Monday, January 16, 2017

तिळगुळ घ्या गोड बोला

संक्रांतीनिमित्ताने सुचलेलं लिखाण


आज मकर संक्रांत.  नेहेमीप्रमाणे "तिळगुळ घ्या गोड बोला" अशा शुभेच्छांचा सगळीकडून भडीमार होतोय. पण गोड बोलणं वाटतं तेवढं सोपंही नाही आणि फारसं अवघडही नाही. 
अर्थात गॉड बोलायचं म्हणजे मुहमें राम बगल में छुरी असाही सोयीस्कर अर्थ काहीजण काढतात. राजकारणात तर हाच परवलीचा शब्द असावा असे वाटते.  काहीजण नुसते नावाने गोडबोले असतात पण प्रत्यक्षात मात्र आडनावाला जागत नाहीत (अर्थात हे अपवादानेच)!

काहीजण जन्माला येतात ते जणू तोंडांत साखर पेरली आहे असेच. त्यांचा प्रत्येक शब्द हा गोड वाटतो.
 त्यातलं माझ्या माहितीतील उदाहरण म्हणजे माझी आजी. केवळ गोड बोलण्याच्या जोरावर तिनं कितीतरी माणसं जोडली होती. दूधवाला, रिक्षावाला, भाजीवाला, शेजारीपाजारी सगळे येत जाता ५-१० मिनिटे तिच्याशी बोलत असतं. खूपजण तर फक्त तिच्याशी बोलायला छान वाटतं म्हणून तिच्याशी बोलायला यायचे असे मला आठवते.  मला ही कला काही फारशी साध्य नाही. बऱ्याचवेळा आजी एक संस्कृत सुभाषित म्हणायची "वचने किं दरिद्रता?" अर्थात त्या सुभाषितांचा अर्थ थोडा वेगळा असला तरी गोड बोलण्याची श्रीमंती का सोडा असा ती अन्वयार्थ काढायची. 
मला वाटतं गोड बोलायचं म्हणजे ते वरपांगी होता काम नये. स्पष्टवक्तेपणा असावा पण त्यातही गोडी असली की ऐकणाऱ्याला छान वाटतं.  शिक्षकांनी मुलाला "काय गाढव आहेस!" असं म्हणण्यापेक्षा "तुला अजून नीट कळलेलं दिसत नाही -- परत प्रयत्न कर" असं सांगितलं तर त्याला न्यूनगंड येणार नाही. गोड  बोलण्यात थोडी डिप्लोमसी असावी लागते.  इंग्लिश मध्ये एक कोटेशन आहे "A diplomat is a person who tells you to go to hell in such a way that you look forward to the trip!".
गोड बोलणाऱ्याची बहुतेक काम  मार्गी लागतात. अर्थात त्या बोलण्यात कृत्रिमता नसेल आणि खरे मार्दव्य असेल तरच हे पाहायला मिळते.  मन शुद्ध झालं की वाणी आपॊपाप मधुर होते असे म्हणतात. तर या संक्रांतीला फक्त "गोड बोला" ऐवजी संपूर्ण मनात, आचारा विचारात गोडवा येऊ दे अशी मनापासून शुभेच्छा देतो.  

वाणीत असावा गोडवा
कटू शब्द सदा सोडवा
मन मनास जोडवा
प्रेम शब्दे घडावा
________लेखनसीमा______________




Friday, January 06, 2017

Happiness - simple ideas


आजच्या मोहमयी जीवनात प्रत्येकाचा स्वत:चे, आपल्या इच्छा-आकांक्षांचे, भावनिक अपेक्षांचे, पंचेंद्रियांचे चोचले पुरविण्याचा अट्टहास दिसून येतो. मात्र या अपेक्षांच्या ओझ्याखाली निखळ आनंद हरवतोय. जगण्यातील आनंदाला पारखे होऊन जगण्यात काही अर्थ नसतो, हा विचारदेखील मनात कधी येत नाही. सकारात्मक विचार करून आनंदी कसे होता येते, त्याचाच हा एक अनोखा मानसिक तालमीचा प्रकार आज समजून घेऊ.
प्रत्येक पहाट एक नवा दिवस तुमच्यासाठी घेऊन येते. तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाने जगायला पाहिजे. प्रत्येक दिवस जर आनंदयात्री बनून आपल्या आयुष्यात येत असेल, तर जगण्याची मजा काही औरच असते. दु:ख, विवंचना, व्याधी, आजार यावर मात करून जीवन जगता येते. नवीन वर्षाच्या प्रारंभापासूनच ही मानसिकता ठेवून तुम्ही जगायला सुरवात करा. आयुष्यातील प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी एक संस्मरणीय ठेवा असेल. आनंदी जगण्यासाठी प्रत्येक क्षण तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलाय, हा विचार मनात पक्का करत जगण्याचा प्रयत्न करा. जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे तो जीवनाचा अविभाज्य घटक समजून पाहा. दु:खाबद्दल चिंतीत होऊ नका. प्रत्येक दिवस जगताना अनेक आनंदी क्षणांचा अंतर्भाव तुम्हाला जीवनात करता येईल. काही गोष्टी तुम्हाला नकळत आनंद देत राहतील. आनंद मिळविण्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही; पण भौतिक सुखांच्या मागे लागताना महागड्या वस्तूंच्या हव्यासापायी, पैशाच्या मागे लागताना, आपण दुःखी बनतो, याचा विचार करायला शिका.
पहाटे लवकर उठावे, रम्य पहाटेचे चांदणे आकाशात न्याहाळावे, पहाटवाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन मोकळ्या वातावरणातील निर्मळ हवेत दीर्घ श्वास घेऊन फुफ्फुस उत्तेजित करावे. हे दिवसभरातल्या आनंदी जगण्यातले पहिले टॉनिक. दररोज किमान अर्धा तास ते चाळीस मिनिटे सलग चालण्याने हात, पाय, शरीरातल्या सर्व सांध्यांची चांगली हालचाल होऊन शरीराला सर्वांगीण उत्तेजित ठेवण्याचे हे दुसरे टॉनिक. शास्त्रीय संगीत, भक्तिगीते यांचे सुश्राव्य श्रवण हे दिवसभरासाठीच्या आनंदासाठीचे तिसरे टॉनिक आणि आपल्या दैनंदिन जीवनात वेळेला महत्त्व देऊन नियोजनपूर्वक व आपल्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वेळेचे भान ठेवून त्याला प्रोत्साहित करून काम करणे, हे आनंदी राहण्याचे चौथे टॉनिक. याशिवाय रोजच्या जीवनात संपर्कात येणारी लहान मुले, वृद्ध व्यक्तींशी आपलेपणाच्या नात्याने संवाद ठेवणे आणि त्यांच्या सुखदु:खात भावनिक सहभागी होणे, हे पाचवे आणि सर्वांत महत्त्वाचे टॉनिक.
दिवसभरातील आनंदी दिनचर्येनंतर रात्रीचे जेवण घरातील सर्व जण एकत्रित करतील, अशाच पद्धतीने घरातील नियमन करा. यातून घरातील अनेक वेगवेगळ्या विषयांबाबत, अडचणींबाबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघतात आणि घरातील कटुता टळून आपल्याबरोबर आपला परिवारही आनंदी होतो. टीव्हीपुढे बसून उशिरापर्यंत जागणे, हा प्रकार सर्वांत वाईट असून, एकटक आणि एकटे टीव्ही पाहणे टाळाच. झोपण्यापूर्वी थोडे चिंतन किंवा शवासन स्थितीत पडून राहून मन शांत राहील, याचा विचार करा. स्वत:ला आपण वेळ देत आहोत, ही भावना कायम तुमच्या मनात ठेवून जगण्याचा प्रयत्न करा. 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' या उक्तीने साधेपणाने आयुष्य जगण्याची आपली तयारी असेल तर दुःख, वेदना, व्याधी आपोआपच तुमच्यापासून दूर राहतील आणि आनंदी जगण्याची एक अनोखी गुहाच आपल्याला हाती लागल्याची अनुभूती येईल.
आनंदी राहण्यासाठीचे काही उपाय.. 
  • सूर्योदयसूर्यास्ताचे विलोभनीय रंग डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करा. 
  • सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळी निसर्गातील पक्ष्यांचे गुंजन ऐकाच. 
  • रात्री टेरेसवर किंवा मोकळ्या मैदानात जमिनीवर पाठ टेकवून चंद्र, चांदण्यांचा प्रकाश न्याहाळा. 
  • पाण्याच्या फवाऱ्याखालून कधी चालत जा. वेगळाच आनंद मिळतो. 
  • कोणतेही काम करताना झोकून देऊन करा. त्यातून कामाच्या पूर्तीचा आगळा आनंद अनुभवा. 
  • दिवसभरात थकून घरी आल्यावर आंघोळ किंवा शॉवर घेऊन रिलॅक्‍स व्हा. 
  • रिकाम्या वेळात वाचन करा किंवा छान संगीत ऐका. 
  • कोणत्याही कृतीतून इतरांना आनंद मिळेल, अशी वागणूक ठेवा. 
  • मोकळ्या वातावरणात फिरायला जा. धुक्‍याच्या दुलईतून चालण्याचा आनंद घ्या. 
  • पावसाळ्यात एखाद्या दिवशी झोपून राहण्याचाही वेगळा आनंद मिळतो. 
  • घरात मंद, सुवासिक उदबत्तीचा दरवळ ठेवा. 
  • रात्री घरात पुरेसा प्रकाश राहील अशी दिव्यांची व्यवस्था करा, त्यामुळे मन प्रसन्न राहते, 
  • सुटीच्या दिवशी निसर्गाच्या सान्निध्यात जाणीवपूर्वक वेळ घालवा. 

Thursday, January 05, 2017

On desire and happiness

आपल्या नेणिवेत बदल करण्याची खरी आवश्‍यकता आहे. आयुष्याचा मुक्त प्रवाह वाहू देण्यासाठी कोणतीही स्मृती त्यात राहू नये म्हणून खऱ्या जाणिवेची आवश्‍यकता आहे. माणसाचे मन हे एखाद्या चाळणीसारखे असते, जे काही गोष्टी धरून ठेवते आणि काही सोडून देते. आपल्या इच्छा कितीही मोठ्या व्यापक, उदात्त असल्या, तरीही त्या खूप क्षूद्र आणि लहान गोष्टीच आहेत. त्याचे कारण इच्छा ही मनाने निर्मिलेली गोष्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण इच्छापूर्तीच्या मागे आहोत, तोपर्यंत नैराश्‍य येणे क्रमप्राप्त आहे. इच्छापूर्तीचा आनंद ही आपली सततची इच्छा असते आणि आपल्याला हा आनंद सततचा हवा असतो. हा आनंद संपल्याबरोबर नैराश्‍य येते आणि त्यात वेदनाही असते. आपल्या आयुष्याचा प्रवाह हा कोणत्याही प्रतिरोधाशिवाय वाहू द्यायचा असेल, तर आपण आवडनिवड शून्यतेने तरल सावधानतेत जगले पाहिजे.
आपण एकाकी आणि आनंदी आहोत का? आपले आनंदी असणे, हे कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक सक्तीतून आले नाही ना, हे देखील पाहावे लागेल. आपले मन हे कोणत्याही अडथळ्यापासून मुक्त हवे. एकूण, प्रत्यक्षात जे आहे त्यासोबत राहण्यातील गुणवत्ता आता कळू लागली आहे. कृष्णमूर्तीची शिकवणूक पचवणे अवघड असले, तरी त्या दिशेने जाणे व नदीप्रमाणे स्वतःला शुद्ध करीत संपूर्ण वर्तमानाच्या या क्षणात राहणे, एवढे आपल्या निश्‍चित हातात आहे. अर्थात, या प्रवासाला मुक्कामस्थळ नाही. या प्रवासातच या प्रवासाची सांगता आहे. जो मनुष्य ‘काहीनाहीपणात’ जगतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी-आनंदी मनुष्य असतो.