Thursday, January 05, 2017

On desire and happiness

आपल्या नेणिवेत बदल करण्याची खरी आवश्‍यकता आहे. आयुष्याचा मुक्त प्रवाह वाहू देण्यासाठी कोणतीही स्मृती त्यात राहू नये म्हणून खऱ्या जाणिवेची आवश्‍यकता आहे. माणसाचे मन हे एखाद्या चाळणीसारखे असते, जे काही गोष्टी धरून ठेवते आणि काही सोडून देते. आपल्या इच्छा कितीही मोठ्या व्यापक, उदात्त असल्या, तरीही त्या खूप क्षूद्र आणि लहान गोष्टीच आहेत. त्याचे कारण इच्छा ही मनाने निर्मिलेली गोष्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण इच्छापूर्तीच्या मागे आहोत, तोपर्यंत नैराश्‍य येणे क्रमप्राप्त आहे. इच्छापूर्तीचा आनंद ही आपली सततची इच्छा असते आणि आपल्याला हा आनंद सततचा हवा असतो. हा आनंद संपल्याबरोबर नैराश्‍य येते आणि त्यात वेदनाही असते. आपल्या आयुष्याचा प्रवाह हा कोणत्याही प्रतिरोधाशिवाय वाहू द्यायचा असेल, तर आपण आवडनिवड शून्यतेने तरल सावधानतेत जगले पाहिजे.
आपण एकाकी आणि आनंदी आहोत का? आपले आनंदी असणे, हे कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक सक्तीतून आले नाही ना, हे देखील पाहावे लागेल. आपले मन हे कोणत्याही अडथळ्यापासून मुक्त हवे. एकूण, प्रत्यक्षात जे आहे त्यासोबत राहण्यातील गुणवत्ता आता कळू लागली आहे. कृष्णमूर्तीची शिकवणूक पचवणे अवघड असले, तरी त्या दिशेने जाणे व नदीप्रमाणे स्वतःला शुद्ध करीत संपूर्ण वर्तमानाच्या या क्षणात राहणे, एवढे आपल्या निश्‍चित हातात आहे. अर्थात, या प्रवासाला मुक्कामस्थळ नाही. या प्रवासातच या प्रवासाची सांगता आहे. जो मनुष्य ‘काहीनाहीपणात’ जगतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी-आनंदी मनुष्य असतो.

0 Comments:

Post a Comment

<< Home