Saturday, June 06, 2020

कोरोना जनजागृती आणि मी


पुलंची क्षमा मागून - त्यांच्याच प्रेरणेने..

- सागर साबडे

तसं पाहिलं तर स्वयंसेवा (vounteer)  करण्याचा माझा मूळ स्वभाव नाही.  पण ऑफिसतर्फे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहिमेत माझा स्वयंसेवक म्हणून समावेश का करण्यात आला ते मला अद्याप कळलेले नाही.  (मागच्या महिन्यात आमचे रोखपाल कुशाभाऊंशी वाद घातल्यानं त्यानं हे घुसडलं असा माझा संशय आहे!) तरीही कोरोनाची साथ वाढू नये ह्या सद्हेतूने मी ते सुरु केले.  दिलेल्या क्रमांकावर फोन करून ह्या रोगाबद्दल आणि "सोशल डिस्टंसिन्ग" बद्दल माहिती द्यायची होती असं साधारण काम होतं. नंबर कुणाचे आणि कुठले ते मात्र माहिती नव्हतं! फोन वर भेटलेले एकेक नमुने व आमचे संभाषण मुद्दाम देत आहे. न जाणो भाषाशास्त्रज्ञांना कधीकाळी ते उपयुक्त ठरावे!

पहिला फोन लागला ते घर नक्की मुंबईला असणार. कारण माणसाचा आवाज सोडून बाकी गोष्टी प्रामुख्याने ऐकू येता होत्या.  रेल्वेचे, गाड्यांचे हॉर्न, रेल्वेचे धडधड आवाज, भाजीवाल्यांची हाळी अशा सर्व आवाजाचे एक संमिश्र मिश्रण मला आधी ऐकू आलं.  त्या गदारोळातून "हॅलो" ऐकू आल्यावर मी कोरोनाबद्दल माहिती दिली. दोन माणसात सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सांगताच उत्तर आलं "ते काय ना साहेब माझ्याच घरात ६ माणसं आहेत!अंतर वाढवत गेलो ना तर पार नालासोपाराला पोहोचू ! अहो इथं लोकल ट्रेन मध्ये चौथ्या सीट साठी जीव देणारी माणसं आम्ही आणि कसलं ६ फूट अंतर ठेवायला सांगता?"   हे ऐकल्यावर आलेला उमाळा दाबत व कुंठीत झालेल्या मतीने मी फोन ठेवून दिला!

सद्गतीत अवस्थेतच मी दुसरा फोन लावला.  मला "हॅलो" च्या आधी -- नव्हे ऐवजी -- खालील स्वर ऐकू आले:
"काय साली कटकट आहे - झोपेच्या वेळी! अगं १ ते ४ रिसिव्हर काढून ठेवायला सांगितलं होतं ना तुला .. कोणये?".  हा फोन पुण्याला लागलाय हे मला लगेच कळलं! मी जरा दबक्या आवाजातच कोरोना जनजागृती बद्दल फोन करतोय हे सांगून जुजबी माहिती दिली. यावरच उत्तर मिळालं: "काय हो तुम्ही पुण्याचे दिसत नाही! भर दुपारी फोन करून झोपमोड करून हे असलं फालतू काय सांगता? आणि अंतराचं आम्हाला काय शिकवता?  "राखावी बहुतांची अंतरे"  हे तर आम्ही बालपणीच शिकलोय!" एवढं बोलून त्या गृहस्थांनी फोन एवढ्या जोरदार आदळला की मी साडेतीन इंच उंच उडालो. एकेकाळच्या - हो आता एकेकाळच्याच म्हणायला हवं - विद्येच्या माहेरघरातून अशी मुक्ताफळे ऐकून मी शिक्षणाच्या चिंतने व्यथित झालो नसतो तरच नवल!

या संभाषणानंतर जरा धास्तावून ४ पर्यंत थांबून पुढचा फोन लावला. तेंव्हा ऐकू आलेले उत्तर असे:
"कोणे हे बे? फोन कशाला करून राहिले?"  राज्याच्या उपराजधानीपर्यंत स्वर गेल्याचं ध्यानी येताच मी कोरोनाबद्दल माहिती दिली. हा आजार कसा पसरतो ते सांगितलं. पण यावरचे अफाट उत्तर ऐकून अचाट झालो.
"कोरोना ना इथे येऊच शकत नाही ना भाऊ..  अहो आमचा उन्हाळा सहनच नाही होत कुठल्या विषाणूला -- सगळे आपलं पाणी पाणी करून मरून जातात..  आमच्या म्युनिसिपाल्टीच बजेट बघा ना भाऊ -- जंतुप्रादुर्भावासाठी अगदी कमी बजेट ठेवावं लागतं!  आणि गर्मीच एवढी आहे की सगळे लांबलांबच राहतात ना .. तर आम्हाला हे काही बाधूच शकत नाही ना "

पुलंनी रंगवलेली तीन शहरातली व्यक्तिमत्व अशा तऱ्हेने एकाच दिवसात अनुभवता आल्याने मी धन्य झालो!

0 Comments:

Post a Comment

<< Home