चोरीची शिक्षा आणि शिक्षण
मी सहावीत असतानाची गोष्ट. तसा मी अभ्यासात हुशार गणला जायचो पण शाळेत कधी पहिला आलो नव्हतो. आमच्या वर्गातील एका मुलीनं -- पल्लवीन -- तिचे स्थान अबाधित ठेवलं होतं! बर अभ्यासेतर क्षेत्रातही तिचा तोच पायंडा होता. वर्गात सगळ्यांना तिचा हेवा वाटायचा.
सहामाहीत तिचा पहिला नंबर आला पण तिच्यात व माझ्यात १४ गुणाचे अंतर होते. वार्षिक परीक्षेत ती ते अंतर ५० पेक्षा वाढवेल याची तिच्यापेक्षा मलाच खात्री होती.
परीक्षेत माझा नंबर तिच्या मागे आला होता. गणिताचा पेपर होता. माझे गणित चांगले असले तरी वेग नव्हता. सराव करायचा कंटाळा करायचो. वर्गमूळ व घनमूळ काढायचे प्रश्न जाम छळायचे! मी माझ्या वेगाने पेपर सोडवत होतो. पल्लवी एकामागून एक पुरवणी मागत होती. पेपर सुटायला २०-२५ मिनिटे बाकी असतानाच तिने पेपर दिला व ती बाहेर पडली. असं कुणी केलं ना की मला जाम टेन्शन यायचं. मी जरा वेगाने लिहायला सुरुवात केली तेवढ्यात माझी पेन्सिल खाली पडली. ती घ्यायला मी बाकाखाली वाकलो. तेवढ्यात पायापाशी मला कागद दिसला. मी तो पाहिला आणि क्षणभर दचकलोच. पल्लवीने तिच्या सुवाच्य अक्षरात लिहीलेली पुरवणी होती. मला नीट न येणारा घनमूळाचा प्रश्न व्यवस्थित सोडवला होता. त्याच्या पुढे भूमितीय प्रमेय सोडवले होते.
काय करावे मला सुचेना. सांगाव का सरांना? की काॅपी करावी? की तसाच सोडून द्यावा? शेवटी मोहाने विजय मिळवला व मी ते उत्तर तसेच कांपी केलं. पल्लवीची पुरवणी तिथेच बाकावर सोडली व पेपर देऊन टाकला. शेवटचा पेपर असल्याने सुट्टया लागल्या.
दीडमहिन्यानंतर निकालासाठी शाळेत गेलों. मी पूर्ण शाळेत पहिला आलो होतो! माझा विश्वास बसेना. गणितात मला १०० पैकी ९६ गुण मिळाले होते. पल्लवी दुसरी आली होती. तिला माझ्यापेक्षा ४ गुण कमी होते व गणितात फक्त ती १४ गुणांनी मागे होती. मला आठवलं की पुरवणीतले प्रश्न १४ गुणांचे होते! म्हणजे मी तिचे गुण चोरून पहिला आलो होतो! कधीच पहिला नंबर न सोडणारी पल्लवी दुसरीआली याचं सर्वांना विशेष वाटत होतं. तेव्हा वर्गात मुलं विरुद्ध मुली अशी स्पर्धा असायची. नेहमी मुलींचा नंबर पहिला असतो याचा मुलींना फार अभिमान होता. आज अनेक मुली हिरमुसल्या होत्या. काही माझ्याकडे रागाने पाहात होत्या. पल्लवी थोडीशी रडवेली वाटत होती पण तेवढ्यात ती माझ्याजवळ आली व मला ‘अभिनंदन!’ म्हणाली. मी थॅंक्यू म्हणत कसनुसं हसलो. तिच्या मनाच्या मोठेपणामुळं मलाच ओशाळल्यागत झालं..
घरी आलो तेंव्हा घरात निकाल सांगितला. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. माझ्या आजीला फार कौतुक वाटलं. तिन लगेच जाऊन पेढे आणले व देवापुढं ठेवले. तेंव्हा आम्ही वाड्यात राहायचो त्यामुळे कानोकानी हि वार्ता घरोघरी झाली आणि पेढ्यांचा डबा हळूहळू रिकामा होऊ लागला. मला आनंद झाला पण मनात एक अनामिक टोचणी लागली होती. काय करावं कळत नव्हतं आणि अभिनंदनाचा रतीब सुरु असल्याने बाकी काही विचार करायला वेळ नव्हता. माझ्या काकांनी मला बक्षीस म्हणून महात्मा गांधींवरच एक पुस्तक दिले. त्यात गांधीजींच्या लहानपणाच्या गोष्टी होत्या.
दुसऱ्या दिवशी मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यात गांधीजी लहान असताना मित्रांबरोबर कुठेतरी आणि मित्राने टिंगल केली म्हणून त्यांनी मांस खाल्ले आणि पैशासाठी भावाच्या सोन्याच्या कड्याचा एक तुकडा तोडून विकला अशी एक गोष्ट होती. त्यानंतर ते घरी आले व याविषयी त्यांच्या आजोबांशी खोटं बोलले. पण नंतर पापभीरू मोहनदासला राहवलं नाही आणि ते आजोबांच्या खोलीत जाऊन रडले व त्यांची माफी मागितली. तो प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला.
पुढे एक दिवसानंतर माझ्या आजीची एक मैत्रीण (आम्ही त्यांना बापट आजी म्हणायचो) आमच्या घरी आली होती. माझे कौतुक म्हणून त्यांनी एक स्वतः विणलेली पिशवी आणली होती. आजीने सांगितल्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला व बापटआजी माझं कौतुक करायला लागल्या .. पण मला ती गांधीजींची गोष्ट आठवायला लागली आणि मला रडू यायला लागलं. आजीला नक्की काय झालं कळेना. रात्री परत मुसमुसत मी आजीला सगळी परीक्षेत मला पुरवणी कशी सापडली व मी 'कॉपी' कशी केली याची गोष्ट सांगितली.
आजीनं माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाली "हे बघ चोरून मिळालेलं काहीच पचत नाही आणि रुचत नाही. यश कसं निर्भेळ हवं! त्याचा अभिमान वाटायला हवा. नाहीतर हे आपलं मन असं आपल्याला कुरतडत बसतं आणि ते पचत नाही. तू पल्लवीची उत्तर चोरलीस पण तिच ज्ञान चोरू शकतोस का? नाही ना? आता यापुढे शपथ घे कि कुठलीच गोष्ट फुकट मिळते आहे, चोरून वापरणार नाही." मी तशी शपथ घेतली.
मग आजीने विचारले "तुला एवढ्या लोकांनी भेटवस्तू दिल्या त्यातली तुला सगळ्यात आवडलेली कुठली?"
नाजूक कलाकुसर केलेली बापट आजीनी दिलेली पिशवी मला फार आवडली होती. मी लगेच आजीला तस सांगितलं. तेंव्हा आजी म्हणाली कि ती पिशवी तू पल्लवीला भेट दे. कारण त्यावर खरा हक्क तिचा आहे.
मी थोड्याश्या नाखुशीनेच ती छान पिशवी पल्लवीला दिली. तिला विशेष वाटलं.. पण त्या कृतीतून झालेला संस्कार मोठा होता व तो मला आयुष्यभर पुरला. त्यानंतर परत कुठलीच चोरी करायचा मोह झाला नाही. जी गोष्ट आपली नाही तरी ती सहजगत्या, कष्ट न करता मिळत असेल तर त्यावर आपला अधिकार नाही ही आजीची शिकवण अजून पुरते आहे.
पुढे मोठा झाल्यावर पीएचडी करताना plagiarism बद्दल वाचलं आणि लहानपणी झालेला हा संस्कार किती महत्वाचा होता त्याची प्रकर्षाने जाणीव झाली.
[सत्य असत्याची सांगड घालून केलेला हा कपोलकल्पित लेख आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.]