कळकट  शर्ट, काळसर जाडीभरडी पॅन्ट -- एक पाय गायब -- दुसऱ्या पायावर सगळी भिस्त.  जगाशी त्याला काही देणंघेणं नव्हतं .. दोन्ही कुबडयांवर भार पेलत त्यानं विडी काढली व पेटवली.  त्या वासानं धनुला मळमळल्यागत झालं म्हणून ती थोडी बाजूला सरकली. 
बसथांब्याच्या शेजारीच रघु वडे, भजी आणि लिंबू सरबत विकत होता. त्याच्या वासानं भूक चाळवली जात होती. बसची वाट पाहूनकंटाळलेले  काही लोकं आपसूकच तिकडं वळत होते. त्यामुळे रघूचा धंदा चांगला चालला होता.  

११:४५ वाजून गेले तरी ११ च्या बसचा पत्ता नव्हता. धनुच्या पोटात कावळे ओरडत होते. सकाळी चहा बनपाव खाल्ला होता पण तेवढ्यानं काय होतंय.
"वडापाव केवढ्याला?"  तिन विचारलं.
"८ रुपये" रघून गरम तेलात पुढचा घाणा सोडतं तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं. 
"आणि सरबत?"
"५ रुपये ग्लास" - थोडंसं खेकसत तिच्याकडे बघत रघु ओरडला.तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या पोटाकडं गेलं. 
धनुच्या वाढलेल्या पोटाकडे बघितल्यावर मात्र तो ओशाळला.  तिच्यावर असं ओरडायला नको होतं असं त्याला वाटून गेलं. 
"काय देऊ ताई?" शक्य तितक्या कोमल आवाजात त्यानं विचारलं.

हातातल्या १० रुपयाच्या नोटेकडं धनून पाहिलं.  पाकिटात फारतर आणखी २/३ रुपये असतील. आता बसला ६ रुपये लागणार.
सगळे पैसे उगाच मनीऑर्डरनं घरी पाठवले असं तिला वाटलं.  पण अप्पा आजारी आहेत त्यांना गरज आहे ह्या विचाराने तिला जरा शरमल्यागत झालं.  तिन मनाशीच विचार केला.. "आता हे आजच काम झालं कि आणखी बक्कळ पैसा मिळेल -- राजू बोललाच होता!".   राजू कंत्राटावर जी काम द्यायचा त्यानुसार पैसेपण द्यायचा - त्यामुळे त्याच्यावर तिचा दाट विश्वास होता. एकदा ते पैसे मिळाले की मग सुट्टी घऊन अप्पाना भेटायला जायचं. धनून मनाशी पक्क केलं.

"नको काही" हातातली १० ची नोट आणखी घट्ट दाबत धनु म्हणाली.
रघूला तिची कीव आली. 
"घ्या ताई. वडापाव खा.. पैसे राहू द्या"  असं म्हणत त्यानं वडापाव तिच्या हातात कोंबला.

तीन हात जोडले.  वडापाव खायला सुरुवात केली तेवढ्यात गलका झाला.  कुणालातरी लांबून बस येताना दिसली. धनून वडापाव पिशवीत कोंबला. सोबतची थैली परत खांद्यावर नीट घेतली आणि हाताचा आडोसा करून लांबून येणारी बस दिसते का पाहू लागली. लांबून येणारा लाल ठिपका हळूहळू जवळ आला. बस खचाखच भरली होती.  एकच गलका करून मधमाशीच्या पोळ्यासारखी सगळी गर्दी एकदम गाडीला झुंबली.  आतल्या लोकांना बाहेर यायला जागा मिळेना.. 
तेवढ्यात कंडक्टर ओरडला  "पुढच्या दारातुन उतरा की भाऊ". 
"ओ ह्या ताईंना जाऊदे पुढं .. पोटुशी हायेत" कुणीतरी धनुला मागून ढकललं

कुणी बसायला जागा देईल ह्या आशेने धनून हळूच पाहायला सुरुवात केली.. एकाशी धनुची नजरानजर झाली.  त्यानं लगेच नजर चुकवून हातातल्या पेपरमध्ये डोकं खुपसल. 
पुढच्या सीटवर थोडी जागा आहे असं तिला वाटलं.. तेवढ्या कडेला बसलेल्या माणसानं मांडी थोडी ऐसपैस केली. थोडंसं हिरमुसून धनु त्या गर्दीतून पुढं सरकली.

कशाला पोट घेऊन गर्दीत शिरतात लोकं कुणास ठाऊक?  कुणीतरी कुजकी टिप्पणी केली.  धनून तिकडं दुर्लक्ष केलं.  आता एवढं काम कधी पूर्ण करते एवढ्यावरच तिचा लक्ष केंद्रित होतं.
लोकांच्या गर्दीतून वाट काढत कंडक्टरनं तिकीट विचारलं.  १० ची नोट त्याच्या हातात कोंबत 'वडाळा द्या एक' असं ती म्हणाली.  
दिड काढायला पाहिजे नाही?  मघाचा कुजकट आवाज परत आला.. धनून तिरस्कारानं आवाजाच्या दिशेला पाहिलं.  दाढीचे खुंट वाढलेला एक इसम दात वेंगाडून हसत होता..  धनु आणखी पुढं सरकली..

'महिलांसाठी राखीव'' - डावीकडच्या सीटजवळ तीन वाचलं.   खाली एक तुंदिलतनु बाई ढाराढूर झोपली होती.
"पुढं चला.. चला पुढं" कंडक्टर मागून ओरडला..
काहीजण पुढच्यावर रेलले काहीणांनी एक पाऊल पुढं केल्यागत केलं. तेवढ्यात ड्रायव्हरनं कच्चकन ब्रेक दाबला.. धनु पुढ ढकलली गेली पण तोल न सावरता आल्यानं एकदम कोसळली.  एव्हाना ती बसच्या पुढच्या दारापर्यंत आली.  उठणार तेवढ्यात तिची नजर शेजारच्या सीटकड गेली.  'अपंगासाठी राखीव'  - तो बसस्टॊप वरचा अपंग माणूस तिथं बसला होता. सीटचा आधार घेऊन धनु उठली व खिडकीबाहेर बघायला लागली.  गरम वारेच्या नुसत्या झळा येत होत्या. . 

'बसा ताई'  तेवढ्यात आवाज आला.
तो अपंग कुबड्या सावरत उभा राहिला होता आणि त्याच्या जागेवर बसायला सांगत होता.
'नको, तुम्हीच बसा हो"  - माणुसकीचा हा अनपेक्षित पैलू पाहताना एकीकडे सुखावत पण ओशाळत ती म्हणाली.
"मला उतरायचंच आहे आता.. बसा तुम्ही ताई. " तो म्हणाला.
धनु बसली..  "थँक यू" -  कपाळावरचा घाम पुसत स्मितहास्य करत ती म्हणाली.  हातातली जड पिशवी तिनं सीट खाली टाकली.
तो माणूस आणखी डावीकडे सरकला -- अगदी पुढच्या दरवाजात एका पायावर तोल सावरत उभा राहिला. आधाराला एक हात त्यानं धनु बसली त्या खिडकीवर धरला. 

धनून मनाशी विचार केला..  एका बसचा प्रवास  पण किती लोक आणि किती तऱ्हा पाहायला मिळाल्या. तिरस्कार, कुजके/टोचून बोलणे, स्वार्थीपणा, आणि ज्याच्याकडून अपेक्षा नाही त्याच्याकडून निस्वार्थी मदत! तिला वाटलं खरतर जग अशा लोकांच्यावरच टिकून आहे. 

ड्रायव्हर बेफाम निघाला होता.  पुढचा रस्ता रिकामा दिसत होता. 

डाव्या हातात राग लागली असं वाटून धनून हात जोरात झटकला .. तो नेमका त्या खिडकीवर तीन बोट धरून उभ्या असणाऱ्या माणसाला लागला - जोरात आवाज झाला आणि तोल जाऊन तो बाहेर पडला.. 
"थांबवा थांबवा गाडी -- " कोणतरी मागून ओरडलं पण वेगात असल्यानं ड्रायव्हरला ऐकू येई पर्यंत गाडी कित्येक फर्लांग पुढं गेली होती.  धनून खिडकीतून डोकावून पाहिलं. तो बिचारा गुढग्यावर हात धरून पडला होता.. बसमध्ये त्याची अडकलेली कुबडी तिने खाली फेकली..

पण धनून  असं का केलं? काय कारण असेल?





----

बसचा पूर्ण चक्काचूर झाला होता.  अनेक देहांची शकले झाली होती.  लागलेल्या आगीमुळे एकच  हाहाकार उडाला होता.  पोलिसांनी नाकाबंदी केली. 
नाम्या एकाजागी पडून बघत होता. थोड्या वेळापूर्वी बस मधून पडल्याने त्याला उठता येत नव्हतं पण कदाचित तिनं धक्का दिला म्हणूनच तो जिवंत होता!















0 Comments:

Post a Comment

<< Home