Wednesday, June 16, 2021

आभासी खाणं!

 

आभासी खाणं!

ते काही नाही आता फार झालं! मी आता मार्ककडं निषेध मोर्चाचं नेणार आहे आणि मला खात्री आहे कि मी एकटा नसेन - माझ्यासारखे अनेक ह्याने पोरखळलेले असणार! अगदी तुमच्यातले काही सुद्धा!

काय नाही कळलं? अहो, हो मी झुकरबर्ग पुत्र मार्क बद्दलच बोलतोय! तो आणि त्यानं आम्हाला लावलेलं फेसबुकचं व्यसन. चार नवीन मित्र जोडावेत, जुने मित्र शोधावेत, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून फेसबुकशी जोडला गेलो तर ते आता चांगलंच अंगाशी आणि तोंडाशी आलंय आणि अक्षरशः तोंडघशी पडायची वेळ आलीय. 
कसं ते  सांगतो. एक तर ह्या कोरोनामुळे गेलं वर्ष दिडवर्ष कुठेही बाहेर जाता येत नाहीये. त्यामुळे साहजिकच फेसबुकवर माझी उठबस (खरं तर इथे "बस"णेच जास्त!) वाढली. सुरुवातीला नवीन मित्र आणि काही जुन्या मैत्रिणीशी  (हाय.. एक छोटी कळ आल्यासारखं वाटलं छातीतून!) संपर्क झाला. मार्कने जणू तर आमच्यावर नजरच ठेवली होती..  रोज मला अगदी  नवीन नवीन मित्र/मैत्रिणी सुचवू लागला. आता नाव ओळखीची वाटली आणि या वयात कोण कसा दिसत असेल ह्या उत्सुकतेपायी मी धडाधड सगळ्यांना माझ्या मित्र-वर्तुळात (friend circle हो!) सामावून घेतलं. आता मार्कचं अल्गोरिथम फार काही परिपूर्ण नसल्यानं त्यात काही आमच्या सौंच्या मैत्रिणीपण जोडल्या गेल्या. आता तुम्हीच सांगा 'मानसी नाईक, भावना प्रधान, केतकी कुलकर्णी'' या नावानं आलेल्या फ्रेंड रीक्वेस्ट कोण बरं अव्हेरू शकेल?

सुरुवातीचे दिवस खूप छान होते. सगळं काम घरून सुरु होतं.  बाहेर जाण जरी बंद झालं तरी फेसबुकमुळे सगळे जणू रोज आवर्जून घरी  येत होते. मग जुनी शाळा, तेंव्हाचे शिक्षक, कोण कुठे आहे, काय करतो, कुणाचे कुणाशी लग्न वगैरे गप्पा झाल्या. लहानपणी खाल्लेल्या चिंचा बोरं आवळ्यापासून वाटून खाल्लेल्या डब्याच्या आठवणी दाटून आल्या. पूर्वी क्वचितच गेलेल्या हॉटेलिंगचे दिवस आठवले. कुठल्या हॉटेल मध्ये काय चांगलं मिळायचं याच स्मरणरंजन झालं.  कुठली हॉटेल बंद पडली यावर हताश सुस्कारे सोडून झाले! आणि या मध्ये कुणीतरी पदार्थ करून त्याचे फोटो टाकायची टूम काढली आणि हा उपक्रम सुरु झाला.

झालं - मग काही विचारू नका! एकीने काहीतरी करावं, दुसऱ्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडावा, कमेंट्स कराव्यात आणि त्यावर कुरघोडी करण्याच्या सुप्त उद्देशाने तिसरीने आणखी एक फोटो टाकावा ही प्रथा सुरु झाली! आता खोटं कशाला बोला, नाही म्हणायला मलाही सुरुवातीला हा प्रकार आवडला.. कुणीतरी पोहे करावेत, त्यावर छान कोथिंबीर, खोबरे घालून सजवावेत आणि तो फोटो शेअर करावा.. मग त्याच्याशी स्पर्धा म्हणून कुणीतरी शिरा, उप्पीट, मिसळ अशा पदार्थांची रांग लावावी. त्यांना शह देण्यासाठी कुणी एकीने चकल्या, चिरोटे कड मोर्चा वळवावा तर त्याला काटशह देण्यासाठी कुणीतरी थेट पुरणपोळीची वर्णी लावावी! अहाहा.. एकेक फोटो बघून, त्यावरची वर्णन वाचून, कमेंट्स पाहून जीव सुखावला नाही तरच नवल!  आता नाही म्हणायला 'थोडं अहो रूपं अहो ध्वनी' झालं - पण ते होणं स्वाभाविकच होत. अहो मार्कबाबांचा सगळा धंदाच यावर आधारित आहे म्हणा! हे छान फोटो बघून मलाही चार घास जास्त जात होते.  (घरूनच काम सुरु होत त्यामुळं ऑफिसाचे कपडे घालण्याची सक्ती नव्हती त्यामुळे त्या चार घासाची करामत काही कळलं नाही) घरचा अंमळ बेचव उपमा खात असताना कुणी अस्मिता कुलकर्णीच्या हातचा उपमा आपण खात आहोत अशी कल्पना करावी - आणि त्याला काय वेगळीच चव येते हे तुम्ही स्वतः करून पाहिल्याशिवाय नाही कळणार! अर्थात सोयीने पदार्थ आणि करणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलण्याची मुभा आहे.  

अर्थात ह्या सगळ्या प्रकारात वेळी अवेळी भूक लागणं, भूक लागलेली नसतानाही लाळ टपकण, असे प्रकार घडतात. पण ते सारे क्षम्य आहेत.    

सगळं छान सुरु होत पण आंतरराष्ट्रीय महिला दिन आला आणि परत कुणाच्या तरी सुपीक (!) डोक्यातून कल्पना आली की त्यादिवशी पुरुषांनी काहीतरी करून खायला घालायचं आणि त्याचे फोटो टाकायचे.  मग काही उत्साही पुरुषांनी खरोखरीच हा प्रकार सुरु केला. यातले काहीजण पुढे हॉटेल मॅनेजमेंट करणार होते, मोठे शेफ बनणार होते, पण त्यांच्या दुर्दैवाने (आणि आपल्या सुदैवाने) बी कॉम करून कुठल्यातरी बँकेत चिकटले होते. त्यांच्या सुप्त इच्छा उफाळून आल्या असणार आणि लगेच त्यांनी हौस भागवली असणार. बर तर बरं फक्त पदार्थाचा फोटो टाकावा तर ते नाही, ह्या मंडळींनी स्वतः  ऍप्रन घालून, किचन मध्ये काम करतानाची सेल्फी टाकायचे नवीन फॅड सुरु केलं! सगळे तुंदीलतनु लेकाचे - स्वतःची ढेरी देखील त्या ऍप्रन मध्ये बसत नव्हती, पण हौस बघा लेको!  मी २/४ दिवस चालढकल केली पण ह्या नवीन मित्र मैत्रिणींनी काही पिच्छा सोडला नाही. मग हिनेच केलेल्या ऑम्लेट सँडविच चा फोटो टाकला आणि खाली "हॅप्पी वूमेन्स डे!" असं लिहून टाकलं! सुरुवातीला दोन चार मित्रांनी कौतुक केलं, पण त्या कौतुकात "फोटो किती छान आलाय, अंड्याचा पिवळा रंग कसा सुंदर दिसतोय" अशा प्रकारची टिप्पणीच जास्त होती.  (असो,एकेकाचं नशीब!) पण तेवढ्यात कुणी क्षमा नामक युवतीने आमच्या सौना टॅग केलं.  झालं  या कृतीला आमच्या घरी मात्र क्षमा नव्हती! त्यावरून घरी जो हलकल्लोळ झाला तो काय विचारता! मी एका कृतीत किती चुका केल्या त्याच पुन्हा पुन्हा उच्चारण झालं.  दुसऱ्या व्यक्तीनं (म्हणजे हिने) केलेल्या पदार्थाचा नकळत फोटो काढून तो परस्पर असा स्वतःची कलाकृती म्हणून जाहीर करणं, त्याच श्रेय ढापणं आणि वर  त्याची सोशल मीडिया वर खोटी जाहिरात करणं! किती अनन्य अपराध! याच परिमार्जन करण्यासाठी  काय करावं लागलं ते माझं मला माहित. एकतर माझ्या सर्व नवीन मित्र मैत्रिणीची यादी तपासण्यात आली त्यातील सौंच्या मैत्रिणींना फ्रेंड लिस्ट मधून वगळावं लागलं.. (बिचाऱ्या मानसी, भावना, केतकी किती गैरसमज झाला असेल त्यांचा!) शिवाय केलेल्या अपराधाची सजा म्हणून गेले कित्येक दिवस मला स्वयंपाक करावा लागला. त्याचे फोटो काढण्यास अजिबात परवानगी नव्हती. जे तयार होईल, जसे तयार होईल तसे खाणे भाग पडले.

अजूनही मला फ्रेंड रिक्वेस्ट येतात पण आता जरा मी सावधानतेने पावले उचलतो आहे.  पाक कला स्पर्धा, पाककृती अशा पोस्ट अजून येत आहेत, त्यात आता व्हाट्सअँप ची भर पडली आहे. आणि हे सगळे बंद होणे गरजेचे आहे. त्यासाठीच मी मार्कच्या घरी मोर्चा नेणार आहे. या विषयावर संसदेत चर्चा घडावी, कायद्याने यावर बंदी यावी आणि माझ्यासारख्या अनेक जणांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी मी कटिबद्ध आहे.  मोर्चाची तयारी? हो करणार आहेच - फक्त आज थालीपीठ करण्याची हिच्याकडून ऑर्डर आहे ती पूर्ण झाली की तीही करेन!

 


Saturday, June 06, 2020

कोरोना जनजागृती आणि मी


पुलंची क्षमा मागून - त्यांच्याच प्रेरणेने..

- सागर साबडे

तसं पाहिलं तर स्वयंसेवा (vounteer)  करण्याचा माझा मूळ स्वभाव नाही.  पण ऑफिसतर्फे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहिमेत माझा स्वयंसेवक म्हणून समावेश का करण्यात आला ते मला अद्याप कळलेले नाही.  (मागच्या महिन्यात आमचे रोखपाल कुशाभाऊंशी वाद घातल्यानं त्यानं हे घुसडलं असा माझा संशय आहे!) तरीही कोरोनाची साथ वाढू नये ह्या सद्हेतूने मी ते सुरु केले.  दिलेल्या क्रमांकावर फोन करून ह्या रोगाबद्दल आणि "सोशल डिस्टंसिन्ग" बद्दल माहिती द्यायची होती असं साधारण काम होतं. नंबर कुणाचे आणि कुठले ते मात्र माहिती नव्हतं! फोन वर भेटलेले एकेक नमुने व आमचे संभाषण मुद्दाम देत आहे. न जाणो भाषाशास्त्रज्ञांना कधीकाळी ते उपयुक्त ठरावे!

पहिला फोन लागला ते घर नक्की मुंबईला असणार. कारण माणसाचा आवाज सोडून बाकी गोष्टी प्रामुख्याने ऐकू येता होत्या.  रेल्वेचे, गाड्यांचे हॉर्न, रेल्वेचे धडधड आवाज, भाजीवाल्यांची हाळी अशा सर्व आवाजाचे एक संमिश्र मिश्रण मला आधी ऐकू आलं.  त्या गदारोळातून "हॅलो" ऐकू आल्यावर मी कोरोनाबद्दल माहिती दिली. दोन माणसात सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सांगताच उत्तर आलं "ते काय ना साहेब माझ्याच घरात ६ माणसं आहेत!अंतर वाढवत गेलो ना तर पार नालासोपाराला पोहोचू ! अहो इथं लोकल ट्रेन मध्ये चौथ्या सीट साठी जीव देणारी माणसं आम्ही आणि कसलं ६ फूट अंतर ठेवायला सांगता?"   हे ऐकल्यावर आलेला उमाळा दाबत व कुंठीत झालेल्या मतीने मी फोन ठेवून दिला!

सद्गतीत अवस्थेतच मी दुसरा फोन लावला.  मला "हॅलो" च्या आधी -- नव्हे ऐवजी -- खालील स्वर ऐकू आले:
"काय साली कटकट आहे - झोपेच्या वेळी! अगं १ ते ४ रिसिव्हर काढून ठेवायला सांगितलं होतं ना तुला .. कोणये?".  हा फोन पुण्याला लागलाय हे मला लगेच कळलं! मी जरा दबक्या आवाजातच कोरोना जनजागृती बद्दल फोन करतोय हे सांगून जुजबी माहिती दिली. यावरच उत्तर मिळालं: "काय हो तुम्ही पुण्याचे दिसत नाही! भर दुपारी फोन करून झोपमोड करून हे असलं फालतू काय सांगता? आणि अंतराचं आम्हाला काय शिकवता?  "राखावी बहुतांची अंतरे"  हे तर आम्ही बालपणीच शिकलोय!" एवढं बोलून त्या गृहस्थांनी फोन एवढ्या जोरदार आदळला की मी साडेतीन इंच उंच उडालो. एकेकाळच्या - हो आता एकेकाळच्याच म्हणायला हवं - विद्येच्या माहेरघरातून अशी मुक्ताफळे ऐकून मी शिक्षणाच्या चिंतने व्यथित झालो नसतो तरच नवल!

या संभाषणानंतर जरा धास्तावून ४ पर्यंत थांबून पुढचा फोन लावला. तेंव्हा ऐकू आलेले उत्तर असे:
"कोणे हे बे? फोन कशाला करून राहिले?"  राज्याच्या उपराजधानीपर्यंत स्वर गेल्याचं ध्यानी येताच मी कोरोनाबद्दल माहिती दिली. हा आजार कसा पसरतो ते सांगितलं. पण यावरचे अफाट उत्तर ऐकून अचाट झालो.
"कोरोना ना इथे येऊच शकत नाही ना भाऊ..  अहो आमचा उन्हाळा सहनच नाही होत कुठल्या विषाणूला -- सगळे आपलं पाणी पाणी करून मरून जातात..  आमच्या म्युनिसिपाल्टीच बजेट बघा ना भाऊ -- जंतुप्रादुर्भावासाठी अगदी कमी बजेट ठेवावं लागतं!  आणि गर्मीच एवढी आहे की सगळे लांबलांबच राहतात ना .. तर आम्हाला हे काही बाधूच शकत नाही ना "

पुलंनी रंगवलेली तीन शहरातली व्यक्तिमत्व अशा तऱ्हेने एकाच दिवसात अनुभवता आल्याने मी धन्य झालो!

Sunday, December 29, 2019

इष्टीची खिचडी

सातारला आमच्या घरासमोर अग्निहोत्र होतं. तेथे अहोरात्र होम पेटलेले असत. शास्त्रानुसार घरात अग्निहोत्र असेल तर ते सतत तेवत ठेवाव लागते. घरातील स्त्रीला गावाबाहेर जाता येत नसे. म्हणजे एकदा का लग्न करून मुलगी घरी आली कि तिचं माहेर तुटलंच जणू!  शिवाय अग्निहोत्राचं सोवळं कडक असायचं. अग्निहोत्र करणारे गुरुजी त्या बाबतीत जास्तच कडक होते.  त्यांना गावात खूप मान होता.  त्यांच्या बायकोला  (आजींना) सर्वजण काकू म्हणत.  त्यांचं नाव मला अजूनही माहिती नाही!  त्या माझ्या आजीच्या समवयस्क असाव्यात.  माझे आजोबा संस्कृत पंडीत होते त्यामुळे न शिकताही आजीला संस्कृत उच्चार कुठले स्पष्ट वगैरे कळायचं. दर महिन्यात बहुतेक संकष्टी चतुर्थीला अग्निहोत्र चालायचं.  त्याला इष्टी म्हणायचे.  कदाचित कानडी शब्द असेल कारण त्या नंतर तो मी परत कधी ऐकलेला नाही.  त्यावेळी अनेक भटजी यायचे आणि मोठ्याआवाजात मंत्रोच्चारण करायचे.  सगळं वातावरण कसं भारलेलं असायचं. शाळेत जाताना आठवणीने अग्निकुंडाला नमस्कार करून जा असं आजी सांगायची. नमस्कार केला की गुरुजी थोडं भस्म हातात द्यायचे किंवा कपाळाला लावायचे. कदाचित वयाचा परिणाम असेल पण ते लावलं कि आता आपल्याला कुठलाच आजार होणार नाही, बाधा होणार नाही असा समज दृढ व्हायचा.  त्या दिवशी परीक्षा असेल तर पेपर सोपा जाणार असं उगाचंच वाटायचं (कदाचित थोडे दैववादी असण्याचे दिवस होते!)

होमहवन संपलं कि सगळ्या भटजींना जेवण/अल्पोपहार असायचा.  तो झाला कि त्या समोरच्या काकू पटकन यायच्या, दाराची कडी वाजवायच्या आणि गरम खिचडीच भांड घराबाहेर ठेवायच्या. त्यांच्या सोवळ्यामुळे आम्हाला त्यांच्या हातातून भांड घेता येत नसे. कदाचित कडक सोवळ्यामुळे सावली पडलेलीही चालत नसावी.  त्यामुळे दाराची कडी वाजवून परत जाऊन त्या त्यांच्या घराच्या दारात थांबायच्या आणि मी किंवा आई ने दार उघडलं कि छान हसायच्या.  कदाचित सोवळ्याच्याच भाग असेल किंवा त्यावेळची गडबड असेल पण त्या खिचडी द्यायच्या तेंव्हा कधीच काही बोलायच्या नाहीत. पण त्यांच्या नजरेत खूप प्रेम आणि आर्द्रव असायचं.  मला/ घरातल्याना खिचडी मिळावी म्हणून केलेली धडपड असायची. खूप वर्ष झाली पण त्या खिचडीची चव अजून जिभेवर रेंगाळते आणि वास नाकात घुटमळतो आहे. छान फुललेला साबुदाणा, व्यवस्थित कापलेले बटाटे, अगदी चवीपुरती मिरची आणि वर भरपूर खोबरे आणि कोथिंबीर. अहाहा! काय स्वर्गीय आनंद असायचा..  परत तशी खिचडी खायला कधीच मिळाली नाही. घरी नाही, हॉटेल मध्ये तर नाहीच नाही..   कदाचित त्यांच्या भक्तीचा झालेला पवित्र स्पर्शच त्या खिचडीला ती चव बहाल करत असावा..

मला खिचडी आवडते आणि अजूनही कधीही साबुदाणा खिचडी खाल्ली कि मला त्या काकू आणि त्यांचे अनवाणी पाय, आणि प्रेमळ डोळे आठवतात. केवळ अग्निहोत्राला समर्पित त्यांचं पावन जीवन आठवत आणि का कुणास ठाऊक पण त्यावेळच्या खिचडीच्या आठवणीने डोळे भरायच्या घाईला येतात.

Tuesday, August 06, 2019

सुरुवात

कुठून बर सुरुवात करू?
हे  बघा माझं ना असच होतं नेहमी.. म्हणजे खूप गोष्टीत मला ना कुठुन सुरुवात करायची तेच कळत नाही.. 
माझ्यातल्या  कमतरतेबद्दल आमच्या हिन जी केकावली रचली आहे त्यातल्या ह्या एकाच पदावर आमचं एकमत आहे
. . तर सुरुवात करण्याबद्दल..   म्हणजे उदाहरणार्थ घरात खूप पसारा झाला असेल तर तो कुठून आवरायला सुरुवात
 करायची ते मला कळत नाही आणि मग तो दिवसेंदिवस वृद्धिगंत होतो आणि माझी समस्या अधिक जटील करतो ! 
एखादी अपरिचित व्यक्ती भेटली किंवा कुणी माझी नवीन माणसाशी ओळख करून दिली तर बोलायला सुरुवात कुठून 
करावी ते मला कळत नाही!  
कुणाला पत्र लिहायचं झालं तर मायना काय लिहायचा ते मला समजत नाही!  एकदम मसुदा लिहून पाठवलेली अनेक 
पत्रे उलट टपाली मला परत आलेली आहेत!


बफे जेवण पद्धतीत ताटात सुरुवातीला काय वाढून घ्यावं ते माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे अनेकदा सुरुवातीचे पदार्थ 
घेतल्यामुळे इतरांना न्याय देता येत नाही आणि "खाद्याभ्यासाला" (survey of foods) जावं किंवा उलटीकडून पदार्थ 
घ्यायला जावं तर रांगेतील लोक "पहिल्यांदाच बफे मध्ये आलेला दिसतोय - मॅनर्स नाहीत!" अशा नजरेनं बघतात व 
"जेवण नको नजरा आवर" असे म्हंणण्याची पाळी येते.


दर वर्षी (कधीही सिद्धीस न जाणारे) संकल्प केल्यावर त्याला सुरुवात कुठून करावी हे न कळल्याने घरात डायऱ्या, 
वजन कमी करण्याची विविध साधने, जिम साठी लागणारे सामान, "सेल्फ हेल्प" ची अनेक पुस्तके ह्याचा पसारा वाढत 
चाललाय ! एके वर्षी तो पसारा कसा आवरायचा यासाठी पण एक "organize your s(h)elf" नावाचं पुस्तक पण आणलं 
पण त्याची वाचनाची सुरुवात कुठून नि केव्हा करायची ते उमजलं नाही.  ह्याच धर्तीतली "करा सुरु आत्ताच!", 
"just get started", "stop postponing, start living" अशी आणखी काही पुस्तकेही आणली. पण अजून त्यांची पाने 
सुद्धा फाडून झाली नाहीत!


तशी आमची ही खूप मनस्वी आहे (खरा अर्थ: तिच्या मनाला येईल ते मला न सांगता करणारी) त्यामुळे अमुक एका 
गोष्टीसाठी कधी ती रुसायचे प्रसंग येत नाहीत.  पण जर यदाकदाचित ती हिरमुसून बसली असेल तर तिला मनवायला
 कुठून सुरुवात करावी ते सुद्धा मला कळत नाही. (हा प्रश्न तसा गहन आहे.. या क्षेत्रातील माहीर लोकांनी लेखकाशी 
स्वतंत्ररित्या संपर्क साधावा हि विनंती).


अस्मादिक कॉलेजला असताना कुठून सुरुवात करायची हे न उमजल्याने अनेकजणी त्यांची तारीफ ऐकायला मुकल्या 
आहेत व नंतर अनेक कविता जन्माला आल्या आहेत!..  (चाणाक्ष वाचकांनी काय ते ओळखावे!). आरंभचोर
 (आरंभशूर च्या विरुद्ध?) असं काही बिरुद असेल तर ते पटकावण्यात माझा नंबर पहिला असेल.!


अर्थातच लमाल च्या लिखाणाच्या बाबतीतही असच होत. मी ह्या विषयावर पूर्वी उहापोह केला होताच  
(जिज्ञासूंनी 'कल्पना' या विषयावरील आमचे लिखाण अभ्यासावे)
तर सांगायचा मुद्दा हा कि मला काही म्हणता काSSही सुचत नाही.. आशिषनं विषयाला अनुसरून चिंतन करायला 
चांगले २ महिने दिलेले असतात. चैतालीने महिन्यातून स्मरणपत्र (reminder) पाठवून "आता (तरी) लिहा" असं हळूच (?)
 सुचवलेलं असत..पण जमतच नाही.  म्हणजे तसा मी अजिबात आळशी नाही असा माझा समज आहे 
 (माझ्या पत्नीचे याबाबत दुमत असले तरी व्यक्ती व्यक्ती मतेर्भिना: हे चाणाक्ष आणि विवाहित वाचकांना समजण्यासारखे 
आहे) तरी पण कुठून सुरुवात करायची ते काही नेमकं कळत नाही आणि मग त्यावर सखोल विचार करत असताना 
शेवटची वेळ येते -- म्हणजे लमाल साठी लिखाण पोस्ट करायचा शेवटचा दिवस उजाडतो!  शिवाय पोस्ट केल्याशिवाय 
वाचायचं नाही असा एकंदरीत शिरस्ता / पायंडा असल्याने मग माझी घिसाडघाई होते. काहीबाही लिहून मोकळं व्हायचं 
(म्हणजे मग मी नियमितपणे लिहितो हे बिरुद मिरवायला बरं !)


पण नाही या वेळी लमाल साठी अगदी वेळेवर लिहायचं ठरवलं आणि लिहायला बसलो. पण काय शेवटी writer's block ! 
तो काय कुणाला चुकलाय ? अगदी war & peace चा ठोकळा लिहिणाऱ्या टॉल्स्टॉयला पण नाही (असं म्हणतात)! 
मग काय बसलो आंतरजाल ढुंढाळत.. कमी का विषय आहेत बघायला? शिवाय एका धाग्यातून दुसरीकडे मग तिसरीकडे, 
अगदी अंतराळात मुक्त सफर करतो आहोत असंच वाटत. मग फिनाईल कसे करावे पासून मंगळावर वस्ती आहे का अ
से नानाविध विषय.  आणि मी म्हणतो ह्याचा अभ्यास का करू नये माणसानं? म्हणजे उद्या परवा मंगळावर परिभ्रमणासाठी 
जाण्यासाठी यदाकदाचित माझी निवड झाली तर अडायला नको ना ! ((कोण म्हणलं नाही होऊ शकत?) शिवाय 
आपला लाडका मार्क आहेच.. त्याने इतके मित्र जोडून दिलेत ना कि त्यांच्या दैनंदिन जीवनात डोकावून बघितल्याशिवाय 
दिवस सुरु झाल्यासारखं वाटतच नाही.. तसे सगळेच काही ना काही छान लिहीत असतात त्यांच्या आपापल्या भिंतींवर. 
मग त्यांचं लिहिणं आवडलंय असं (खोटं का होईना पण) दाखवणं म्हणजे like करणं, विचारपूर्वक सुयोग्य comment 
करणं, दुसऱ्यांच्या comments वाचणं परत त्यावर शेरेबाजी करण, प्रत्येक वेळी आलेल्या नवीन कंमेंट्स अभ्यासणे, 
रोज कुणाचे ना कुणाचे  वाढदिवस असतातच त्यांना virtual फुले पाठवून शुभेच्छा देणे.. -- किती तरी काम असतात!
 बर जर इतर लोक यदाकदाचित Wifi च्या त्रिज्येच्या बाहेर असतील आणि त्यांनी त्यांचे दिवसाचे पान कोरे ठेवलं असेल.
 (हो हो Wifi त्रिजेच्या बाहेर एवढ एकच खरं कारण .. बिझी वगैरे काही नसतं कोणी!) हं तर काय सांगत होतो. जर त्यांनी
 काही लिहिलं नसेल तर मार्क बिचारा आपल्याच जुन्या जुन्या आठवणी आपल्याला नव्याने दाखवत असतो, अमुक वेळी
 तुम्ही काय करत होता, कुठे खात होता, कसे दिसत होता, वगैरे वगैरे. मग एकेकाळचा आपला आकार आणि चेहऱ्याची 
सुबकता पाहून हरकून जायला होतं -- आणि हा आनंद कधी एकदा मित्राबरोबर वाटतो असं वाटायला लागत. ते काम पण 
मार्क ने इतकं सोपं करून ठेवलंय ना हल्ल्ली कि विचारू नका.. मला तर ना कधीकधी त्याची मीठ मोहरीन दृष्टच
 काढावीशी वाटते!  मित्र मैत्रिणीचे फोटो पाहताना काहीजण वयाने आणि आकाराने वर्षानुवर्षे गोठलेले (frozen) दिसतात.
 ती कदाचित एखादी जेनेटिक डिसऑर्डर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तरीही त्यांचे दिवसेंदिवस टवटवीत
 होत जाणारे चेहरे, उजळ कांती आणि सडपातळ बांधा यावर टिकाटिप्पणी करणे अपरिहार्य ठरते! शिवाय ते फोमो 
(Fear of missing out) का काय म्हणतात तेही असेना का बापडे!


शिवाय कधी कधी मला उलटही त्रास होतो. म्हणजे एखाद्या विषयावर इतक्या कल्पना सुचतात कि जणू आपण कल्पनेच्या 
बागेत फिरत आहोत असे वाटते. मग आपण एक फुलपाखरू आहोत आणि सुचलेल्या कल्पना ही वेगवेगळी फुले आहेत 
अशी (आणखी एक) कल्पना सुचून त्यांचा रसास्वाद घेण्यात व तौलनिक अभ्यासात गुंतून गेल्याने यातली कोणती निवडावी,
 हेच सुचत नाही.  शिवाय मला ना कुठल्याही कल्पनेत डावे उजवे करता येत नाही. आईला कशी सगळी लेकरे प्रिय
 असतात ना अगदी तसंच होतं . (बहुतांशी लेखक हीच उपमा का बरं देत असावेत हा माझा एक भाबडा प्रश्न!). पण 
आजकाल कुठल्याच गोष्टीची सुरुवात न होणं व त्यावरून जवळच्या व्यक्तीकडून टोचून बोलणं फारच असह्य व्हायला 
 लागलं म्हणून मी पम्प्याला विचारायचं ठरवलं..  पम्प्या म्हणजे पंकज परांजपे - माझा शाळेपासूनचा मित्र. [जे 
अस्मादिकांच्या लेखाचे नियमित वाचक आहेत ते या माझ्या गुरूला लगेच ओळखतील. गेल्या वर्षी त्याचा सल्ला मी माझ्या 
"कल्पनाखोर" अवस्थेत घेतला होता हे देखील चाणाक्ष वाचकांना स्मरले असेल.]    
(संदर्भ: मी आणि माझी कल्पकता, लमाल, ऑगस्ट २०१८).

तर मी पम्प्याला त्याच्या घराजवळच्या इराण्याच्या हॉटेल मध्ये भेटलो.  त्याच्या आवडीची भजी आणि मस्का पाव 
ऑर्डर केली.
"हं बोल बाबू..  काय समस्या आहे?" भजी हिरव्या चटणीमध्ये बुडवत पम्प्या बोलता झाला.
"अरे मला ना सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही." मी म्हणालो.
"अरे त्यात काय .. कुठूनही कर.. " पहिले भजे पोटात गेल्याच्या तृप्ततेचा आनंद पम्प्याच्या तोंडावर दिसायला लागला.
"तेच सांगतोय ना -  कुठून सुरुवात करावी कळत नाही" मी परत सांगितलं.
"अरे माझ्यापुढे काय लाजतोस? बिनधास्त सांग.. " पम्प्या दुसऱ्या भजीत मग्न.
त्याचे निम्मे लक्ष भजीत असेच राहिले तर आमच्यातली हि "कम्युनिकेशन गॅप" तशीच राहील हे मला उमगलं. 
 मी त्याचं दुसरं भजे संपवून होईपर्यंत शांत बसलो. प्लेट त्याच्यापासून एक हात त्रिजेच्या बाहेर ठेवली.
दुसरे भजे गिळंकृत झाल्यावर पम्प्याने डोळे वर करून माझ्याकडं पाहिलं. 
"अरे बोल ना .. काय नक्की प्रॉब्लेम आहे? काय न संकोचता सांग."
"अरे पम्प्या तेच सांगतोय -- तू जरा भज्यातून लक्ष कमी कर आणि मग ऐक म्हणजे तुला कळेल. ..  
कुठल्याही गोष्टीची सुरुवात कुठून करावी ते मला कळत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे.. " मी एका दमात उत्तरलो.  
तो पर्यंत भजीची प्लेट परत त्रिजेच्या आत गेली होती.
"ओह ओके - सो धिस इस प्रॉब्लेम ऑफ द स्टार्टींग"
हा पम्प्या मधेच असा इंग्लिशवर घसरतो ते तेवढं एक सोडलं तर त्याचे सल्ले तसे बरे असतात..
"हं मग सांग आहे का काही उपाय यावर? "
"एस, धिस इस अन इश्श्यु ऑफ सुरुसुत्रता"
हा पम्प्या इंग्लिश वाक्यात असे मध्येच मराठी घुसडतो ते तेवढं मला आवडत नाही -- बाकी त्याचे सल्ले तसे बरे असतात.
"सुसूत्रता म्हणायचं आहे का तुला? " त्याला दुरुस्ती सुचवतं मी विचारलं.
"नाही -- सुरुसुत्रता -- सुरु करण्याची सुत्रता"
हा पम्प्या चुकीचा शब्द वापरला तर ते मान्य करत नाही हे काही मला आवडत नाही .. बा.त्या.स.त. ब. अ.    ...
"बर मग?"
"बाबू कसं आहे ना -- ज्याची आपल्याला आवड आहे ते आपण लगेच करतो आणि जे आवडत नाही त्याची चालढकल.. 
धिस इस बेसिक ह्यूमन टेंडन्सी यू नो ज्याला ह्यातील समतोल साधता आला तो जिंकला "
हा पम्प्या लेका स्वतःला मोठा मानसशात्रज्ञ समजतो पण कॉलेज मध्ये त्याला सायकॉलॉजीच्या पेपरमध्ये ४३ मार्क 
मिळाले होते हे मला माहितीय त्यामुळे त्याचे असे बोल मी फारसे मनाला लावून घेत नाही.. 
मला अजून काही नवीन ज्ञान प्राप्त झालं नव्हतं पण उगाचच पम्प्याला पांढरीशुभ्र दाढी फुटली आहे आणि आपण 
त्याच्या पायाशी शिष्य म्हणून बसलो आहोत असे काहीतरी चित्र माझ्या अंतर्मनात चमकून गेले!


"तुला आठवतं, मागच्यावर्षी तू कल्पना सुचत नाहीत म्हणून रडत आला होतास.. तेंव्हा मी तुला वडापाव खायला सांगितलं 
तर त्याची सुरुवात तू लगेच केलीस. कारण ते तुझं आवडतं काम !"  पम्प्याने बोलायला सुरुवात केली.. 
ह्यातलं एक क्रियाविशेषण सोडलं तर बाकी सगळं खरं होतं.  पम्प्या कधी कधी अतिशोयक्ती करतो त्याकडे जरा दुर्लक्ष 
करावं लागतं बा. त्या. स.. ..
"पण ... " चहाचा घोट घेऊन पम्प्या पुढं बोलता झाला.. "तुला योगा करायला सांगितलं तर त्याची सुरुवात केलीस का लगेच 
तू? बिकॉज दॅट इज युअर मोस्ट अनफेवरेट टास्क"
पम्प्याची गाडी परत इंग्लिशवर घसरली म्हणजे पम्प्या फॉर्मात आला हे मी ओळखलं.
आता योगाला मी उशिरा सुरुवात केली हे खरं होतं पण मी "डील" शोधत होतो (कि हि माझी पळवाट होती?) तेंव्हा 
शीर्षासन करत असताना मुरगळेल्या मानेच्या आठवणीने मी परत शहारलो. 


"आणि तुला माहितीये ना रामदासांनीच सांगितलंय 'काहीतरी केलं कि काहीतरी होतंय'".
"काय?"  मी उडालोच!  म्हणजे स्वतःचे विचार प्रसिद्ध लोकांच्या तोंडी आहेत असे सांगायची पम्प्याची सवय मला नवीन
 नव्हती पण एकदम तो रामदासस्वामीच नाव घेईल अशी मला कल्पना नव्हती!


"काहीही काय रे..  रामदास स्वामी असं कसं म्हणतील?" मी विरोध दर्शवला.. 
"तेच रे - केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे -- मी जरा पॅराफ्रेज केलं एवढंच"
पम्प्याची हि पॅराफ्रेझची लॉन्ग जंप मला तरी  झेपणारी नव्हती..  
"बर ते जाऊदे , मग तू मला यावर उपाय सांग ना.. " मी त्याची गाडी तत्त्वज्ञानाच्या रुळांवरून हलवायचा माफक
 प्रयत्न केला.
"सो यू सी वूइ नीड टू अंडरस्टॅंड द बेसिक फर्स्ट.  व्हाय आर वूई द वे वूई आर बिफोर वूई चेंज इट"
माझा आधीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं माझ्या लक्षात आलं..  मी शांत बसलो..
"तर तू आधी तुझी व्हॅल्यू सिस्टिम तपासून काढ"
आता पम्प्या भरकटत कुठल्या रुळावरून कुठल्या क्षेत्रात गेला होता हे मला अनाकलनीय होते..
"मग जे टास्क आहे ना त्याचे छोटे छोटे भाग कर..  " मस्कापावचा तुकडा तोडत पम्प्याचे प्रवचन सुरु होते.
"मग त्याचे प्रायॉरिटीझशन आणि सिक्वेन्सिंग कर"   पावाला मस्का लावायचा "सिक्वेन्स" पूर्ण करत पम्प्या म्हणाला..
"मग छोटी काम आधी कर आणि मोठी कर .. किंवा उलटे केलेस तरी चालेल.. ऑल डिपेन्डस ऑन यू !"
काय? उलटे केले तरी -- म्हणजे कसेही केले तरी चालेल? 


"बट यू आर नॉट सॉलविंग माय प्रॉब्लेम "  -- आपण पण इंग्लिशमध्ये ठासून काही बोललं कि पम्प्या लक्ष देऊन ऐकतो 
असा माझा अनुभव होता..


पम्प्याने डोळे पूर्ण उघडून बघितलं.. हे तो विषयावर बोलायला खऱ्या अर्थाने जागृत झाल्याचं लक्षण!


त्यानं न बोलता खिशातून एक छोटी डायरी काढली त्यात गिचमिड अक्षरात काहीतरी लिहायला लागला.  
साधारण ५-७ मिनिटे तो काहीतरी खरडत होता.. नंतर त्यानं त्यातला तो कागद फाडून माझ्या हातात ठेवला. 
“जा वत्सा -- तुझे कल्याण होवो” असा काहीसा भाव त्याच्या नजरेत होता आणि शेवटचे भजे तोंडात टाकून पम्प्या 
“बाय” करता झाला. 


मी तो कागद वाचायला घेतला. वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं


सुरु  वातीचे नियम.


त्याने सुरु आणि वात यात एवढं अंतर ठेवलं होतं कि तो फुलवातीसारखा एखादा वातीचा प्रकार वाटावा!  त्या खाली
 गिचमिड अक्षरात नियम लिहिले होते.. 


१.  कुठूनही सुरुवात करा.  आता हेच वाक्य प्रमाणादाखल पहा -- 
उलट लिहिलं तरी त्याचा अर्थ तोच होतो कि नाही? 
२.  सतत काहीतरी करत राहा.  
३.  कामात बदल हीच विश्रांती समजा.  
४.  सुरुवात हे आपल्या डोक्यात असतं -- असं काही नसतंच! 
किंवा प्रत्येक सुरुवात हि कशाचातरी अंत असते. 
उदाहरणार्थ:  सकाळची सुरुवात हा झोपेचा अंत असतो.  
५.  काहीतरी करू | तेव्हाच आपण  तरु । जिंकू किंवा मरू । काम करा सुरु ।। 



“आणखी काय देऊ साहेब?” - कंटाळलेल्या वेटरनं त्रासून विचारलं -- माझा चेहरा हसरा आहे की रडका आहे हे त्याला 
नक्की कळलं नसणार..  


“शेवटी काय कुठूनही सुरुवात करा म्हणजे झालं.” 
काहीतरी त्रिकालाबाधित सत्य गवसल्यासारख वाटत मी बाहेर पडलो.. पम्प्याला भेटलं की मला अनेकदा असंच होतं!  
त्याची सुरुसुत्रतेची गुरुकिल्ली कितपत उपयोगी पडते लवकर कळेलच!

Tuesday, July 16, 2019

Don't name that thing!

Today I was having lunch in cafeteria at work and was facing the glass panel.  As I looked outside, I saw some people coming towards the cafe, green grass and some trees.  Then JK's questions came to my mind.  Once JK had asked young kids 'Can you look at the tree without naming it?'.
So I was trying to see if that it possible.  But before that, what does it mean to look at a tree (or anything for that matter) without naming it? My interpretation is to make sure knowledge does not become the hindrance.  And I found it very very hard.  You see, as soon as you look at the tree, you first perceive it as a "tree" immediately you know it is "green", it has "branches" and its "bark is brown" and so on.  So all this is accumulated knowledge.  These thoughts come rushing to you so fast that it becomes almost impossible to look at the tree without naming it.

Taken in a slightly different context, I gathered that looking at a thing without naming it means to be aware of our deep conditioning and get rid of it.  Consider you know someone who has betrayed you.  The moment you come across that person, memory acts faster than thought and you automatically hate that person.  Memory has conditioned you so deeply that you don't even realize it! So in essence what JK is saying is that can you stop that process? Can you avoid reliance on the memory?

Seen another way, this is a form of meditation.  Getting rid of memory, thoughts and still be aware of your surroundings.  Of course, it is easier said than done!

Monday, July 15, 2019

चष्मा काढा आणि मग बघा ...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सहज सुचलेलं...



गुरुपौर्णिमा म्हणलं की आपल्याला सगळे शाळेतले, कॉलेजमधले शिक्षक आठवतात.  आई हि मुलाची पहिली गुरु असते असं आपण म्हणतो. प्रार्थनेत सुद्धा 'मातृदेवो भव' पहिल्यांदा येत.  ते खरं आहेच पण आणखी एक गुरु आपल्याला आयुष्यभर मिळतो तो आपण विसरतो. तो म्हणजे आपली बायको (किंवा नवरा).
आता नवरा बायकोच नातं म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच आणि भांड लागलं कि आवाज येणार हा निसर्गनियमचं, नाही का? पण मग ह्या होणाऱ्या नैमित्तिक (?) वादातून/मतभेदातून असेल, किंवा प्रासंगिक होणाऱ्या चिडचिडीतून असेल. प्रत्येक प्रसंगातून बायको (किंवा नवरा) आपल्याला काहीतरी शिकवत असते/असतो.  तो एक प्रकारचा "फीडबॅक" असतो. फक्त होतं काय कि आपण त्यावेळी तो फीडबॅक घेण्याच्या मनस्थितीत नसतो, किंवा तो फीडबॅक हा "बायको" कडून आलाय (किंवा नवऱ्याकडून आलाय) म्हणून सोयीस्कररीत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपण त्याच्याकडे उदात्ततेने, कुठलाही किल्मिष मनी न बाळगता बघतच नाही. अर्थात तसं बघणं म्हणावं तेवढं सोपं नाही, कारण 'अतिपरिचयात अवज्ञेची बाधा अनेकदा या नात्याला सहजगत्या झालेली असते. वयानुसार प्रत्येकाचा समजूतदारपणा, वैचारिक परिपक्वता वाढतेच अस नाही. काही प्रमाणात स्वभावातील लवचिकता जाऊन तो निबर बनलेला असतो. त्यामुळे आपला जीवन सवंगडी हा "सवंगडी" (मित्र) आहे हेच आपण विसरतो आणि तो "संगीन" (तलवार) असल्यासारखं त्याच्याकडे बघतो!  बघा पटतंय का?  तर हा नित्य आपल्याबरोबर असणारा गुरु आपण गृहीत न धरता त्याच्याकडून (तिच्याकडून) शिकणं शक्य आहे. फक्त त्यासाठी एखाद्या बायकोने (किंवा नवऱ्याने) तिच्या नवऱ्याला (किंवा बायकोला) काही सल्ला दिला तर तो आपल्या दोघांच्या हिताचा आहे हे कळण्यासाठी नवऱ्याने (किंवा बायकोने) हा सल्ला आपल्या बायकोने (किंवा नवऱ्याने) दिला आहे हा चष्मा काढून त्याकडे बघावे लागते. तरच तो सल्ला मोकळ्या मनाने घेता येतो. 

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करा जरा विचार आणि हो, मनापासून पटलं, तर कृती देखील.  फक्त हा नात्याचा चष्मा काढून पाहायला शिका!

(c) सागर साबडे

Saturday, June 01, 2019

वळण

भले बुरे जे...घडुन गेले...
विसरुनी जाऊ... सारे क्षणभर...
जरा विसावु...या वळणावर...
या वळणावर....!

लहान पणी केंव्हा तरी... नववी दहावी ला असतांना परीक्षा सम्पल्यावर... सुट्टीचं सकाळी झोपेत.... बाहेर की घरात... रेडिओवर...भले बुरे जे घडून गेले... विसरुनी जाऊ सारे क्षणभर... हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं...!

हळूहळू ते गाणं कानात झिरपत होत नी पडुन रहावस वाटलं... ऐकत... अर्थ पुर्ण कडवे सगळे...सुरेख चाल...! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं...!

खरंच आहे...आयुष्यात किती तरी वळणे येतात... कधी संकटातुन.. वेदनेतुन...कधी आनंदात... हे वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो... किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणं च...! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा... पुढचा प्रवास बदलणारा असतो... हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ...अवकाश...! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर...!

खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जस स्वच्छ उन्हं असतं ना अगदी तसं..!

ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं... मनाला वाटतं की घडामोडिंना पूर्णविराम मिळालाय पण वास्तव मध्ये तो स्वल्पविराम असतो...... जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणु काही...!

पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते...! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं...! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही... अन हवी असलेली मागची पानं परत वाचताही येत नाही...! ती आपोआप पालटत असतात...! वाचावीच लागतात....! फक्त विसावा काय तेवढा आपला... बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा...!

हे सगळं लिहिताना आणखी एक सुचलेला विचार.  शाळेमध्ये तुम्ही कदाचित 'बँकिंग ऑफ रोड' बद्दल शिकला असाल. ( मूलभूत भौतिकशास्त्र व गणिताचा अभ्यास असल्यास जिज्ञासूंनी हा दुवा पाहावा, http://www.chemistrylearning.com/banking-of-roads/)  वळणावर गाडी उलटू नये म्हणून बाहेरची बाजू जास्त उंच केलेली असते.  तसेच जास्तीत जास्त किती वेगाने वळण घेता येईल असे फलक रस्त्यावर तुम्ही कदाचित पहिले असतील..   आयुष्यातला प्रत्येक निर्णय हे एक वळण मानलं तर असं म्हणता येईल का की एखादा निर्णय घेताना तुम्ही सर्व परिणामांची शक्याशक्यता विचारात घेतली नसेल, किंवा घाईगडबडीत एखादा निर्णय घेतला असेल तर त्याचे पर्यवसान आयुष्याच्या गाडीचा समतोल बिघडवण्यात होणार हे निश्चित.  अर्थात तो कितपत आणि त्यातून तुम्ही सावरू शकाल का हे सर्वस्वी व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीजन्य आणि त्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय आहेत त्यावर अवलंबून असणार!

अर्थात वळण (निर्णय) घेताना ते वळण कितपत धोक्याचे आणि जीवनाच्या दृष्टीने मौलिक आहे हे माहित असेलच असे नाही. त्यामुळे निर्णय घेताना एखादी चूक होतेय ते कळेलच असे नाही, कधी कधी भावनात्मक परिस्थिती असल्याने निर्णय घेतले जात असतात.  (emotions rule over logic) पण फळे मात्र नंतर भोगावी लागतात.

आयुष्यातील हि वळणे घेताना, एखादे वळण हवेहवेसे व नकोसे वाटत असताना, एकाच गतीने उलगडणारा हा प्रवास जगताना मनाच्या गाभाऱ्यात उमटणाऱ्या तरंगांना साक्षी ठेवून...

वळणावळणाचे जीवन
जीवनातील वळणे वळणे
न कुणा कधीही कळली
न कुणा कधी कळणे

वळण असे कधी काटेरी
असह्यपणे घेते चावा
कळू नये असा कधी
काळाचा हा गनिमीकावा

वळण कधी  ते गुलाबी
बेसावध मी येता जाता
गालावरचा तिच्या रक्तिमा
येई हसू आज आठवता

वळण असे भारी अवखळ
येई मजला न सावरता
मला न रुचली अथवा पचली
दिधलिस त्याने जी चंचलता

वळण भासे कधी
मज रेंगाळणारे
कुठली दिशा अन
कुठले वारे

शेवटच्या त्या वळणावरती
ऐकू यावा मोहक पावा
अन माझ्या थकल्या जीवा
मनमुरारी कृष्ण दिसावा

Friday, May 10, 2019

अंदमानच्या कोठडीत पु. ल.

गेल्या शतकातील एक सत्यकथा
प्रेम वैद्य

(source: http://snchitnismiraj.blogspot.com/2012/02/blog-post.html)

१५ ऑगस्ट१९८२ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही फिल्म्स डिव्हिजनचे काही कर्मचारी ध्वजवन्दनाकरिता फिल्म भवनात जमलो होतो. कार्यक्रम संपन्न होताच, दिल्लीला गेलेले आमचे एकसहकारी, श्री. प्रभाकर पेंढारकर तितक्यात तेथे उपस्थित झाले आणि त्यांनी माहिती आणि मंत्री श्री. वसंत साठे यांचा तातडीचा एक संदेश थापांना दिला – “सावरकर अनुबोधपटाचेचित्रीकरण लवकर सुरु करावे”. थापांनी ते पत्र वाचून माझ्यापुढे करत म्हणाले “गेट बिझी इमिजिएटली.”१९७७ साली प्रारंभ झालेल्या या अनुबोधपटाचे कार्य १९८० साली गुंडाळण्यात आले होते आणि एकदम १९८२ मध्ये त्याला एकाएकी पुनश्च्य सुवर्णमुहूर्त लाभला होता.कुठेतरी वाचल्याचे आठवते, 'एखाद्या व्यक्तीचे तेजोमय भविष्य त्याच्या मृत्यूनंतरही ओसंडून वाहत जाते आणि मनाला विलक्षण आनंदाचा आभास देते.' अशा या उत्कंठित पार्श्वभूमीवर सावरकरअनुबोधपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झपाट्याने झाली. प्रथम स्वातंत्र्यवीरांचे जन्मगाव भगूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, शिरगाव या क्रमाने चित्रीकरण करत आम्ही फेब्रुवारी १९८३ च्यादुस-या आठवड्यात अंदमानला पोचलो.प्रथमपासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माझ्या मनात आदर असल्यामुळे, अंदमानात स्थायिक झालेले सावरकरभक्त, सेवानिवृत्त जेलर श्री. गोविंदराव हर्षे यांच्या सहकार्याने अंदमानचेकुविख्यात कारागृह आणि तेथील सावरकरांच्या कोठडीच्या चित्रीकरणाचे कार्य जोरात सुरु झाले.शनिवार दि. २६ फेब्रुवारी १९८३ च्या सकाळी शूटिंग चालू असतांना हर्षे म्हणाले, "आज सावरकरांची पुण्यतिथी. योगायोगाने विख्यात साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे यांचे वास्तव्य इथे आहे.मी त्यांना आज सायंकाळी इथे आमंत्रित केले आहे. अंदमान महाराष्ट्र मंडळाचे सर्व सदस्य आणि इथल्या नौदलामध्ये काम करणारे सर्व महाराष्ट्रीयन लोक इथे येणार आहेत. त्यामुळे आपण आपले शूटिंगदुपारनंतर बंद करुया.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाच्या दिवशी पु. लं.ची अंदमानच्या कारागृहात उपस्थिती म्हणजे आम्हा सगळ्यांना तो अति विलक्षण अनुभवाचा आणि आनंदाचा दिवस.सायंकाळी कारागृहाच्या मुख्यद्वारी, अंदमान द्विपातल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी पु. लं.चे स्वागत केले. ७२ वर्षांपूर्वी १९११ मध्ये स्वा. सावरकरांना बंदी रुपात या तुरुंगात ज्या वाटेनेघेऊन जाण्यात आले असेल, कदाचित त्याच पायवाटेने आज पु. ल. जात होते. कारागृहाच्या तिस-या मजल्यावरचे मोठे लोखंडी दर अति भयाण आवाज करीत उघडण्यात आले.समोर दोन भिंतींच्यामधोमध असलेला एक लांब पॅसेज थेट स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीपर्यंत जात होता. तो डोळ्यापुढे येताच पु. ल. गहिवरून गेले.भावनेने ओथंबून जाऊन ते उदगारले "तात्यांना इथे ठेवले होते?" त्यांचागळा भरून आला होता. पुढे त्यांना काही बोलताच येईना.सतत हसतमुख असणा-या आणि इतरांना हसवणा-या पु. लं.चे हे असामान्य रूप आम्ही पाहत होतो. हळहळत पुढे जात, पु. ल. त्या लोखंडी दारांच्या आंत, 'सावरकर कोठडीत शिरले. आमची गर्दीत्यांच्यामागेच, त्या १३ X ७ फुटांच्या कोठडीसमोरच होती. आमच्यांतल्या काहींनाच आत शिरता आले. तिथे त्या काळोखांत, भिंतीवर असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राला पु. लं.नीपुष्पहार अर्पण केला आणि नतमस्तक होऊन आदराने नमस्कार केला. पुढे काही क्षण ते तसेच स्तब्ध होते. अशा या हृदयस्पर्शी वातावरणाला तेजोमय करण्यासाठी आमच्या गर्दीतल्या एकाने मोठयानेआरोळी ठोकली "वंदे मातरम"..."भारतमाताकी जय"..." स्वातंत्र्यवीर सावरकरकी जय".... आणि आम्ही सर्वांनी त्याला दुजोरा दिला.अशा आमच्या या घोषणांचा प्रतिध्वनी संपूर्णकारागृहाच्या आवारांत घुमला. बहुतेक त्या कारागृहाच्या आयुष्यात प्रथमच अशा मुक्त, हौशी घोषणांचा दिलखुलास वर्षाव झाला असेल.पु. ल. भारावून गेले.सावरकर कोठडीच्या समोर, खाली अंगणात, जिथे ब्रिटीशांच्या काळांत कैद्याना फटके मारले जात, तिथेच पु. लं.चे भावनेने ओथंबलेले, स्फुर्तीदायक, स्वातंत्र्यवीरांच्याआदरांजलीला साजेल असे अविस्मरणीय साजेल असे अविस्मरणीय भाषण झाले. ते भाषण जसेच्या तसे इथे देत आहोत -

मित्रहो,आजचा दिवस हा मी माझ्या आयुष्यातला परम भाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नसल्यामुळे मी त्याला पूर्वजन्माचा आधार देत नाही. पण माझ्या हातून कधीतरीकाहीतरी असं घडलेलं असलं पाहिजे, की ज्यामुळे अशा प्रकारचा भाग्ययोग मला लाभला आहे. सावरकरांच्या प्रतिमेला आत्ताच आपण पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख नेहमी 'अंदमानातलीकोठडी' असा केला जातो. परंतु ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येतं, त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आत्ता जिथे गेलो तो असाच एक गाभारा झालेलाआहे. तिथे एक मूर्तिमंत तेज वावरत होतं. 'तेजस्विना वधी तमस्तु' असं आपण नुसतं म्हणत असतो. म्हंटलेलंही विसरून जात असतो. रोज म्हणत असतो.पण ख-या अर्थानं ज्यांची काय, वाचा, मनसगळंच तेजस्वी, ओजस्वी होतं अशी भारतीय इतिहासातील व्यक्ती शोधायची झाली तर प्रथम आपल्याला आधुनिक काळामध्ये वीर सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्येक क्षण हाजीवन उजळण्यासाठी आहे हे दाखवून देणारं त्याचं उभं आयुष्य होतं. ते अंधाराचे सर्वात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतन्त्र्यासारख्यागोष्टींनी आपल्यावर लादलेला असो. अंधाराविरुद्ध त्यांनी सदैव झुंज मांडलेली होती.मनुष्यजीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तींशी सतत झुंज घ्यावी लागत असते. एक मनुष्य आणि निसर्ग, दुसरी मनुष्य आणि मनुष्य, अंतत: तिसरी झुंज म्हणजे त्याची स्वत:शीच, स्वत:च्याआत्म्याशीच चालू असलेली झुंज. प्रत्येकाच्या अंतर्गतच एक युद्ध चाललेलं असतं. त्याच अर्थानं तुकारामांनी म्हटलंय, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'. कुठलंही युद्ध म्हटलं की त्याचा पाहिलानियम असा आहे की युद्ध खेळणं-यानं 'मी जिंकणारच' याच भावनेनं त्याच्यात जावं लागतं. सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' याचाच पुनःपुन्हा उद्घोष केलेला होता. पराजयाच्याभूमिकेतून गेलेला मनुष्य कधी युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या विचारांचं सर काढायचं झालं तर असं दिसेल की केवळ राजकीय गोष्टींवरच हल्ला करा असं त्यांनी सांगितलं असं नाही,तर जिथे जिथे तुम्हाला अज्ञान दिसेल तिथे तिथे एखाद्या वीर पुरुषासारखे तुटून पडा असं त्यांनी सांगितलं. म्हणून वैचारिक दृष्टीने आधुनिक काळातल्या विज्ञानमहर्षींच्यामध्ये सावरकरांचं नावआपण अतिशय आदराने घेतलं पाहिजे. विज्ञाननिष्ठा या विषयावरचे त्यांचे निबंध आपण वाचा, आणि 'विज्ञाननिष्ठा' का तर विज्ञान हे सतत अंधारावर मत करायला जात असतं म्हणून. सर्वठिकाणचा काळोख प्रकाशमान करण्याची गरज असते. काळोख याचा अर्थ भय, काळोख याचा अर्थ अंधश्रद्धा, काळोख याचा अर्थ आंधळेपण.सर्व ठिकाणचं अशा प्रकारचं यासाठी त्यांनी नुसतीलेखणीच नाही, नुसती वणीच नाही, तर सगळं शरीरकाया त्यासाठी झिजवली.२६ फेब्रुवारी हा त्यांच्या "आत्मार्पणाचा" दिवस आहे असं आपण म्हणतो. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर 'जीवाना ध्वरि पडे आज पूर्णाहुती' असा आपला हिशोबाच्या दृष्टीनं आज त्यांच्याआत्मार्पणाचा दिवस असेलही. परंतू त्यांच्या वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून प्रत्येकच दिवस हा त्यांच्यासाठी आत्मार्पणाचाच दिवस होता. "आत्मार्पण' हा विचार त्यांच्या मनात आलानाही असा एकही दिवस नसेल. आपण मात्र पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणून जगात असतो. आपल्या जगण्याला तसा श्वासोच्छवास घेणं यापलिकडे फारसा अर्थ नसतो. पण जिथे जिथेलोकांना गुदमारलेपणा जाणवतो, जिथे जिथे लोकांना मोकळे श्वास घेता येत नाहीत, त्या सर्वांचे श्वास मोकळे करण्यासाठी मला श्वासोच्छवास घ्यायचाय या भूमिकेतून जेव्हा माणूस जगतो तेव्हातो ख-या अर्थाने पारमार्थिक असतो. टिळे, माळा लावून 'जय जय रामकृष्ण हरी' म्हणणारा पारमार्थिक आहे असं उगीचच आपण समाजात असतो. पण जीवनाचा परम-अर्थ कळावा याच्यासाठीझगडणारा मनुष्य, निसर्ग-माणूस आणि आपण स्वत:, ही सर्व कोडी उलगडण्याच्या मागे लागणारा मनुष्य हा पारमार्थिक म्हटला पाहिजे.सावरकरांना या सेल्युलर जेलमध्ये प्रचंड शक्ती मिळाली. आज जरी आपण तिथे नुसते जाऊन आलो तरी भयाण वाटतं. आपण कल्पना करू शकता की त्या काळी ते असेच इथे उभे राहिले असतील. हे दृश्यपाहिल्यावर आपल्याला इथे ५० वर्षं काढायचीत याखेरीज दुसरा विचार कदाचित त्यांच्यासमोर नसेल. ब्रिटीश सत्तेला विरोध करणा-यांना, माणसासारख्या माणसांना मारणं हे ज्यांना लहानमुलांच्या खेळासारखं वाटत होतं अशांच्यात एव्हढी वर्षं त्यांना काढायची होती. तरीही मनात विश्वास बाळगायचा की या सगळ्या शृंखला गळून पडण्याचा एक दिवस येणार आहे. मित्रानो,त्यांनी त्या वेळेला सांगून ठेवलं होतं की एक दिवस येथे आमचे पुतळे उभे राहतील. हा काही अंधविश्वास नव्हता. त्यांना खात्रीच होती की ही परिस्थिती आम्ही बदलू शकतो. हा विश्वासयेण्यासाठी त्यांनी विज्ञान दृष्टीनं जगाकडे पाहिलं होतं. ज्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही अमृताचे पुत्र आहोत. एक दिवस मरण्यासाठीच जन्माला आलेले आहात असंसांगणारा नव्हे, तर 'अमृताचे पुत्र' आहात असं सांगणारा हिंदू धर्मच त्यांच्या डोळ्यापुढे असतो. घंटा वाजाव्यात तसे त्यांच्या मनाच्या गाभा-यामध्ये हेच विचार वाजत होते. त्यांना एकमाहीत होतं की दुबळ्यांच्या वाटेला दैव कधीही येत नाही. प्रत्येक बाबतीतल्या दुबळेपणाचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. सामोपचारानं आणि काहीतरी थातूरमातूर करून राजकारण करणा-यामंडळींच्या बाबत त्यांनी 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, अस एक शब्दप्रयोग केलेला आहे. आतलं शास्त्र काही कळलेलं नसताना जी नुसती पोपटपंचीच असते असा 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, असं तेम्हणतात. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर पारखून जेव्हा एखादा माणूस घेत असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने पराजय नसतोच. मर्ढेकरांनीही आपल्या कवितेत म्हटलंय की 'भावनेला येऊ दे गाशास्त्रकाट्याची कसोटी.' नुसतंच एखादी गोष्ट पाहून भावनाबंबाळ होण्याला काही अर्थ नाही. समजा हा सेल्युलर जेल पाहून मी डोळ्यात अश्रू आणून थयथया नाचायला लागलो आणि मलाकिती दु:ख झालंय हे सामान्यत: दोनशे माणसांना कळवणं म्हणजेच भावना असते असं नव्हे. उत्कृष्ट भावना तीच असते की, जिला आवर घालून त्यापुढचं कार्य करण्यासाठी बुद्धीची शक्ती मिळते.शास्त्रकाट्याची अशी कसोटी बुद्धीला लावणारे सावरकर होते.अंदमान हे एका दृष्टीने तीर्थस्थानच झालेलं आहे. हे निराळ्या अर्थाचं तीर्थस्थान आहे.सावरकरांच्या इतकी विज्ञाननिष्ठा असलेले लेख फार कमी आपल्याला वाचायला मिळतात. खरं दुर्दैव हे आहेकी आपण वाचतच नाही. मी आता काही तुमची परीक्षा घेणार नाही. पण इथे आलेल्यांना जर आपण विचारलं की तुम्ही कितीसे सावरकर वाचलेत, तर वाचलेत म्हणणारी फार थोडी मंडळी असतील.इथे याच जागी बसून, तुमच्यातच येऊन तुम्हाला नावं ठेवणं हे मला बरं वाटत नसलं, तरी एकेकाळी मी मास्तर असल्यामुळे असे लोक जमलेले दिसले की तशी खुमखुमी येते त्याला काय करणार! पण,सावरकर जितके तपशीलात, पुन्हा पुन्हा वाचत जाऊ, तसं आपल्याला दिसतं की या माणसानं एखाद्या ज्योतिषासारखी भविष्यं केलेली आहेत. आणि ज्योतिष्यासारखी, म्हणजे केवळ थातूरमातूरज्योतिषासारखी नव्हे तर त्याचं गणित मांडून केलेली भविष्यं आहेत. ५० वर्षांच्या शिक्षेसाठी आत जाणारा माणूस कशाच्या आधारावर म्हणत होता की, एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील?त्यांना काळात होतं की माणसानं एकदा जिद्दीनं ठरवल्यानंतर कुणीही त्याच्या आड येऊ शकत नाही. ते त्यांचं म्हणणं खरं झालं.आत्ताच श्री हर्षे यांनी मला विनंती केली होती की सावरकरांच्याबद्दल व्यक्तिगत काहीतरी तुम्ही बोला. तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत सुद्धा मला कधी झाली नव्हती.सुर्याचं तेज नेहमी दुरूनच घ्यायचं असतं. त्याच्या फार जवळ गेलं तर आपण भस्मसात होऊन जाऊ. आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकांतून, त्यांच्या ग्रंथांतून. पण माझ्या आयुष्यांतआणखी एक सुवर्णयोग आला होता. त्यांचा अमृतमहोत्सव झाला तेव्हा मी सावरकरांचं भाषण ऐकलं होतं. आमच्या लहानपणी पार्ल्याला सावरकर बरेच वेळा येऊन गेले, तेव्हाही त्यांची भाषणं ऐकलीहोती. 'गंगेसारखा ओघ' ही उपमा वक्तृत्वाला का देतात ते सावरकरांचं भाषण ऐकल्यावर कळतं.सावरकरांनी किती त-हांची श्रीमंती आपल्याला दिली आहे! भाषेवरून मला आठवतंय, सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो, ते आपल्याला माहीतही नसतं. सुरुवातीला जेव्हा तेआले, तेव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली. परंतू ते सरकारी खात्याने रूढ केलेले शब्द नव्हते, तर एका प्रतिभावंत कवीने रूढ केलेले शब्द होते. या दोनात फरक असतो. 'मोलेघातले रडाया' म्हणून सरकारात भाषाशुद्धीचे लोक बसवलेले असतात.इकडची डिक्शनरी घेऊन इकडे शब्द घाल, असं त्याचं चालू असतं. पण हा प्रतिभासंपन्न कवी होता. 'रिपोर्टर'चं भाषांतरकरताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं.वार्तांचं, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा, तो वार्ताहर...... इथे प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते. आज महाराष्ट्रात किंवा अगदीपुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी सुद्धा 'मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो. संपादक आणि वृत्तपत्रातले बाकीचे पदाधिकारी , त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्दसावरकरांनीच दिलेत. चित्रपट सृष्टीतल्या लोकांचे तर सगळे शब्द सावरकरच देत आहेत. दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला., संकलक हा शब्द त्यांनी दिला. अशा त-हेने त्यांनी मराठी भाषासमृद्ध केलेली आहे. आजही जर मुलांना ओघवती भाषा शिकवायची असेल, त्यांचं बोलणं जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे निबंध रोज मोठयाने वाचून घ्यावेत. म्हणजेवैचारिक दृष्ट्याही तो मुलगा मोठं होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनेही तो मुलगा मोठं होईल.त्यांच्या लेखनात विलक्षण नाट्यमयता दिसून येते. सावरकरांचे मराठी भाषेवर किती थोर उपकार आहेत हे अनेकांच्या कदाचित लक्षात सुद्धा येणार नाही. सावरकर हे साक्षात महाकवीच होते.शतजन्म शोधिताना शातअर्ती व्यर्थ झाल्याशतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.इतकी विराटकल्पना या 'स्पेस एज' च्या युगातसुद्धा आधुनिक कवींपैकी कुणी केल्याचं मला आठवत नाही. आमचं प्रेम कसं होतं, त्याचं वर्णन करताना त्यांनी या ओळी लिहिलेल्या आहेत. नुसती एकसूर्यमालिका आपल्या आवाक्यांत येत नाही, इथे हा महाकवी म्हणतोय - 'शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या'; एव्हढं पाहणा-या या महाकवीनं ब्रिटिशांच्या जेलमध्ये जन्मठेपेचा एक कैदीम्हणून इथे आल्यावर काय हाल सोसले ते आपण 'माझी जन्मठेप' मध्ये वाचलेलच आहे. पण माझी खात्री आहे की त्यांनी जेवढे हाल खरोखरच सोसले असतील त्याच्या एक दशांश सुद्धा त्याच्यामध्येलिहिले नसतील. कारण त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल जराशी सुद्धा करुणेची भावना उत्पन्न होईल असं त्यांना संशय आला असता, तरी त्या महापुरुषाला ते आवडलं नसतं. मला नेहमी वाटतंकी झालेले सगळे हाल त्यांनी त्यांच्यात लिहिलेलेच नाहीयेत. उगीच कुठल्या तरी म्हातारीने ते वाचून 'अयाई, काय गं हे हाल' असं म्हटलेलं त्यांना नको होतं. उलट त्यांना ते वाचून 'असे हालहोतात काय, ठीक आहे, मग मीही ते सोशीन' असं त्यातून स्फूर्ती घेऊन हिंमतीने म्हणत पुढे येणारे तरुण हवे होते. त्यामुळे स्वत:बद्दल कणव निर्माण करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केलानाही. वार्धक्याच्या काळात ते कुणाला भेटत नसत. इथे बाळाराव आहेत, त्यांच्या अगदी जवळ वावरलेले, त्यांना माहीत असेल नेमकं का ते. पण मला तरी असं वाटतं की आपल्या आयुष्यात थकलेल्याअवस्थेत आपल्याला कुणी पाहणं त्यांना कधी आवडलेलं नव्हतं. एखाद्या म्हाता-या सिंहालाही असंच वाटत असेल, की मला सर्कशीतला सिंह म्हणून पाहू नका, तर जंगलात ज्यावेळेला मी डरकाळ्याफोडत होतो त्यावेळेला हिंमत झाली असती तर माझ्यासमोर येऊन उभं राह्यचं होतंत. ह्याच वृत्तीने जगल्यामुळे सावरकर त्यावेळी कुणाला भेटले नाहीत, तितकेच हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेलेलेआहेत.त्यांच्या विज्ञाननिष्ठेचं एकाच उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्याकडे बाकी सगळ्या बाबतीत आपण पुढारलेपणा दाखवू शकतो.फक्त और्ध्वदेहिकाची जी काही पद्धत असते त्या बाबतीत आपण अगदीतर्कट असतो. आपल्याला भीती वाटत असते की जिवंतपणी तर बाप मानगुटीवर कायम बसलेलाच होता, आता न जाणो, मेल्यावरही बसायचा, म्हणून आपण ते सगळं करत असतो. ज्या सावरकरांनाआपण धार्मिक, धर्मवादी, हिंदुत्वनिष्ठ......वगैरे वगैरे म्हणत दूषणं लावल्यासारखे बनवत होतो, ते सावरकर आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवतात की, 'मी मेल्यानंतर माझे शव विद्युतदाहिनीमध्येझोकून द्यावे'. ते 'झोकून द्या' हा शब्द वापरतात. म्हणजे चक्क फेकून द्या. त्याला आता काहीही अर्थ राहिलेला नाही, असं त्यांना म्हणायचय. हे शंकराचार्यांसारखंच आहे. आद्यशंकराचार्यांच्या आईला उचलायला इतर ब्राम्हण येईनात. या छोट्या मुलाच्यानंही ते जड शव उचलवत नव्हतं. त्यावेळेला ते म्हणाले, 'हे तर काष्ठवतच झालेलं आहे'. - आणि म्हणून त्यांनी त्याचेतीन तुकडे केले, मग वाहून नेऊन त्यांनी त्याचं पुढे काय ते दहन केलं. विज्ञाननिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी दाखवली आहे. नाहीतर दुसरीकडे स्वत:ला 'सेक्युलर' म्हणवणारे पुष्कळ जण आपणमेल्यानंतर गंगेत काय करा, यमुनेत काय करा, आणखी कुठे काय करा वगैरे सगळं लिहीत बसलेले असतात. यांना मात्र आम्ही सेक्युलर समजतो. असला सगळा तमाशा आपण नंतर करत असतो.ठाण्यातून एकदा मी मोटारीने जात होतो..... खरं तर आजच्या अशा प्रसंगी विनोदी किस्सा सांगू नये. पण तुम्ही मला बोलावलंय, तेव्हा मी माझ्या जातीवर जाणारच. राहवत नाही म्हणूनसांगतो. - ठाण्यात त्या दिवशी जात असतांना पोलिसांनी माझी गाडी एकदा इकडे अडवली, एकदा तिकडे अडवली, एकदा तिकडे अडवली. मला काही कळेना का ते. मी विचारलं काय आहे होहे? तर ते म्हणाले, उद्या या रस्त्यानं एका पुढा-याची रक्षा नेणार आहेत, त्याची ही रिहर्सल चाललीय. म्हटलं, मग रिहर्सलसाठी कुणाची रक्षा वापरताय? आडमार्गानं सुद्धा असं नकरणा-या सावरकरांची थोरवी आपल्याला अनेकदा कळतच नाही. 'विद्युतदाहिनी' हा शब्दसुद्धा सावरकरांचाच आहे. तोच आता रूढ झालेला आहे. त्याच्यात माझं शव फेकून द्या, असं ते म्हणतात.इतकंच नाही तर, त्यानंतर सुद्धा 'याचं स्वर्गात भलं व्हावं' या अर्थाचे मंत्र कुणी म्हणू नयेत असंही ते सांगतात. ज्यांना कुणाला आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गुणगुणावासं वाटेलत्यांनी हवं तर काही गुणगुणावं. पण माझं नंतरचं क्रियाकर्म कुणीही करू नये असं म्हणणारा अत्यंत 'रॅशनल' अशा प्रकारचा हा मनुष्य होता. अशा माणसाच्या बाबत अर्थीविपर्यास असंहीपुष्कळदा घडत असतं. सावरकरांनी गाय ही फक्त एक उपयुक्त पशू आहे, असं म्हंटल्यावर 'गायीच्या पोटांत एकतीस कोटी देव आहेत' असं म्हणणारे लोक त्यांच्यावर केवढे भडकले होते! त्यालासुद्धासावरकरांनी जे म्हंटलं, त्यानंतरचे सगळे अर्धवट वाचून त्यांच्यावर केलेले आरोप होते. ते जगातल्या कुठल्याही प्रकारच्या पावित्र्याला मान्यता देत नव्हते असं नव्हे. तर त्यांच्या दृष्टीने सगळ्यादेशाचंच पावित्र्य महत्वाचं होतं. अहो, ज्या पुढा-यानं देव आणि धर्म यापेक्षा देश हीच संकल्पना सगळ्यांत मोठी मानली त्यांच्यापेक्षा दुसरा कुठला मोठा रॅशनल विचारच आधुनिक युगांत असूशकत नाही. त्यांचे विज्ञाननिष्ठेचे विचारच आपल्याला इथून पुढल्या जगात लागणार आहेत. त्याचं कारण; आपल्याला यापुढे क्षणाक्षणाला विज्ञानयुगातच जगायचं आहे. त्याच्याशी जुळणारे जर आपलेविचार नसतील तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत असून सुद्धा आपण आजच्या आदीम जमातींच्या प्रमाणेच कुठेतरी फेकून दिले गेलेले, बावळट ठरू. अशा प्रकारच्या बावळटपणाचा सावरकरांना सदोदिततिटकाराच असे. त्यांना दीन, दुबळा, वाकलेला, लाचार मनुष्य सहनच होत नसे. हे कितीतरी वेळा त्यांच्या लिखाणात, त्यांच्या नाटकांत दिसून आलेलं आहे. 'तू तेजाचा पुत्र आहेस' हा संदेश सतततुम्हाला त्यात सापडेल. त्या स्वाभिमानाचा नुसत्या उर्मटपणाशी संबंध त्यांना जोडायला नको होता. ज्याप्रमाणे लिंकनने म्हटलंय की, as I shall not be a slave, so I shall notbe a master, ज्याप्रमाणे मी कुणाचा गुलाम होणार नाही, त्याप्रमाणे कुणाचा मालकही होणार नाही. 'जन्मठेपे'च्या सुरुवातीलाच असलेलं कदाचित आपण वाचलेलं असेल - त्या काळातहीत्यांच्या डोळ्यासमोर कल्पना होती की सगळ्या जगाचं राष्ट्र एक व्हावं. इतकी विराट कल्पना घेऊन बसलेल्या माणसाला ब्रिटीशांचा साम्राज्यवाद किंवा आपल्या लोकांचा बावळटपणा सहनकसा होणार? आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी ते य सगळ्याच्या विरुद्ध उभे राहिले. नुसते उभे राहिले असे नाही, तर एखाद्या समिधेसारखा आपला देह त्यांनी त्यासाठी झिजवला. तीकृतकृत्यता त्यांच्या 'जीवना ध्वरि पडे आज पूर्णाहुती' या शब्दातून दिसते.सावरकरांच्यासारखी माणसं जीवनाचा कधी निरोप घेत नसतात. ती अमर असतात. मृत्युन्जयच असतात. त्याचं एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादी ओळ सुद्धा आपल्याला त्यांची आठवण करूनदिल्यावाचून राहात नाही. माझ्या मते 'क्षण तो क्षणात गेलं, सखी हातचा सुटोनि' ही इतक्या श्रेष्ठ दर्जाची कविकल्पना आहे, की त्या एका ओळीकरता त्यांना नोबेल पुरस्कार द्यायलापाहिजे होता. त्यांच्या अशा एकेका निर्मितीमुळे ते चिरंजीव राहिलेले आहेत. आपण एवढंच बघायचं की, या प्रकाशातला एखादा तरी किरण आपल्या अंत:करणात पेटतो की नाही. आज त्यागाभा-यात पुष्पहार अर्पण करताना ज्याप्रकारे भरून आलं, ती भावना आपल्या मनात राहिली तर क्षूद्र गोष्टींनी आपण जे विचलित होऊन जातो, तिथे तरी आपण थोडे निर्भय होऊ शकलो तरबरं होईल. अशा निर्भयतेची उपासना करणं हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचं पहिल्यापासून स्तोत्र राहिलेलं आहे. असं निर्भयातला निर्भय माणूस इथे जेलमध्ये हालअपेष्टा सोसत कुणासाठीराहिला? तुमच्या-माझ्यासाठीच राहिला नं? आज आपण मोकळेपणानं ज्या प्रकारे सहज म्हणून इथे येऊ शकतो आहोत ते सावरकरांच्या आणि त्यांच्यासारख्यांच्याच पुण्याईमुळे. त्या पुण्याईचं स्मरणआपण करतो म्हणून ती पुण्यतिथी असते. माणूस नुसतं मेला तर त्याचं दरवर्षीचं श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी होत नाही. त्याच्या पुण्याचा जर काही वाटा आपल्यासमोर आलेला असेल तर ती पुण्यतिथीअसते. सावरकरांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्याचा, निर्भयतेचा वाटा आलेला आहे. स्वातंत्र्याच्या उपासनेबद्दल बोलायचं तर मी आत्तापर्यंत वाचलेल्या साहित्यातलं सर्वात सुंदर स्तोत्र म्हणजे -

'जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे........'याच्याइतकं सुंदर स्तोत्र नाही.

माझ्या आयुष्यात अंगावर काटा उभं रहावा असं आणखी एक प्रसंग आला. सावरकरांनी ज्या अस्पृश्यांसाठी इतकी प्रचंड धडपड केली त्याच बांधवांच्याशी संबंधित एका कार्यक्रमात मी गेलो होतो.सावरकरांनी अस्पृश्यांसाठी केलेलं काम आपल्याला माहीत असेलच - स्नेहभोजनं, मेळावे, पतितपावन मंदिर... असं मोठं काम त्यांनी मुख्यत: रत्नागिरीतून केलं होतं. त्या बांधवांचं काहीतरी चांगलंव्हावं, ते मोठे व्हावेत, शिकावेत, त्यांच्यातला भेद नाहीसा व्हावा यासाठी त्यांनी खूप धडपड केली. सांगलीजवळ म्हैसाळ नावाचं एक गाव आहे. तिथे आमचे एक मित्र मधुकरराव देवल यांनी ५०हरिजन कुटुंबांचा सहकारी शेतीचा एक प्रयोग उभं केलेला आहे. ज्या दलितांच्या घरातल्या बायका गरिबीमुळे, एकच फाटकं वस्त्र असल्यामुळे एकेकाळी घरातून बाहेर सुद्धा येत नसत, त्याचकुटुंबामधल्या बायका त्या दिवशी त्या कार्यक्रमात जरीचे कपडे घालून आलेल्या होत्या. इतकी त्यांची त्या शेतीतून प्रगती झालेली होती. सभेला सुरुवात झाली. ते म्हणाले, या बायका आतागाणं म्हणणार आहेत. आजकाल गाणं म्हटलं की कुठलं तरी चित्रपटातलं गाणं असणार आणि मुळात जितकं भीषण गायलेलं असेल त्यापेक्षाही भीषण ऐकायला मिळणार, अशा अपेक्षेत होतो. म्हटलं,म्हणा. एकेकाळी घराबाहेर न पडणा-या आणि पडल्याच तर ज्यांची छी: थू होत होती अशा बायकांनी माझ्यासमोर गाणं कुठलं म्हटलं तर -

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदेस्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे

माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मनात आलं, हे गाणं ऐकायला माझे कान उपयोगाचे नाहीत, इथे साक्षात सावरकरच उपस्थित असायला हवे होते. म्हणजे त्याचं पुण्य कुठल्या काळात, कुठल्याठिकाणी आणि कसं फळाला आलेलं आहे हे त्यांना पहायला मिळालं असतं. त्याचा एक क्षण जरी जरी त्यांच्या अनुभवाला आला असता तर चांगलं झालं असतं. त्याचं बीज असंही रुजलेलं आहे, त्यामुळेमारून, मरून किंवा विरुद्ध प्रचार करून ही माणसं कधी मरणारी नाहीतच. स्वयंभूपणानं ही वटवृक्षासारखी जगात असतात.जे तीर्थक्षेत्र झालेलं आहे अशा ठिकाणी, अंदमानात आपण जमलेलो आहोत. तीर्थाची माझी अगदी साधी व्याख्या आहे. जिथे नुसत्या शरीराला स्नान घडतं त्याला आपण पाणी असं म्हणतो, पणमनाला ज्याच्यामुळे स्नान घडतं ते तीर्थ असतं. गंगेमध्ये शरीरही धुण्याची ताकद आहे आणि मनही धुण्याची ताकद आहे. म्हणून गंगा हे तीर्थ होतं. अशाच एका तीर्थस्थळी आपण जमलो आहोत.खरं म्हणजे प्रत्येक भारतीयानं इथे नतमस्तक व्हावं इतकं महान कार्य इथे घडलेलं आहे. सर्वच भारतीय भाषांमध्ये सावरकरांच्या विचारांची भाषांतरं कशी करता येतील, याचाही कार्यक्रम आपणहाती घेतला पाहिजे असं मी बाळाराव सावरकरांना म्हटलंच आहे. बाळारावानीही याचं कार्यासाठी आयुष्य वाहिलेलं आहे. त्यांना या कार्याला समर्थता लाभावी म्हणून आपल्यासारखी मंडळीत्यांच्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा मला विश्वास वाटतो. इथल्या पुण्याईला मन:पूर्वक अभिवादन करून मी थांबतो.

Tuesday, April 09, 2019

Selfie

पूर्वी मोबाईल फोन ला फक्त मागे कॅमेरा असे.  फोनला पुढच्या बाजूला कंमेरे आले व सेल्फीच युग सुरु झालं. पूर्वी ग्रूपचा फोटो काढण्याच्या निमित्ताने का होईना कुणाला तरी विचारावं लागायचं, एक दोन वाक्य बोलली जायची. त्या संवादाला फार काही अर्थ होता अशातला भाग नाही.  पण त्यामुळे का होईना माणूस दुसऱ्या अपरिचित माणसाशी संवाद साधत होता.  कधीकधी "अरे आपण एका गावचे" असा शोध लागून तो वाढत असे नि मैत्रीच्या नवीन तारा जुळत असत. आता हा असा होणारा संवाद हळू हळू कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  सेल्फीसाठी नजर स्वतःकडे वळली  स्वतःचे बाह्यरूप न्याहाळण्यात, त्यावर भाळण्यात कदाचित थोडं नार्सिसिस्टपणाकडे वळली.. पण यातून स्वत:शी संवाद मात्र सुरु झाला नाही हेही तितकंच खरं !  बघा पटतंय का.. 

(सहज सुचलेले विचार.. ९ एप्रिल २०१९)