Managing your feelings..
आपण सहजपणे बोलून जातो, आज माझा अजिबात मूड नाही, त्यामुळे ही गोष्ट मी
करणार नाही. त्या दिवशी आमच्या घरात कुणाचाच मूड नव्हता, सगळेच शांत होते.
सध्या ऑफिसात साहेबांचा मूड ठीक नाही, त्यामुळे एक काम धड होत नाही तो
किंवा ती खूप मुडी आहे. कोणत्या क्षणी कसा वागेल किंवा कशी वागेल सांगता
येत नाही. आपण त्यांना भेटायला जातो आहोत खरं पण त्यांचा मूड चांगला असेल
तर ठीक आहे नाही तर काही खरं नाही. स्वतःचा, घरातल्या माणसांचा, मित्रांचा,
ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा मूड हा नेहमी आपल्या चर्चेचा विषय असतो कारण या
सर्व संबंधित लोकांच्या मूडवर आपला मूड कसा राहणार, हे ठरत असते.
माणसाचा मूड हा श्रावणातल्या वातावरणासारखा सतत बदलत असतो. क्षणभरापूर्वी
असणारी मनाची प्रसन्नता एकदम नाहीशी होते आणि त्या प्रसन्नतेची जागा
उदासीनता घेते. असे घडण्यासामागे अनेक कारणे असतात. कधी कधी नकोशी असणारी
माणसे आकस्मिकपणे समोर आली की काही माणसांचा मूड जातो. एखाद्या ठिकाणी आपण
मोठ्या उत्साहाने अनेक अपेक्षा ठेवून जातो आणि तिथले अजिबात अपेक्षित
नसलेले वातावरण पाहून आपला मूड जातो. गप्पांच्या ओघात आपण सहज एखादी गोष्ट
बोलून जातो आणि जेव्हा त्या बोलण्याचा विपर्यास करून समोरचा माणूस भलताच
अर्थ काढतो तेव्हा अनेकांचा मूड जातो. कधी सहवासातल्या माणसांच्या
अनपेक्षित वागण्यामुळे आपला मूड जातो. आयुष्यात काही घटना, प्रसंग असे
घडलेले असतात की त्याच्या जखमा, व्रण वर्षे लोटली तरी ताज्या असतात.
दैनंदिन आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगात कारण नसताना त्या जुन्या घटना,
प्रसंगांना आणि आठवणींना उजाळा मिळतो आणि मन खिन्न होते. खूप निराश वाटायला
लागते. अनेकदा अनेकांना इतरांना मिळालेले यश पाहून उदास वाटते. आपल्याकडे
बुद्धिमत्ता, गुणवत्ता, हुशारी आणि कष्ट करण्याची तयारी असतानाही यश मिळाले
नाही आणि समोरच्या सुमार माणसाला त्याचा वकूब बेताचा असतनाही लायकीपेक्ष
जास्त यश मिळाले हा देखील अनेकांच्या उदासीनतेचा विषय असतो. अनेकदा मन उदास
व्हावे असे काहीही घडलेले नसते तरीही निराशेच्या ढगांनी मन भरून गेलेले
असते. कारण नसताना एकटे वाटत असते. गहिवरून येत असते. प्रसन्नतेची आणि
निराशेची ही झुळूक मनाच्या अंगणात सतत येत जात असते. प्रत्येक माणसाच्या
वाट्याला हा खेळ येतच असतो. मन प्रसन्न असले की माणसाचा मूड छान असतो. मन
उदास आणि खिन्न असले की त्याचा कशातच मूड लागत नाही. त्या त्या क्षणी मनात
निर्माण होणाऱ्या या भावनांचं व्यवस्थापन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट
आहे. कारण सतत उदास असणारे मन निराशेच्या गर्तेत कधी ढकलले जाईल हे सांगता
येत नाही.
प्राप्त परिस्थितीचा खेळकरपणे स्वीकार करण्याची मानसिकता त्या व्यक्तिच्या
ठायी असेल तर उदासिनतेचे मळभ फार काळ टिकून राहत नाही. घरातल्या,
नात्यातल्या, मैत्रीतल्या, ऑफिसातल्या माणसांचे स्वभाव आणि सवयी बदलणे
शक्य नाही कारण तो त्यांचा पिंडधर्म आहे अशा परिस्थितीत त्यंच्याबरोबर
संवाद साधण्यासाठी आणि त्या संवादाचे सुसंवादात रूपांतर करण्यासाठी मला
झेपेल, मानवेल आणि रूचेल असा मार्ग कोणता, याचा विचार करून स्वतःत बदल
करण्याची वृत्ती अंगिकारली तर जगण्यात आणि काम करण्यात आनंद वाटायला लागेल.
अनेकांन असे करणे म्हणजे तडजोड, माघार घेणे असेही वाटण्याची शक्यता
नाकारता येत नाही; पण सततच्या संघर्षातून निर्माण होणारे ताणाचे ओझे घेऊन
जगायचे की मनाचा टवटवीतपणा टिकवत आनंदी जगायचे यातला दुसरा पर्याय अधिक
सोपा आणि जीवनाला अर्थपूर्णता देणारा असतो. अनेकदा शांतपणे, गंभीरपणे आणि
त्रयस्थपणे विचार केल्यानंतर जाणवते की ज्या गोष्टींसाठीच्या संघर्षात आपण शक्ती आणि वेळ घालवतो ते किती बिनमहत्त्वाचे
आहेत. ज्यावेळी एखाद्या गोष्टीमुळे मन उदास होते तेव्हा त्या खिन्नतेचा
लेखाजोखा मनातल्या मनात मांडण्याची सवय मनाला लावली पाहिजे. या खिन्नतेची
कारणे कोणती, त्यातली माझ्याशी निगडित कोणती, इतरांशी निगडित कोणती?
माझ्याशी निगडित कारणांची यादी मोठी असेल तर या खिन्नतेला मीच जबाबदार आहे.
मीच स्वतःत बदल केला पाहिजे आणि या उदासीनतेची कारणे इतरांच्या बोलण्याशी,
वागण्याशी निगडित असतील तर जीवनाचा एक पैलू म्हणून त्यांचा स्वीकार करून
स्वतःच्या उदासीनतेचे विसर्जनही करायला शिकले पाहिजे.
काही माणसे सतत उदास असतात ती इतरांबरोबर स्पर्धा करण्याच्या वृत्तीमुळे.
आपल्यापुढे कोणीही जाऊ नये याचा ताण घेऊन अशी माणसं जगत असतात. आपलं पद, यश
कुणीतरी हिरावून नेईल या भावनेनं ती कायम अस्वस्थ असतात. त्यांना इतरांचे
यश, पुढे जाणे सहन होत नाही. या असुयेला वयोमानाचे बंधन असते. ही असुया
माणसांच्या मनात खिन्नता निर्माण करीत असते. अशा माणसांनी एक गोष्ट लक्षात
ठेवायला हवी, गुणवत्ता ही अशी एकमेव गोष्ट आहे की, जी कोणीही कोणापासूनही
हिरावून घेऊ शकत नाही. एकदा एका चिमणीने मधमाशीला विचारले, ""तू इतकी मेहनत
घेऊन मध बनवतेस आणि कृतघ्न माणसे तो मध तुझ्यापासून हिरावून नेतात. तुला
या गोष्टीचे वाईट वाटत नाही का? त्यावर मधमाशीने दिलेले उत्तर खूप
महत्त्वाचे आहे. ती म्हणाली, ""माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात; पण मध
बनविण्याची माझी कला ते हिरावून घेऊ शकत नाहीत." इतरांशी तुलना
करण्यापेक्षा आपल्या बलस्थानांवर आणि सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करून
न्यूनत्वावर मात करण्याची वृत्ती तयार केली तर नैराश्याला अजिबात थारा
मिळणार नाही.
एका आश्रमात एक शिष्य गुरुकुल पद्धतीने शिकत असतो. शिक्षण संपताच
गुरुदक्षिणा द्यायच्यावेळी त्याला गुरुजींची परीक्षा घेण्याचा मोहन अनावर
होतो. तो एक फुलपाखरू पकडतो आणि हाताच्या मुठीत बंद करतो. तो गुरुजींना
विचारतो, ""माझ्या हातातली वस्तू जिवंत आहे की मृत आहे?" गुरुजींनी ती
वस्तू जिवंत आहे असे उत्तर दिले ते फुलपाखरून मारून टाकायचे आणि गुरुजींनी
ती वस्तू मृतक आहे असे उत्तर दिले तर फुलपाखराला सोडून द्यायचे असे त्याने
ठरविलेले असते; पण गुरुजी हुशार असतात. ते उत्तर देतात- ""या प्रश्नाचे
उत्तर तुझ्याच मनात आणि हातात आहे."
आपल्या उदास होण्याचे मूळ अनेकदा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असते.
ती विचारांची पद्धत बदलली आणि उदास विचारांचे निर्माल्य रोजच्या रोज काढून
टाकता आले तर मनाचा देव्हारा नेहमीच प्रसन्न राहील. अशा प्रसन्न
देव्हाऱ्यात मनोकामनांची मनोभावे पूजा करता येईल आणि आयुष्यात सारे काही
आनंदाने मनासारखे करता येईल.
0 Comments:
Post a Comment
<< Home