Monday, February 03, 2025

एक काव्यमय संध्या

 एक काव्यमय संध्या 


एका कवीला प्रत्यक्ष भेटणं, त्याच्याकडून त्याच्या कविता ऐकणं, इतर कवितांवर त्याचं भाष्य ऐकणं, त्यावर चर्चा होणं हा एक सुखद अनुभव असतो. विशेषतः काव्यरसिकांसाठी तर ही पर्वणीच असते. असा योग अभिव्यक्तीमार्फत आयोजित 'मला पुष्कळ होड्या येतात' या कवी हेमंत जोगळेकर यांच्या कार्यक्रमाने घडवून आणला.  हा कार्यक्रम अनुराधा गानू यांच्या स्मरणार्थही झाला. लॉस एंजेलिस परिसरातील एक स्वप्नील/तरल कविमनाच्या व्यक्ती म्हणून अनुराधा गानू प्रसिद्ध होत्या. कलाक्षेत्रात त्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांची कवितांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. अशा व्यक्तीचे स्मरण एका काव्यसंध्येला होणे हे सुयोग्यच ठरले. 



कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराधाची एक कविता वाचून व तिच्याविषयीच्या आठवणी सांगून तिचं स्मरण केलं. कै. अनुराधाचे पती श्री. वामन गानू उपस्थित होते. नंतर माझ्याशी बोलताना त्यांनीही तिची आठवण ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्यानंतर अजय दांडेकर, अभिजित जोगळेकर (कवीशी काहीही नाते नाही) आणि सुजित काळे यांनी हेमंत जोगळेकरांच्याच कविता सादर केल्या. "तुम्ही नाटकवाले कसलेले आहात - माझ्यापेक्षा सरस कविता सादर करता येते" अशी कौतुकाची दाद खुद्द जोगळेकरांनी त्यांना दिली!

कवी हेमंत जोगळेकर अतिशय मितभाषी, मृदू कवी म्हणून ओळखले जातात. होड्या ही त्यांची कविता महाराष्ट्र टाइम्सने घेतलेल्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाने निवडली गेली. निवड खुद्द मंगेश पाडगांवकर यांनी केली होती त्यामुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात सर्वत्र पसरले. पण त्याचवेळी त्यांच्यावर पाडगावकर गटाचा कवी असाही (अनाहूत) शिक्काही बसला!  

जोगळेकर स्वतः आय आय टी चे केमिकल इंजिनिअर, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे निवृत्त उपसंचालक तर तुम्ही कवितेकडे कसे वळलात या प्रश्नाला उत्तर देताना "मी कवी होतोच - शाळेतही कविता करायचो - योगायोगानं शिक्षणानं केमिकल इंजिनिअर झालो इतकंच" असं समर्पक उत्तर दिलं. आपण आधी माणूस असतो आणि नंतर पदव्या, नोकरी ही आभूषणं मिरवत असतो - कालांतरानं ती आभूषणच मोठी होतात की काय असा प्रश्न पडतो ह्याची जाणीव करून देणारं हे उत्तर होतं!

जोगळेकरांनी त्यांच्या अनेक कविता वाचल्या. त्यांच्या कविता छंदोमय नाहीत, सहजतेने आलेल्या आहेत. शिवाय अनेक दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. त्यांनी आई, वडील, पत्नी, बहीण, आत्या याविषयीच्या कविता ऐकवल्या. त्या कवितांत काही वैयक्तिक संदर्भ असले तरी काही कवितांना श्रोते त्यांच्या त्यांच्या भावविश्वाप्रमाणे काही प्रमाणात जोडले गेले.  मला वाटतं कवितांची हीच खरी शक्ती असते. 


जोगळेकरांच्या कवितांच दुसरं अंग म्हणजे विडंबन कविता. अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितांचं त्यांनी विडंबन केलं आहे. अर्थात विडंबन म्हणजे केवळ मस्करी, थट्टा नाही तर कवितेला वेगळा बाज चढवणे असते, मूळ कवीचा अपमान करायचा हेतू नसतो हे त्यांनी नमूद केले. ज्या कवितांचे विडंबन केले त्या कवींबद्दल विशेष आदर आणि त्या कवितांबद्दल खास प्रेम त्यांच्या बोलण्यातून डोकावत होते.  विडंबन कळायचे असेल तर मूळ कविता माहिती हवी. म्हणून त्या हेतूने अजय, अभिजित, सुजित व सागर यांनी शंकर वैद्य, ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या मूळ कविता वाचल्या आणि तदनंतर जोगळेकरांनी त्यांचे विडंबन सादर केले. त्याला चांगली दाद मिळाली. 

त्यानंतर त्यांनी त्यांच्या 'तरंगत तरंगत जाऊ घरंगळत' संग्रहातील काही त्रिपदी वाचल्या. फार छोट्या कविता असूनही काही प्रभावशील होत्या. पण त्या फार भरभर सादर झाल्याने त्याचा आनंद श्रोत्यांना फारसा घेता आला नाही असं वाटलं. त्या कविता प्रत्यक्ष बसून एकेक वाचायला हव्यात (हवंतर हे पुस्तक नंतर ज्यांनी विकत घेतलं त्यांच्यासाठी हा इशारा समजावा :-)
 
अगदी घरगुती गप्पांचा, कवीकडून किस्से ऐकण्याचा व संध्याकाळ संस्मरणीय करण्याचा हा प्रयत्न होता असे आयोजकांनी आधीच सांगितले होते. त्यामुळे अधून मधून पेरलेले प्रश्न सोडता अधिकाधिक काळ जोगळेकरांना बोलायची संधी दिली व ते रास्तच झाले असे कार्यक्रमानंतर आलेल्या प्रतिक्रियांतून जाणवले. 

मुग्धा येवलेकर व सौरभ अलुरकर ह्यांच्या निवासस्थानी हा बहारदार कार्यक्रम झाला. मुग्धा, उर्मिला व अनु यांनी कार्यक्रमासाठी सुंदर सजावट केली होती. जोगळेकरांच्याच कवितेतील काही ओळी छापून लावल्याने 'पूर्ण कविता ऐकायला कधी मिळते" अशी उत्सुकता निर्माण झाली.  कारण अनेक श्रोत्यांनी जोगळेकरांच्या कविता ऐकलेल्या नव्हत्या.  कार्यक्रमानंतर मुग्धा व तिची कल्पक कन्या अभया यांनी अतिशय सुंदर रुचकर, घरगुती जेवणाची व्यवस्था केली होती.  त्यात भारतीय खाद्यपदार्थ व त्यांना दिलेली मेक्सिकन चवीची जोड विलक्षण होती. 




आयुष्याचं गणित वेगवेगळ्या सुखदुःखानी भरलेलं असतं. कुठल्या पारड्यात कधी काय पडेल सांगता येत नाही. पण अशीच एखादी भारलेली, काव्यानंदाने बहरलेली संध्याकाळ येते, त्यात मैत्रीचा सुगंध दरवळतो आणि जमेच पात्र एकदम जड होतं. आयुष्याची धडपड सार्थ वाटायला लागते.  अशी संस्मरणीय संध्याकाळ आयुष्याच्या जमेकडे टाकल्याबद्दल अभिव्यक्तीचे व त्यांच्या चमूचे धन्यवाद!
    


Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

<< Home